शनिवार, २३ मार्च, २०१३

ll पुन्हा आळंदी ll




मना वाटे जावे l  इथेच संपून l 
पुन्हा जाणं येणं l घडो नये ll ll  
तुझिया स्वरूपी l  जावे मिसळून l 
शून्य हा होवुन l  देह प्राण ll ll  
सुटला मोह l  सुटली बंधनं l 
मनाच धावणं l  पांगुळलं ll ll  
प्राणाचा हा प्राण l  सामोरी पाहून l 
झरे नेत्रातून l  इंद्रायणी ll ll  
कोंदटला श्वास l  हुंदका दाटून l 
गेलो विसरून l  स्थळ काळ ll ll  
माझ्या मीपणाचा l  होवूनिया अंत l 
जाणिवेची मोट l  रिती झाली  ll ll  
चंदन तुळस l  गंध अबीराचा l 
विसर जगाचा  l  पडियेला   ll ll  
आनंद मनात l  आनंद देहात l 
निनाद कानात  l  पांडुरंग   ll ll  
जीर्ण गाठोड्यास l  हिसका बसून l 
आले संवेदन l  कसे बसे ll ll  
परतलो पुन्हा l  जड पावुलांनी l 
मर्जी स्वीकारुनी l  तुझी देवा ll १०ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुभ्र वस्त्रधारी




काल पर्यंत होते
वरवरी दुष्मन जे
हातात हात घालून
आज उभे आहेत
टोळ्यांचे साम्राज
धोक्यात आले म्हणूनी
सारेच ते आता
एक झाले आहेत  
आत्ता त्यांना आठवते
न्याय ,नियम, सन्मान
थडगेच  जयांचे ते
काल पुरून आले होते
गुर्मीतला माज
डोळ्यात झळकावूनी
निर्लज्य शुभ्र वस्त्रधारी
जग वेठीस धरुनी आहेत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २० मार्च, २०१३

ये रे ये रे देवा




ये रे ये रे देवा
तुला देतो मेवा
थोडा तुम्ही खावा
बाकी मला द्यावा

खूप वाट पाहून
देव नच येवून  
मी जाई कंटाळून
प्रसाद घेई खावून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

इंस्पेक्टर सचिन सूर्यवंशी निमित्ताने

  

चाटतात सदा पाय
धावतात पैश्यामागे
तयाचे हे भूत तुवा 
सूर्यवंशी आज लागे

मारणारे गुंड होते
त्यात नवीन काय ते
अरे पण तुम्ही तया
सदा मिरविले होते

आठवता धर्म आज
जरी केलेत चांगले
आजवरी भुजंगास
त्या दुध होते पाजले

घमेंडी नृपा नावडे
सरदार बाणेदार
शिरताच सत्ता शिरी
करे प्यादेही बेजार

भीम व्हा युधिष्ठीराचे
हात तुम्ही जाळणारे
रक्त दु;शासनी उष्ण
घटघटा प्राशणारे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १८ मार्च, २०१३

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
“ कळले का मी म्हटले होते ते, 
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!

मग मी पाडगावकरही  
ठेवून दिले.
कारण,मला आता 
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

विमला ठकार



 
ज्ञानेशाच्या अंगणातून
विश्वाच्या प्रांगणात
पसरलेली विद्युलता
तेजस्वी स्वयंप्रकाशी
देह मनाच्या बंधनातून
देश काळाच्या शृंखलेतून
धर्म जातीच्या जोखडातून
मुक्त झालेली मनस्विनी
साऱ्या मानव जातीसाठी
तीच आकांक्षा बाळगणारी
मातृहृदयी करुणामयी मुक्ताई
ती करुणा आणि मैत्री
शब्दाशब्दातून प्रगट होणारी
धगधगीत अग्निशिखेची
ज्ञानयज्ञाची जणू मूर्ती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...