रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

सावज




तसे प्रत्येक स्त्रीला
हे माहित असते
ती केव्हाही कुठेही
होवू शकते सावज
कुठलाही चेहरा
कधीही होवू शकतो
पाशवी कामांध पशु 
या जगात जिथे तिथे
लावलेले असतात
शेकडो फास
शेकडो पारध्यांनी
जे तिच्या न कळत
तिचे सर्वस्व
हिरावून नेवू शकतात
पुन:पुन्हा अन पुन:पुन्हा
मैत्रीच्या नाटकात
प्रेमाच्या आशेत
लग्नाच्या आमिषात
सावज पडतच असतात
एकटेपणी आडजागी
अनोळखी पशूंनी
केलेला हल्ला 
क्लेशकारक असतोच
अस्तित्वाच्या मुळावर
आघात करणारा
पण त्या विरुद्ध निदान
न्याय तरी मागता येतो
अन त्या पशूंना
कधीकधी तरी
कोंबता तरी येते
कारागृहाच्या अंधारात
पण मैत्रीच्या सावलीत
प्रेमाच्या हिरवळीत
नात्याच्या जवळकीत
लपलेल्या सापांचे
काय करायचे
त्यांना कसे ठेचायचे
हा मोठा  प्रश्न आहे

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

सातवीतला राजू गुगळे




सातवीतला राजू गुगळे
कुणास ठावूक
किती सिगारेट प्यायचा
सदा त्याच्या कपड्याला
धुराचा वास यायचा
अभ्यासात कच्चा होता
मित्र परी पक्का होता
सोडतो सोडतो नक्की म्हणून
गुपचूप रोज पीत होता
वाया गेलेला, टारगट वगैरे
त्याला सारी भूषणे होती
मारामारीत वर्गात स्वारी
नेहमीच आघाडीवर होती
रोज शाळेत जातांना
दारी दत्त उभा असे
अन शाळा सुटल्यावर
पाठ कधी सोडत नसे
नको असूनही मैत्री
गळ्यात पडली होती
प्रेमा पुढे त्याच्या माझी
टाळाटाळ हतबल होती
देणे घेणे बाकी तसे
मुळी सुद्धा नव्हते
आवडी निवडी काही
काहीच जुळत नव्हते
पिवळे दात काढून
झिपरे केस पिंजारून
तो येई फक्त आपले
उगाच प्रेम घेवून
आठवीत गेल्यावर
अचानक आले कळून
राजूला घरच्यांनी
दिले होते गावी पाठवून
सुटलो एकदाचा असे
मला क्षणभर गेले वाटून 
परि शाळेतून येतांना
एकटेपण आले दाटून
विना कारण प्रेमाने
काठोकाठ भरलेले
एक जहाज माझे
जणू गेले होते हरवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

साक्षीचे आकाश..




श्वास प्रश्वासाच्या
आरोह अवरोहाला
पाहता पहाता मी
सावध होत गेलो
मनाची बेलगाम 
धाव सजग होवून
न्याहाळू लागलो
पाहतांना त्यात कधी
वाहून जावू लागलो
वाहने लक्षात येताच
पुन्हा मनापासून
वेगळे होवू लागलो
साक्षीच्या अथांग
निळ्या आकाशात
विहार करू लागलो
दृष्ट्त्वाच्या शिखरावर
सावध बसू लागलो
होता होता असे काही
शून्याच्या स्पर्शाचे
संकेत आकळू लागलो .

“अरे हेच तर मिळवायचे होते
मग आजवर टाळले का ?
मीच मला विचारले .
अन मीच उत्तर मला दिले
कारण त्यात
चुकायचे भय होते
स्वत:च स्वत:ला नित्य
सांभाळायचे होते
अन मला तर
सुरक्षित नीट पोहचायचे होते
नक्कीच्या आश्वासनाचे
तिकीट पाहिजे होते

कृष्णाने सांगितलेले कळले
बुद्धाने सांगितलेले कळले
कबीर ज्ञानेश्वर तर
तोंडपाठ झाले होते
तरीही मनाला सुप्त ते
एक आकर्षण होते
साक्षात सद्गुरू कृपेचे
लाघव हवे होते
हात धरून त्यांचा
मज चालायचे होते
जन्मोजन्मीचे संस्कार
सहज का जाणार होते

मध्यान उलटून गेली आहे
नजर जाईल तिथवर
दूर दूरवर केवळ
रस्ताच रस्ता आहे
खूप थांबलो..
खूप थबकलो..
आता धावणे भाग आहे
रस्ता तर कळला आहे
साऱ्या अपेक्षा सोडून
सारे आधार मोडून
स्वत:च्या पायावर
फक्त विश्वास ठेवून
क्षितिजाच्या अंतापर्यंत ...
आता जाणे आहे .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

तर कधी ..नरेंद्र दाभोलकर






समोरच्या व्यक्तीचे अस्तित्व
पुसून टाकण्याएवढी
माणसे का बरे होतात कट्टर ?
धर्म जात भाषा प्रांत
यांचा अट्टाहास का राज्य करतो
माणसाच्या मनावर ?
अहंकाराच्या उदात्तीकरणातून
मारायला अथवा मरायला
उद्युक्त करणारा आवेश
कसा निर्माण होवू शकतो बर ?

कधी ते चढतात फासावर
कधी ते चढवतात फासावर
झाडाच्या फांद्या तोडाव्या तशी  
पडतात माणसांची कलेवर  
हिंसेचे हे तांडव पाहतांना
मनातील माणूस भयभीत होतो

माणसावरील माझाच विश्वास
उडून जावू लागतो
निमित्त होते कधी मार्टिन ल्युथर  
तर कधी ..नरेंद्र दाभोलकर 


डॉ.विक्रांत प्रभाकर  तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

भक्तीचे महा माया जाल



आता आता जरा जराशी
भक्ती करू लागलो आहे
भक्ती करणे हाती नसते
काही समजू लागलो आहे

भक्ती म्हणजे खास काही
तसे वेगळे करणे नसते
अन शरणागती म्हणजे हि
ठरवून शरण जाणे नसते

मन मनाशी उगाच खेळते
परी मना ते ठावूक नसते
सुटले जरी धन दारा सुत 
मन अजून सुटलेले नसते 

इथला सुटला जरी हव्यास
तिथला परी अजून असतो
भक्तीचे हे महा माया जाल
कुणी विरळा एक जाणतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

जीवनाचा पेपर



जीवनाचा पेपर माझा
तसा सोपा नाही
हुशार विध्यार्थी होतो
तेव्हा दया माया नाही
बालपणातील एक वाक्यात
सहज सुटत गेले
गाळलेल्या जागेत पौगंड
थोडे बिथरून गेले
नोकरीही थोडक्यात उत्तर
जरी देवून गेले 
लग्नाचे चूक कि बरोबर
अजूनही नाही कळले
दीर्घ प्रश्न आयुष्याचा
उभा आ वासून आहे
जीवन गुरु समोर अन
छडी हाती घेवून आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

सर्दीने बंद असलेले नाक

 

सर्दीने बंद असलेले नाक
जेव्हा कशाने उघडते
स्वर्गाचे दार उघड्ल्यागत
सुख जणू ते वाटते
मोकळ्या श्वासात
आपल्या नेहमीच्या
किती सुख असते
हे हि तेव्हाच कळते
नाक बंद झाल्यावर
श्वास घेता येत नाही
नीट झोपता येत नाही
धड बोलता येत नाही
शिंकून शिंकून जीवाचे
हाल काही संपत नाही
रुमालाचे काय करायचे
सदा संकट डोई राही
अश्यावेळी डॉक्टर वैद्य
खरे देवदूत वाटतात
छोट्या छोट्या गोळ्या
त्या संजीवनी ठरतात
हुळहुळलेले नाक मग
लाख लाख दुवे देते
ड्रावजीनेस चे संकटहि
अगदी छोटे वाटू लागते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...