रविवार, १ डिसेंबर, २०१३

इनकाऊंटरची बॉडी पाहून ..






एक गोळी सुटते
एक जीवन संपते
एक विश्व हरवते
मेंदूच्या पोकळीत
लुकलुकणाऱ्या
हजारो आठवणी
स्मृतीचे पुंज
विझून जातात
एका क्षणात....

पोलीस म्हणाला
तो गुंड होता
नामचीन
केले होते त्यानं
अनेक खून
घेतल्या खंडण्या
घातले दरोडे
तरीही
इनकाऊंटरवरच्या वेळी
तोही धावला तसाच
प्राणपणान
अन झाला होता
गलितगात्र
पाहून मृत्यू समोर ..

नाकारून त्याला
साऱ्यांनी आपला गळा
होता सोडवून घेतला
शेवटी सर्वांच्या
पाया पडून
रडून भेकून
पत्करावच लागलं
होतं त्याला मरण..

त्याच्या आठवणी
घराच्या दाराच्या
बायकोच्या पोराच्या
आईच्या बापाच्या
शाळेच्या मित्रांच्या
सुखाच्या दु:खाच्या
मैत्रीच्या सुडाच्या
गेल्या होत्या संपून  
ब्लँक आउट होवून....

समोर होता तो
एक निरुपद्रवी
सर्वसाधारण दिसणारा
साडेपाचफुटी देह
अचूक गोळ्यांनी
मर्मस्थानी विंधलेला
त्यान केलेला
एकही गुन्हा
मला माहित नव्हता
तोही मला माहित नव्हता
तरीही तो तरूण देह
संपवावा लागला असा
याच दु:ख माझ्या मनात
दाटून आल होत  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

एक बुद्धिप्रधान दु:ख ..?




केवळ नशिबाने
सत्तेच्या माडीवर बसलेले
चार चाळींचे सरदार
ऐट मारू लागतात
आपल्या पदाचा
आणि
आव आणू लागतात
सर्वज्ञतेचा  
तेव्हा उच्च शिक्षित
समाजातील
सर्वात बुद्धिमान वर्ग
मान घालून गर्क असतो
त्यांच्या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यात
साऱ्याच ज्ञान सूर्यांना
लागते ग्रहण एकाच वेळी
अन काजवे तळपू लागतात
झुंडीझुंडीनी ...

हे मिंधेपण आले कश्याने
ग्रहण लागले कश्याने
म्हणून पाहू जाता
दिसतात ..
आपल्या एका हाताने
त्यांनी झाकलेले आपुले चेहरे
अन दुसरा हात
बांधलेला आपल्याच पोटाला..
त्यांचे बुड असते
अडकलेले
नोकरी नावाच्या हुकात
जे देत जरी असते 
त्यांना मिंधेपणाच्या 
दु:खाच्या वेदना  
अन आश्वासनही
रिटायरमेंटपर्यंत 
मिळणाऱ्या नियमित 
पगाराचे
दाखवते स्वप्न
कधीहि न संपणाऱ्या
पेन्शनचे  
त्या टीचभर पोटासाठी
अन वितभर सुखासाठी
ते करीत असतात
तीच ती खर्डेघाशी  
स्वत: चे सूर्यपण विसरून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

एका मैत्रिणीची जीवनभिलाषा

 
 
किती वेळा मृत्यू तिला
गेला होता स्पर्शून
कधी अपघाती सापडून 
कधी किडनी फेल होवून

प्रसुतीच्या गुंतागुंतीतून
प्राण पणाला लावून
प्रत्येक वेळी पण ती
आली होती जिंकून

किती पाहिले मृत्यू तिन
कधी प्रियजन गेले सोडून
कधी समोर अज्ञात खून
कधी कुणी गेले वाहून

कुणास ठावूक काय
ठरविले होते जीवनान
कि तिला ठेवले मग 
मृत्यूनाक्यावर आणून

असंख्य मृत्यू घडत होते
जिथे असंख्य कारणानं
तिने पहिले सतत
त्यांना अगदी जवळून

आणि तरीही जीवनावरील
प्रेम तिचे विलक्षण
वाहत राहिले तसेच
उसळत कणाकणातून 

अनित्यत्व देहाचे तिला
कधी न गेले स्पर्शून
वा जगण्यामधली नशा
कधी न गेली हरवून

जीवनभिलाषा तिची
अंकुराची कोवळ तीक्ष्ण
जसा खडक तोडून
येई नव्या उन्मेषान 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...