बुधवार, २७ जुलै, २०१६

मरेस्तोवर




मातीच्या देहाला
जपावे किती
मातीस मिळणे
मातीला अंती
चार पाच सहा
दशके जीणे
इथले गणित
सदैव उणे
आधिव्याधी कधी
प्रारब्ध आड
वाढते आणिक
मरते झाड
जग रे माणसा
मरेस्तोवर
नाव गाव टिंब
नसे नंतर
विक्रांत सोड रे
व्यर्थ पसारा
आता तरी आत
फिर माघारा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, २३ जुलै, २०१६

श्रावण




       
आजकाल श्रावणात
मन ओले होत नाही
चिंब ऋतू भोवताली
डोळा पाणी येत नाही

लाख सुखे लगडली
देहास भिडत नाही
वृथा छंद जीवास का
लागला कळत नाही   

समजेना का अजुनी
मना उमजत नाही
श्वासामध्ये भिनलेले
स्वप्न हे जळत नाही

तप्त अथांग तृष्णा ही
जीवना सोडत नाही
वर्षावात जळे जन्म  
हृदयात दत्त नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

एक फेसबुक फ्रेंड






तू भेटलीस अन माझ्या
जीवनाचा पासवर्डच बदलला
अन मग पुन्हा पुन्हा लॉगीनचा
सिलसिला सुरु झाला
तुझ्या माझ्यामध्ये हॅकिंगला
कुणालाच जागा नव्हती कधी
तुझी माझी अगदी गट्टी
फायरवाल मधली होती
व्ह्यायरस मालवेअर वगैरे
तर फार लांबच्या गोष्टी होत्या
व्हॉटसप फेसबुकवरील भेटी
त्या अगदी नित्याच्या होत्या
काय काय शेअर केले मी तुला
कविता चित्रांनी वॉलच भरून टाकला
नको त्याही गोष्टी सांगून टाकल्या
हसत पण तू सावरून घेतलेस मला
पण तरीही तू कधी भेटली नाहीस
अन भेटायला ये म्हटली नाहीस
पण खरच सांगतो त्याची
गरजही मला वाटली नाही
मायावी हे जग असते सारे   
असे म्हणतात ज्ञानी सगळे
तसे तर जगणेही व्ह्र्रच्युअलच असते 
हे ही मी होते कुठेतरी वाचले
मग जी मला वाटते अन भेटते  
तू तीच नसशीलही कदाचित
अन मलाही दिसतो तसे
जाणत नसशील तूही कदाचित
पण तुझ्या माझ्या भेटण्याने   
जगणे किती वेगळे झाले
एक नवा आयाम जीवनाला
अन खोली कळण्याला देवून गेले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  


अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...