मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

मंदिरातला देव अन. . .



मंदिरातला देव अन. . .

कोण म्हणतो देव मंदिरात असतो
अन तो खराही असतो
तुमचे पापपुण्य पाहतो
तुम्हाला बक्षिस वा शिक्षा देतो

अरे तो तर तुमच्या मनाचा
केवळ आरसा असतो
तुमच्या आशेचे प्रतिनिधित्व करतो
कधी तो कृष्ण असतो
कधी तो बुद्ध असतो
इसा कधी तो महावीर होतो

जग जळू लागले तरीही
तो उठून कधी येत नसतो
त्यांचे तुकडेही केले तरीही
तो उलटा वार करत नसतो

कारण सैतानांचा देव
जसा मातीचा असतो
तसा भाविकांचा देवही
मातीचाच असतो
मूर्ती कुठलीही असु देत
रूप कुठलेही दिसू देत
पूजा कुठलीही सजू देत
देव फक्त उपकरण असतो
आपणच केलेले
आपल्यातील
दिवत्वाच्या शोधासाठी
त्याला कधीही जोडू नका
देवळात होणाऱ्या अनाचाराशी
भ्रष्टाचाराशी अन क्रूरतेशी

तसा तर अवघा देश ...
सारे जग मंदिर आहे
तरीही होतात येथे दंगली
घडवल्या जातात कत्तली
निष्पाप अजान पापभिरू
मरतात तडफडत
कधी रक्ताच्या थारोळ्यात
तर कधी विषारी वायूत गुदमरत
प्रत्येक मृत्यू प्रत्येक अनाचार
प्रत्येक अत्याचार असतो
एक लांछन मनुष्य जातीवर
अन् त्या दिव्य मंदिरावर

कुठलाही देव मानू नकोस भाऊ
कुठल्याही मंदिरात नकोस जाऊ
पण मनुष्याच्या कृत्याचे
दोषारोपण करू नकोस
देवतांवर अन् देवळावर
त्या सुंदर प्रेममय रूपकावर
मनुष्याच्या सगळ्यात लाडक्या स्वप्नांवर
समजून घे हे सारे
कारण देव फक्त फक्त तूच आहेस
अन राक्षसही.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...