शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

हसता मी





हसता मी तू हसावे 
अशी अपेक्षा नव्हती
काय करू समोर तू
अन हाती फुले होती

मध्यरात्री प्रकाशाची
पालखी निघाली होती
वाहण्याची खांद्यावरी
भोयास सक्ती नव्हती

हा भाव जीवास होता
संपेल प्रतीक्षा खोटी
कळले तया कधी ना
ती कधी येणार नव्हती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


माझ्या स्वर्गवासी सासऱ्याना ...




पपा ,
तुमचं हसणं बोलणं चालणं
सारं एकमेव होतं
प्रत्येकाचं त्यावर
वेगवेगळ मत होतं
पण खरच सांगतो
तुमचं जगणं मस्त
जीवन रसिकासारख होतं
एक विलक्षण
फकिरी कलंदरपणा
तुमच्यामध्ये भिनला होता
जणू तुमच्या सोडलेल्या
सिगारेटचा बेपर्वा बिनधास्तपणा
तुमच्यात घट्ट राहिला होता
तुम्ही मला कळला होता
असे मी म्हणत नाही
पण तुमच्यावर प्रेम
न करायचं एकही कारण 
मला सापडत नाही
खरतर ,
तुमची दुनिया वेगळी होती
त्या दुनियेत तुम्ही होता
शहेनशहा
त्या जगात इतरांची दखल
तुम्हाला आवडत नव्हती
दखल देणारी माणसं
आणि परिस्थिती जणू
तुम्ही जाणीव पूर्वक
दूर ठेवली होती
या जगात वावरतांना हि
जाणवायचा कधी लधी
तुमचा बेहिशोबी दिलदारपणा
अगदी सम्राटा सारखा
त्याला नसायच अपील
कधीही कुणाचही
अन झालेली अपील
फेटाळली जाणार
हा अलिखित कायदा .
काहीही असो 
हे कलंदर फकीरा
हे दिलदार सम्राटा
प्रिय पपा तुमच्या
मस्त जगण्याला
माझा हा मुजरा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

गोविंदा २






हा बाजार थांबायला हवा
देवाचा धर्माचा
स्वार्थात बरबटल्या
नकदी सणाचा

जत्रा भरू द्या
व्यापार होवू द्या
गावोगावी आनंदाचे
उधान येवूद्या 
पण
लुटलेल्या धनासाठी
झुंजीतल्या बैलागत
लावू नका लढायला
त्या तरुण पोरांना
 
दोन वडा पाव खावून
अर्धी थोडी बिअर पिवून
नुकती मिसरूड फुटलेली
सेना निघते चेव येवून
आणि त्यांचे आई बाप
असतात घरात आपल्या
जीव टांगणीला लावून
संध्याकाळ होई पर्यंत..

ट्रकच्या कडेवर अथवा टपावर
आडवे तिडवे तिघे बाईकवर
पोरं बसतात बिनधास्त
छाती काढून मरणाजवळ

एक पोर मरते
एक जग बुडते
तीन लाख त्यावर
कुणी ओवाळून टाकते 

एक सीमा रेषा हवी
या साऱ्याला
एक बंधन हवे
मग्रुरांच्या साम्राजाला
एक शासन हवे

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

उनाड जगणे




माझे उनाड जगणे
नाही कळत कुणाला
पारा पडला मातीत
येतो कधी का हाताला |
हाय लागता कुणाची
तडा बिलोरी काचेला
कसे पाहावे स्वप्नांना  
मीच दिसेना मजला |
भास होतात उगाच
स्वर्ग चौकोनी सजला
हात लावता तयास  
दिसे अंधार उशाला |
असे आखीव रेखीव
पथ फुलांनी सजला
जाय वनांतरी दूर
कुणी परत न आला |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गोविंदा

रस्त्यावर ओरडत
कर्कश्य किंचाळत
जाणारे गोविंदा,
ट्रक भरलेले
चेहरे पुसलेले
सुटलेले गोविंदा,
शिक्के मारलेले
बनियन घातलेले
बँनरी गोविंदा .
हि शक्ती हा उत्साह
वाहून जात आहे
व्यर्थ रस्त्यावर
धूर्त राजकारण्याच्या
प्रचारकी खेळावर
असेल त्यात आनंद
असेल हि थरार
पण ज्याच्या स्मृतीसाठी
केला जातो हा प्रकार
त्याचे कणभर दर्शनही
या सगळ्यात
मला होत नाही
या गोंधळात या बाजारात
या हुल्लडबाजीत या दादागीरीत
मला दिसत आहे
झुंडीत सापडलेली
अन झुंडीला पकडणारी
रगेल बेदरकार बेहोशी
जी विसरून जावू पाहते
अस्वस्थ अन असमतोल
वर्तमान स्थिती
अन त्यात असलेली
अगतिक बैचेनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

कामचोर माणसं






मला भेटत आहेत
काम टाळणारी माणसं
पैसा पगार घेवूनही
काम नाकारणारी माणसं
अन मी त्यांना काहीही
करु शकत नाही
माझ्याकडे आहे फक्त
थोडीशी विनंती
थाडेसे दडपण
जी ते देवू शकतात
केव्हाही झुगारून ..
आपल्या कोंदणात
घट्ट बसलेली माणसं
नियमांनी वाशिल्यानी
किंवा संघटनेनी
निर्ढावलेली माणसं
हि तीच माणसं असतात
जी हसतात मुलासवे
धावतात प्रियेकडे
हात जोडतात देवापुढे
साजरे करतात
सण उत्सव प्रेमाने
अन रडतात दु:खाने
म्हणजेच माणूसपण
त्यांच्यातले
शाबूत असते अजून
तर मग असे का घडते
का  कामचोरपणा
हि माणसाची
मुलभूत प्रवृतीच असते
 
विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...