बुधवार, ४ एप्रिल, २०१८

मागणे (proposal)



मागणे (proposal)

माझ्या अवगुणांसह
घेणार असशील
मला तू पदरात
टोचल्या वाचून
हसल्या वाचून
बोलल्यावाचून
धिक्कारल्या वाचून
तर आहे काही अर्थ
या जगण्याल्या
आणि सहजीवनाला

तसा मी चांगला आहे
असे लोक म्हणतात
पण तूच मला पाहणार आहेस
आरपार
या जगण्याच्या अंधारात 
नात्याच्या प्रकाशात

दिसतील तुलाच
माझे मातीचे पाय
भटकून आलेले
थकून गेलेले
घेऊन ओझे
दिवसांचे
चालून आलेले
अटळ रस्त्याने
जीवनाच्या
अन विसरुन गेलेले
थांबणे कुणासाठी ही

काही दारिद्र्याचे
काही अपमानाचे
काही वंचनेचे
शल्य आहेत उरात रुतलेले
त्यामुळे कुठली खपली
केव्हा उकलेल अन् दुखावेल
हे मलाही सांगता येणार नाही
कळतील तुलाही ती कधी काळी
फक्त त्यावर बोट ठेवू नकोस
बाकी काही नाही

हळूहळू  जाणेल मी तुला
शिकेल तुझ्या अपेक्षेतून
तुला पाहायला
तू ही घे तसेच जाणून मला 

सर्वगुण संपन्न कुणीही नसते
भगवान कृष्ण अन्
श्रीरामचंद्राकडे ही
बोट दाखवले जाते
नाही तेवढा महान नाही मी !
पण काही चांगले संस्कार
जपले आहेत मी
काही उच्च आदर्श
ठेवले आहेत मी
पण पाय घसरणारच नाही
अशी खात्री नाही मलाही
म्हणूनच तू फक्त
हात घट्ट धरून ठेव
तुझ्या हाताचा आधारावर
अन् विश्वासाच्या नात्यावर
चालेल मी
पापपुण्याच्या सीमारेषेवर
विचलित न होता.

तसा नाही मी अगदी
चार चौघांसारखा
त्याच सुखात विखुरलेला
त्यामुळे
तुझे काही हट्ट अन् अपेक्षा
कदाचित कळणार नाही मला
जगण्यातून जगण्याचा
अर्थ शोधतांना
काही तरी होईल विसरायला

मग कदाचित म्हणशील तू
मी माझे अन् मला
यातच आहे तू गुरफटलेला
अन्  स्वतः त भरकटलेला
तर मग दुसऱ्यास चालायला
जागा असेल का तुझ्या वाटेला

त्यावर मी एवढेच म्हणेन
ते तर मी विचारतोय तुला
जरासा बाजूला ढकलून मला
सवे चालता येईल का तुला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...