मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

लग्न करणाऱ्या मित्रास ,









लग्न करणाऱ्या मित्रास ,

लग्न करून माणसं सुखी
होतात की नाही
हे मला अजूनही नीट
कळलेले नाही
तरीसुद्धा तुझे वैवाहिक जीवन
सुखी होवो
ही शुभेच्छा दयायला
काहीच हरकत नाही  
परीक्षेत हमखास नापास होणा-या
विद्यार्थांस ही आपण आँल द बेस्ट
देतोच की नाही  
पण खर सांगु मित्रा
मला मनापासून वाटत
दुनिया पाहिल्यावर स्पष्ट दिसत   
आपल्या जीवनसाथीदाराला जे
बायको करून टाकतात   
ते आपल्या जीवनात  
सायको होऊन जातात     
तिच्या त्याच्या व्यवहारात  
कायदेकानू तयार होतात
प्रेमपंख सारे मग गळून पडतात  
तिने असेच वागले पाहिजे
असेच त्याला वाटते
तिचेही काहीसे तसेच असते   
कधी कधी कुणी
आपले मन मारून टाकते
आहे तसे त्यात जुळत घेत राहते
कुणा कुणाच कधी
पार फाटत फाटत जाते     
पण मिळत जुळत घेणे
वा काडीमोड करणे
यात जीवन हरवून जाते   
नाही म्हणजे लग्न झाल्यावर
बरच काही बदलत असते  
नवे जग, नवे व्यवहार
हे सारे अपेक्षित असते   
नव्या बागेत रोपही
कसे वेगळे वाढू लागते  
वेगळी वळण नव्या फांद्या
नवे रूप फुलू लागते     
परंतु माझ म्हणण वेगळे आहे
जीवनाच्या गाभ्याशीच
त्याचे खोल नाते आहे
सहजीवनाच सूत्र त्यात
निखळ प्रेम व्यक्त आहे    
प्रेम प्रीती शब्द फार वरवरचे आहेत
अनर्थाचे त्यावरती बरेच छाप आहेत   
हक्क अहंकार अपेक्षा नसते
तेव्हा जी कृती घडते
नात्यात व संबंधात उतरते
तेव्हाच  प्रीती घडत असते  
तेच जीवन जगणे असते
अशीच प्रीती तुमच्यात घडो
बंधन नको बंध जडो   
मैत्री व प्रीती उलगडो
हि शुभेच्छा आता देतो
थोडे कळले जे ते सांगतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/








  



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

काळू कुत्रा



काळू कुत्रा गल्ली मधला
गल्ली सोडून कधी न गेला
अन आमच्या जीवनातील 
एक अविभाज्य भाग झाला

उगाच भुंके याला त्याला
नच धाडस पण चावण्याला
अन माने मालक आपुला
गल्ली मधल्या प्रत्येकाला

ऐट मिरवे कावळे हाकलीत
मरतुकड्यावर फुकाच धावत
नंतर येवून उभा राहतो
मोठा पराक्रम केल्यागत

भरदुपारी गेट समोर
ताणून देई उन्हात शेकत
आल्या गेल्या कुणा न पाही
मुन्सिपालटी पहारेकरयागत 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ७ एप्रिल, २०१३

गॅलरीत वेणीफणी


गॅलरीत वेणीफणी
करीत ती उभी होती
किणकिणत्या कंगणी
संगीत शिल्पच होती

मान करुनी तिरकी
बाजूस झुकुनी थोडी
कृष्णमेघ खांद्यावरी
जणू पौर्णिमाच होती

ओढाळ लाटा कुरूळ्या
शुभ्र सागर किनारी
झेलत होत्या इवले
सूर्य किरण सोनेरी

देत हलका झटका 
दाराकडे ती वळता
वीज झळाळे नभात
मेघ पांगता पांगता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

म्हातारीची गोष्ट





म्हातारीची गोष्ट
(माझ्या सोसायटीतील म्हातारीची हि गोष्ट आजकाल प्रत्येक सोसायटीत दिसते .वाटते, कदाचित हि उद्याची माझी गोष्ट असेल .)

कोपऱ्यातल्या घरात
रहाते एक म्हातारी
उग्र चिडकी संशयी
तरीहि आहे बिचारी १
म्हातारीने पोरा होते   
इंजिनिअर केलेले  
तळहातावर होते
जणू काही सांभाळले  
गरिबीच्या गटारात
दिवस होते काढले
मुलामध्ये भविष्याचे
सुंदर स्वप्न पाहिले ३
होता होता स्वप्न पुरे
नि टर्रकन फाटले
तिचे जीवन सर्वस्व
कुणीतरी हिरावले ४
भूल घालूनिया त्याला
दूरच्या देशात नेले
जादूच्या महालात नि
बेहोष बेधुंद केले ५
म्हातारीने मग सारे
जग पालथे घातले
पोरासाठी देव सारे
पाण्याखालीही ठेवले ६
राजा प्रधान सचिव
यंत्री तंत्री जादुगार
यांच्याकडे पोरासाठी
केले प्रयत्न अपार ७
यत्न फळत नव्हते
दिन सरत नव्हते
म्हातारीचे दु:ख अन
सतत वाढत होते ८
भेटेल त्याला म्हातारी
ते दु:ख सांगू लागली
जादूगारी सुंदरीला
त्या शिव्या देवू लागली  
गुणी बाळ माझा परी
भोळा म्हणत राहिली
तेच ते ऐकुनि तिला
सारीच टाळू लागली १०
वेडी झाली म्हणे कुणी
हळूच हसू लागली
सहानुभूतीने कुणी
कणव करू लागली ११
हळू हळू म्हातारी ती
अगदी एकटी झाली
आपली हार मनात
तिला कळून चुकली १२
म्हातारी मग अधिक
संशयग्रस्त बनली
साऱ्याच जगा रागाने
शापच देवू लागली १३
भुताटकीच्या घराला
कळा भयानक आली
तिची बेल वाजविण्या
सारी घाबरू लागली  १४
म्हातारीचा पोर आता
धनवान झाला होता
पोराबाळात आपल्या
चांगला रमला होता १५
गाडी घर पैसा सार
अगदी मजेत होता
म्हातारीला पैसा अन
देऊही करत होता १६
म्हातारीला सोन्याचे ते
पण अंड नको होते
कोंबडी सकट तिला
तिचे घर हवे होते १७
तिला तिच्या रक्ताचे
तिला तिच्या हक्काचे
तिला तिच्या कष्टाचे
सारे फळ हवे होते  १८
कितीतरी दिवस हे  
नाटक चालले होते
म्हातारीचे वणवण
भटकणे चालू होते  १९
एक दिवस कावून
ये म्हातारा गावाहून
नि तिची मोट बांधून
गेला तिजला घेवून २०
जाता जाता मला तेव्हा
स्पष्टच सांगून गेला
माझ्या साठीतरी आहे
आता पोर माझा मेला २१
उदास शून्य म्हातारी
काहीच नाही बोलली
डोळ्यात तिच्या विझली
तेव्हा लंका मी पाहिली  २२
पण माझी खात्री आहे
ती नक्की पुन्हा येणार
टाहो फोडत सर्वत्र  
पोरासाठी धावणार २३
मुलासाठी झगडणे
हे आता झाले जीवन
जीवनाला अर्थ आला
जणू की अर्थावाचून  २४
आज जरी सुटकेचा
एक निश्वास टाकून
संपला म्हणतो त्रास  
जातो तिज विसरून २६
कधीतरी मनामध्ये
म्हातारी मज दिसते
स्वप्न मुलानातवांचे
नि खळ्ळकण फुटते   २७

विक्रांत प्रभाकर

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...