शनिवार, ८ जून, २०२४

ॲबस्ट्रक्ट


ॲबस्ट्रक्ट
********
शक्यता आणि गृहीतकांचे 
हातातून उडून गेलेले पेपर 
दिसत आहे डोळ्यांना दूरवर 
फडफडतांना वाऱ्यावर 

त्यातील एकही शक्यता 
आता शक्य राहिलेली नाही 
आणि एकही गृहीतक 
अस्तित्वात आलेलं नाही 

आताही आहे हातात 
काही नवे कोरे पेपर 
पण वाटतच नाही 
की लिहावे काही त्यावर 

जगण्यासाठी लिहिलेल्या 
कित्येक योजना केलेल्या कामना
तुटलेल्या ओळींचे कपटे होऊन 
आडवत असतात वाटा 
घेऊन जाणाऱ्या स्वप्नांना

खरंतर त्यांनाही माहित असते 
त्यांची ती अटळ अपूर्णता 
आणि अपूर्णतेची ती टोचणी 
जी थांबवते चित्ता
पुनःपुन्हा लिहिता लिहिता 

तरीही आवडलेले हृदयात ठसलेले 
ते प्रसंग ती जागा अन ते चेहरे 
तरळतात मनात पुन्हा पुन्हा 
अन त्यांच्या कविता होतात

 मग लिहली जातात  
खुळे पणाची धूसर धुरकट
अतृप्त स्वप्नांची काही ॲबस्ट्रक्ट
जी नेतात धरून हात हातात
नेणीवेच्या  साम्राज्यात 
सुखदुःखाच्या अतीत 
तेच फक्त माझे जग असते
खरे तर मीच माझे जग असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, ७ जून, २०२४

गाठ


गाठ
*****

गाठ अवचित पडे
जीवा भुलीचे साकडे 

तुझे व्याकुळले मन
माझे हरवले स्वप्न

प्रश्न गूढ तुझ्या डोळी 
माझे पायी गर्द जाळी 

तुझे जग चार भिंती 
माझी हरवली मिती 

तुझे  शिवलेले ओठ
माझे मौन घनदाट 

तुझे आषाढी आभाळ 
माझे  पुसले काजळ 

पाय फुटले वाटांना 
अंत कुठेच दिसेना

गाठ शून्याची नीरव 
त्यात हरवला जीव 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


बुधवार, ५ जून, २०२४

का न कळे


का न कळे
********
पुन्हा पुन्हा मन रुंजी 
घाले त्याच वाटेवर 
पुन्हा पुन्हा तेच गाणे 
कसे येते ओठावर ॥

कारणांची यादी थोर 
तरी मन अनावर 
आठवांचा आषाढ नि
कोसळतो धुवांधार 

जगण्याचा शाप तरी 
मानुनिया वरदान 
उधळली फुले जरी 
पापणीत सले कण

का न कळे पुन्हा कसे 
चिंब होते माळरान 
हरवल्या जीवनाचे 
फुलू येते तृण पान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ४ जून, २०२४

अतृप्ती

 
अतृप्ती
******
कशासाठी हवा मज 
व्यर्थ सोहळा लांबला
मिटलेल्या सुखामध्ये 
जन्म उगाच चालला ॥
थिजलेले मज्जातंतू 
मंद चेतनेचे द्वार 
वाहतोय क्षण संथ 
अवाक्यात रे अखेर ॥
फुललेल्या ताटव्याचा
रंग गंध सभोवार
धजावेना मनपण 
स्पर्शण्यास हळुवार ॥
म्हणतात कोणी जरी 
क्षणाक्षणा उपभोगा 
भोगातून येई पण
अतृप्तीचं पुन्हा जगा ॥
अतृप्तीचे महाद्वार 
कसे काय ओलांडावे 
दत्तात्रेया तुझ्या द्वारी  
मन कसे वसवावे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ३ जून, २०२४

सोने


सोने
*****
देहावरी सोने सोने हे कुठले 
आले आणि गेले देहो देही ॥१
कितीदा भट्टीत कुणी वितळले 
कितीचा घडले  मोडले रे ॥२
कुणी खणलेले कुणी विकलेले 
कुणी लुटलेले असे तया ॥३
कधी गाडलेले कुठल्या खड्ड्यात 
किंवा खजिण्यात वीट झाले ॥४
कुणी मुकुटात कधी वा गळ्यात
हातात पायात मिरविले ॥५
दिसती कितीक तयाने सुंदर
ललना अपार नटलेल्या ॥६
आज कुण्या हाती उद्या आणि कुण्या
परि कमविण्या धावे जग ॥७
यया सोन्याहुनी असे एक सोने 
हरिनाम सोने जगती या ॥८
सदा सर्व काळी राही तुझ्या सवे 
हरवे नागवे कोणी तया ॥९
 हरिनाम सोने दिले ज्ञानदेवे 
विक्रांत साठवे हृदयात ॥१०
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २ जून, २०२४

मोगरा

मोगरा 
****
रणरणत्या उन्हाळ्यात 
मोगरीला आली चार फुलं 
पांढरीशुभ्र टपोरी 
आकाशातील तारकांशी
स्पर्धा करणारी 
आणि मग मला तुझी 
हटकून आठवण आली

या मोगऱ्याचं आणि तुझं 
असं  नातं आहे की
मोगरा पाहिला की 
तू आठवतेस .

तुझ्या शुभ्र धवल कांतीवर 
रुळणारे चमकदार केस 
आणि त्यात माळलेला मोगरा 
गंधित झालेले वातावरण 
आणि उल्हासित मन

सांगितल्या वाचून 
मागितल्या वाचून
बहरून यायचे असे क्षण 
आणि त्या क्षणात मी 
जायचो माझेपण हरवून
 
तो सुगंध श्वासात दरवळतो 
आणि मनात तू दरवळतेस 
तेच अकृत्रिम स्नेहमय 
हसु गालावर ओठावर घेवून

खरतर मोगरा आणि तू 
यात सुंदर कोण हा प्रश्न 
लाख वेळा मनात आला 
आणि मोगरा प्रत्येक वेळी हरला 

जणू आपली हार मान्य करून 
माझ्या मनात तुझ्या जागेवर 
अलगद येऊन बसला
मग तू मोगरा झालीस 
तुझ्या स्मृती गंध झाल्या 
अन् या मनाचं आकाश 
झालं चांदणं कोजागिरीचं 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ जून, २०२४

तारा केदारे समाज विकास अधिकारी

तारा केदारे (समाज विकास अधिकारी)
********
 म, तु ,अग्रवाल रुग्णालयाच्या क्षितिजावर 
अचानक उगवला एक तारा 
सौम्य स्निग्ध चकाकणारा 
कुठलीही सूचना न देता 
कुठलाही गाजावाजा न करता 
आणि तळपत राहिला 
वाटेवर प्रकाश पाडत राहिला 
किती तरी लोकांच्या 

त्या ताऱ्याला 
नव्हतेच आकाश काबीज करायचे 
नव्हतेच नमस्कार स्वीकारायचे 
त्याला फक्त होते 
कृतार्थ चांदणे बरसायचे 

तो तारा भीत नव्हता 
कधी कुठल्या काळ्या मेघाला 
तो तारा जुमानत नव्हता 
कुठल्याही वादळाला

तो तारा जागत होता 
सहजपणे कर्तव्याला 
त्यात नव्हता आव कठला 
प्रचंड काही करण्याचा
नव्हते दर्शन प्रदर्शन
जाहलेल्या वेचाचा

पश्चिमेला रात्र घडता ढळता  
हलकेच निशा अस्त होता होता
उगवला होता तो तारा
उत्तर दिशा कुस वळवता वळवता 

एक प्रहर दोन प्रहर 
काळाला अर्थ नव्हता 
अर्थ होता देण्याला 
एक ओंजळ दोन ओंजळ
 माप नव्हते मोजायला 
अर्थ होता दातृत्वाला
 म्हटले या ताऱ्याला नाव द्यावे
 तो नावच त्याचे होते तारा 
**

निश्चित राहील त्यांची स्मृती मनात
कारण नावाप्रमाणे तळपणाऱ्या व्यक्ती
या जगात फार कमी असतात 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...