गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

कुणाची वाट मी पाहतो कशाला



सरलाय गंध
कळतोय मला
विटलाय रंग
दिसतोय मला

प्राणात माझ्या
घट्ट साकळला
जन्म माझा
सलतोय मला

कुणाची वाट मी
पाहतो कशाला
मिटलाय दिन
अंधार उशाला

उत्तरे जहाल
हवी काळजाला
श्वास कोळश्याने
परी काजळला

येती तमातून
अर्थशून्य कळा
हाय जन्म तुझा
हाही वाया गेला

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

केवळ तुझ्याचसाठी






ते डोळयात घातलेले काजळ
म्हणू नकोस नाही माझ्यासाठी
खांद्यावर उधळले केस मोकळे
म्हणू नकोस असे वाऱ्यासाठी  

ते असे बघूनही न बघणे तुझे
ते उगा तुटक तुटक वागणे तुझे
भोगतोय शिक्षा कुठली जणू मी
न केल्या कळल्या गुन्ह्यासाठी

किती डोळ्यात तुला साठवू मी
किती शब्दांना मनी घोळवू मी
काय तुला सांगू अन कितीदातरी  
जगतोय मी केवळ तुझ्याचसाठी

सुटलेले आभाळ घेवून खांद्यावर
तुटलेली वाट जोडून पावलावर
श्वास माझे धडपडतात सखये
फक्त तुझेच गाणे गाण्यासाठी

विक्रांत प्रभाकर





मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

पुणतांबेकर सिस्टर






मिट्ट काळोखाने भरलेल्या गावात
तुम्ही कधी गेला आहात का ?
तिथल्या देवळात शांतपणे जळणारी
पणती तुम्ही कधी पाहिली आहे का  ?
जळण्याचे प्राक्तन घेवून आलेली
अन सर्वांना प्रकाशाचे दान देणारी ,
त्या पणतीला जर मनुष्य रूप भेटले
तर ते पुणतांबेकर सिस्टरांचेच असेल ...
असे म्हणतात ,सोन्याला शुद्ध व्हायला 
त्याला आगीतून जावे लागते
तपश्चर्या असते ती एक
तशीच एक तपश्चर्या त्यांनी केली
त्या आगीचे काही संस्कार
झाले असतील त्यांच्या शब्दावर
पण ते तेवढेच ...
बाकी सारे जीवन उजळलेले
सभोवतालचे आसमंत पाजळलेले
जरी सोबतीला होता सदैव अंधार ..
विझल्याविना काजळल्याविना
दुर्दम्य आशेचे अन सोसण्याचे बळ
घेवून आलेले हे व्यक्तिमत्व
आम्हाला सदैव देत राहीन
शक्ती आत्मबल अन प्रेरणा
जीवनातील कठीण प्रसंगात 
जीवनाला सामोरे जायला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...