शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

ध्यान प्रयोग

सकाळी उठून
करतो ध्यान
जमेना पण ..काही केल्या
नाका लागे धार
शिकाही अपार
प्राणाला आधार ... तो ही मिळेना
घेतला सुंदर     
चहा आलेदार
त्याने ही फार ...फरक पडेना
मग स्मरणी
काढली शोधुनी 
आणि रेटूनी ...घेतले नाम
परी ते अळणी
उगाच होऊनी
उतरेना मनी ...काही केल्या
वदलो भजन
अति आळवून
सोडिले शब्दान... परी भाव
उदास होऊन
काढिले लिहून
ते हे भजन .. माझे आता
अहो नारायण
कृष्ण भगवान

यावे धावून ... दत्तात्रेया 
हाताला धरून
कृपेच्या बळान 
न्यावे चालवून ... अवगुण्या या

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

नवनाथ पोथी वाचल्यावर






नाथाप्रती प्रीती  मनात होती
जरी नव्हती  वाचली पोथी
कसला गूढ  असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ  दडला कथेत
वरील उलटीत  रंजक प्रसंग
साधने विन  न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून  न होये सोय
मागील जन्माची  असून शिदोरी
या जन्मी परी  लागे कष्टावे
इतुके पक्के  ठसले मनात
झालो शरणागत  नाथापायी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१२

निवृतीनाथ





माउलींचे गुरू निवृतीनाथ
तया माझा नमस्कार वारंवार
माऊली निर्झर निवृत्ती पहाड
जनासाठी दिले फोडून अंतर
माऊली मोगरा निवृत्ती काष्ठ
वाढला वेल ज्यांच्या खांदयावर
माऊली चांदण निवृत्ती आकाश
विराजित सौदर्य ज्यांच्या अंकावर
माऊली लावण्य निवृत्ती नटवण
वाढवले सुख त्यांनी अपरंपार
माऊली हिरा निवृत्ती कारागीर
केले उपकार साऱ्या जगावर 

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

चल मागव भर प्याला




चालतांना मिटून डोळे
जर लाथाडीले काही
ते झाले चुकून मित्रा
क्षमा मागतो तरीही

तसे या जिंदगानीला
काहीच अर्थ नाही
बेपर्वा चाल माझी
भान उरलेच नाही

कधी तुटली तावदाने
अन बरबटले गालीचेही
मी मश्गुल स्वत:त च
जगी नव्हतोच कधीही  

नको मागुस भरपाई
मी देणार मुळी नाही
नच पुंडता यात रे
अरे खिशात काही नाही  

नको कणव तुझी मजला
तुझा फुकटचाही सल्ला
चल मागव भर प्याला
बघ घसा सुकून गेला

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

कळू लागल्या पासून राजे





कळू लागल्या पासून राजे
चित्र काढू लागलो तुमचे
मंदिल मोती धारधार नाकाचे
टोकदार दाढी तेजस्वी डोळ्यांचे

पण आता काढत नाही
कारण काढायची गरजच नाही
इतके ते हृदयात ठसले आहे
आमचे हृदयच झाले आहे

तुमचे नाव मनात उमटताच
अनामिक भावनांचा पूर येतो
देहातील पेशी पेशी स्फुरित होतो
कण कण तुम्हाला मुजरा करतो

कवी संत आणि शाहिरांनी
गाईलेले तुमचे तेजस्वी यशोगान
ऐकताच आदरान अभिमानान
ओतप्रोत भरून जाते मन

लाखो मराठी मनातील प्रार्थना
उमलू लागते माझ्या मना
या राजे या आता पुन्हा
इथे फिरूनिया जन्मा 

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...