शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

कधी सुटेल हा देव







कधी सुटेल हा देव
खुळी अवघी उठाठेव
तडफडणारा जीव
शांत होईल ||१||
कधी होईल संसारी
मस्त दुनियादारी
गप्पा गाण्यात रात्री
धुंद घालवीन ||२||
नको जपाची कटकट
नको ध्यानाची खटपट
मजे करावी वटवट
विनाकारण ||३||
उच्च जीवनाचा ध्यास
कुणी लाविला मनास  
हाय अडकलो खास
मुर्खागतच मी ||४||
हजारात कधी कुणी
होय लॉटरीचा धनी
आपण कुठवर मनी
लाळ घोटावी ||५||
त्यांचा त्यांनाच होवो
लखलाभ उठाठेवो
आपण आपला टाहो
आटोपावा ||६||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

बंद झाली दार सारी








बंद झाली दार सारी
प्राण गर्द अंधकारी  
ओठास लावून कडी
कोंडिले मी कढ उरी

कालच्या त्या जगण्या 
अर्थ आज नाही जरी
भूतकाळी  धावतात
स्वप्न खुळचट सारी

मी न जरी कालचाच
कालची ती हि नाही
आजच्या या प्रकाशास
परि ते मंजूर नाही

जळू दे हे जग सारे
व्यर्थ जगण्यास झाले
अथवा अस्तित्व माझे
जड जीवनास झाले 

विक्रांत प्रभाकर  



रविवार, १२ जानेवारी, २०१४

राजघाट-बिडवानी (नर्मदाकाठच्या कविता )





  किनाऱ्यावर थबकलेले
साचलेले पाणी
बुडालेल्या घाटावर
अवघडलेले पाणी
जागेवाचून स्नानाला
खोळंबले भक्तवर
त्या त्यांच्या विनंतीस
मैयाही निरुतर
आवारात मंदिराच्या
घुसलेल्या गाड्या
अतिपरिचयात
झालेली अवज्ञा
धीरगंभीर प्रसन्न
एकमुखी दत्त
चैतन्यानी दाटलेले
जागृत आसमंत
कुठल्याही धनाविन
ऋण मुक्तेश्वर
भरलेले पाणी तरीही
पंपाचा आधार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...