शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

दर्शन रांग


दर्शन रांग लांब पसरत  
होती सरकत नम्रपणे
लक्ष घड्याळी चप्पल आठवत
उजळणी करत मागण्यांची  
अदृष्यातून काही अपेक्षित
श्रद्धा म्हणत लाचारीला  
जे न मिळे ते पकडू पाहत
लाच देत  दिव्यत्वाला
आखडत वर पाकीट सावरत
भाव आणत खात्रीवाचून
मिळवण्याला इहपर लोकात
चाले धूर्त गुंतवणूक

विक्रांत              

आत्मकृपा


कृपेवाचून गुरूच्या
देव भेटणार नाही
कृपेवाचून स्व:तच्या
गुरु भेटणार नाही

विफल  यत्नांच्या
बसून मनोऱ्यावर
साद हृदयातून जोवर
उमटणार नाही

आत्मकृपा तोवर
होणार नाही


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१२

हॉस्पिटलच्या बेडवर


दोन वर्षाचे पोर
हॉस्पिटलच्या बेडवर
तुटुनिया दोर
आयुष्याचा
भोवताली डॉक्टर
स्वीकारून हार
अन आवारावर
करे आया
वाहे ऑक्सिजन
रित्या नळीतून
अर्धी इंजेक्शन
भोवताली
सुन्न बाप
बहिऱ्या कानान
डॉक्टरांच म्हणन
ऐकत उभा
वऱ्हांड्यात माय
घे भिंतीचा आधार
आसवांचा पूर
वाहे ऐकटीच
रक्त दाटले डोळ्यात
पिळ पडे आतड्यात
मन चिणले भिंतीत
ओल्या दगडी 

विक्रांत



रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

तू


तू चैतन्य या घरातले
तू स्फुरण माझ्या गाण्यातले
तू चांदणे माझ्या मनातले
तू स्वप्न पूर्णत्व पावले
तू उर्जा मम कार्यातील
तू आस्था या घरातील
तू रक्षा कणा कणातील
तू प्रेमा या जीवनातील 

विक्रांत  

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

घेवूनी हातात बंदुका


घेवूनी हातात बंदुका
जग बदलत नाही
बदलली जरी सत्ता
सत्ताधारी बदलत नाही

तेच नाटक तेच थियेटर
जातात फक्त नट बदलत
आम्हीही तेच प्रेक्षक
राहतो अन टाळ्या पिटत

मान्य आम्हालाही आता
शब्दात नुरली काही ताकद
अन साहित्य झाले आहे
कपाटातील पिवळे कागद

पण आग होऊन जळलेल्यांचे
ऐकतो वा वाचतो वचन
आत विझल्या राखेमध्ये
चमकून उठतात अग्निकण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

ती येते अन मुद्दाम

ती येते अन मुद्दाम
मला न भेटताच जाते
तिला कदाचित माझी
का स्वत;ची भिती वाटते

काय अजूनही डोळ्यातून
माझ्या प्रेम आहे झरते
का अजूनही तिला तिचा
नकार आहे दु:ख देते

खूप वर्ष झाली आता
सार विसरायला हवे ते
समजावया हवे तिला 
की वय वेडे होते ते

तेव्हा तर तिला मी
सरळ विचारले होते
नकारातील अश्रूत तिच्या
अन प्रेम वेचले होते

नंतर पण व्रत मैत्रीचे
तरीही पाळले होते
आता ही व्रत माझ्या
मनात दृढ आहे ते

जाळला अंकुर प्रत्येक
प्रीतीची स्मृति तीही
भिती मग कसली तिला
कळेना मज अजूनही

तसे न भेटणे तिचे
स्वीकारले आहे जरी
जाणे तिचे असे परी
टोचते आहेच उरी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अलिकडे रोज सकाळी



अलिकडे रोज सकाळी
पाखरांची गोड चिवचिव
मला ऐकू येतेय
आणि माझी सकाळ
सुरमयी होतेय
गाड्यांच्या आवाजाच्या
मधील निस्तब्धतेत
मनावर जणू तरंग उमटतात
रिक्ष्यांचे केकाटणारे आवाज
जेव्हा पार्किंगला स्थिरावतात
नाक्यावरून गाड्या जेव्हा
विना हॉर्न जातात
वाटते जणू आपण बसलोय 
कुठल्यातरी उद्यानात
एक दिवस ती गोड पाखरे
नीट पहावीत म्हणून
मुद्दाम राहिलो गच्चीत बसून
लक्षात आले आवाज येतात
शेजारच्या गच्चीतून
पाहता तिथे डोकावून
दिसला मोठा पिंजरा
ठेवलेला पाखरे भरून
त्यांना तसे पाहून
गेलो मी विषण्ण होऊन
कळले मला माझी ती  
प्रभातही आहे कृत्रिम
तरीपण
त्या पक्षांचे गाण
होते इतके सुंदर की
पिंजरा भिंती अन
ध्वनिप्रदुषण भेदून
माझ्या हृदयात येवून
बसले घर करून
कैद्याच प्राक्तन
आपले स्वीकारून
फुलत होते जीवन
रडणे नाकारून 

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...