बुधवार, १३ मार्च, २०२४

रुक्मिणीचे पत्र


रुक्मिणीचे पत्र 
************
सागराच्या पलीकडे तुझे घर आहे म्हणे 
लाटा लाटातून येते नित्य तुझे बोलावणे ॥१
मिटताच डोळे माझे  मनोहर रूप दिसे
पुनवेच्या चांदराती सुनिल अंबर जैसे ॥२
लहरत वाऱ्यावर रम्य तुझ्या कथा येती 
तुझे गुण कीर्ती मनी मधुरस उधळती ॥३
म्हणतात साऱ्याजणी रूप गुण संपन्न मी 
तुजविण मज साठी अन्य वर नाही कुणी ॥४
मनोमनी गाठ मग तुजशी मी बांधते रे 
रात्रंदिन ध्यास तुझा तुझ्यातच रंगते रे ॥५
प्रियजन परिणय अन्य कुठे इच्छताती 
सोडूनिया वनराज वृका कुणा शोधताती ?॥६
तुझ्या लीला अवखळ तुझे दिव्य यशोगाण
ऐकताना रात्रंदिन चित्त जाते हरखून ॥७
प्राणातील हाक माझी कानी तव येईल का ?
निरोपाचे पत्र येता धावूनी तू येशील का ? ॥८
हवे तर ने वरुनी हवे तर पळवूनी 
तुजविण नको मज अन्य काही रे जीवनी ॥९
येरे घनश्यामा ये रे नील मेघा सम ये रे 
अन् माझ्या प्रीतीफुला नव संजीवन दे रे ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सता


सत्ता
*****
तयांच्या मनात इवलेसे स्वप्न 
इवल्या स्वप्नात दिसे सिंहासन ॥
इवलीशी गादी सुटता सुटेना 
सत्तेची तहान भागता भागेना ॥
काय कोणा हाती असते रे सत्ता 
अवघ्याचा दाता देव देता घेता ॥
पाहुनी लाथाळी हसू फुटे चित्ता 
कसा खेळविसी तू रे इथे दत्ता ॥
हौस पुरविशी तूच देवराया
कर्मगुणे तया देऊनिया खाया ॥
तरी न भरते कुणाचेच पोट
एकावर एक ताटावर ताट ॥
अंतरी वळली तीच वाट बरी 
चालणे निवांत घेऊनिया झोळी ॥
राजा नच व्हावे कधी रे वेड्यांचा 
भिकारी बरा तो नर्मदा तीरीचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, १२ मार्च, २०२४

प्राणसखा


प्राणसखा
********

स्पर्श सावळा देही भरला
जन्म सुखाचा डोह जाहला ॥१
प्राणा मधला सूर कोवळा
कुण्या ओठाला हळू स्पर्शला ॥२
अन  श्वासांचे होउन गाणे
झाली गंधीत अवघी राने ॥३
कुठे तळ नि कुठे  किनारा
सर्वागावर मोरपिसारा ॥४
कोण असे तू माझ्यामधला 
अंतरबाह्य धुंद एकला  ॥५
प्राणाकार तू प्राण विसावा
प्राणसखा तू दीठी दिसावा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ११ मार्च, २०२४

भान


भान
*****
जिभेने खाऊन टाकले शब्दाला
कानांनी स्वराला शून्य केले १

आहे पण जेव्हा भेटले स्वतःला 
पसारा मिटला मांडलेला ॥२

घडणे घडले मला सांडलेले 
क्षणी जागलेले जिणे झाले ॥३

अज्ञात उमाळे उभे मुळावर 
प्राण प्राणावर तरंगले ॥४

कशाला हवे ते नाम रूप काही 
तुझा तूच राही तुझ्यामध्ये ॥५

जागली खबर माझ्या असण्याची 
अर्थ पिकण्याची वेळ झाली ॥६

देहाविन प्राण प्राणाविन मन 
असल्याचे भान असणाऱ्या ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १० मार्च, २०२४

महफ़िल ए यारा


महफ़िल ए यारा
*****

जेव्हा मित्र जमतात 
आणि सुरू होते  मैफील (महफ़िल)
गप्पांची आठवणींची
भिडतात ग्लासाला ग्लास
मोकळी होऊ लागते
मनाच्या थैलीची गाठ

किती किस्से किती गमती 
ऐकलेल्या असूनही 
पुन्हा पुन्हा ऐकतो आपण
जणू मुरलेल्या लोणच्याची
 लज्जत घेतो आपण

कधी आपल्याच 
तर कधी इतरांच्या 
चुकांना किंवा मूर्खपणाला 
हसता हसता 
उतरते ओझे जगण्याचे 
व्यथांचे , दुःखाचे , त्राग्याचे

ती संध्याकाळ 
जी उगवते खूप दिवसांनी 
जमतात पक्षी वृक्षावर 
येतात दूरून कुठून कुठून 

तिथे व्यवहार नसतो कसलाही 
नसते काही देणे घेणे 
माहीत असते प्रत्येकाला
 हे तर आहे आनंदाचे देणे 

जगणे भेटते जीवनाला 
आपले अस्तित्व विसरून 
पद प्रतिष्ठा गुणदोष 
सारे गुंडाळून ठेवून 

आणि कळते स्वतःलाच 
आपली कमाई जीवनाची 
किंमत आपल्या मित्रांची 
आणि त्यामुळेच आपलीही 

तो अमूल्य काळ  
तो अहं विसरलेला काळ 
तो थांबलेला काळ 
तो जीवणातला सर्वात 
सुंदर काळ असतो 

त्या मित्र मैत्री मैफिलीला
उमटतात लाख सलाम मनात 
आणि क्षण बसतात सजून 
मनाच्या कोंदणात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

आईची बोलणी

आईची बोलणी
************
प्रेमे रागावल्या आईची बोलणी 
पडतात कानी भाग्यवशे ॥१

अगा ती न वाणी कृपेचीच लेणी 
घ्यावीत लेऊनी मनावरी ॥२

कर्तव्य कठोर जरी धारदार 
प्रेमाचा पाझर तयामध्ये ।३

लेकाराने खावे अभ्यासी लागावे
यशोवान व्हावे हीच आस ॥४

पडावे गळून मालिन्य मनाचे 
तामस जगाचे चालताना ॥५

कधी ना पडावा ध्येयाचा विसर
लागून आळस  जीवनात ॥६

याचसाठी चाले सारी आटाआटी 
लाभेविन प्रीती अतोनात ॥७

छिन्नी हातोड्याचा घाव करी देव 
माऊलीचा भाव तैसा असे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ९ मार्च, २०२४

मैयेला मागणं


मैयेला मागणं
**********

मरण आणि तेही नर्मदेच्या तीरावर 
याहून मोठे भाग्य ते काय !
पण असं अपघाती दर्दनाक मरण 
हेही भाग्यच असतं काय ?
विना दैनेन जीवनं विना सायेन मरणं 
हे तर मागणं असतं 
प्रत्येक माणसाचं
तर मग या प्रार्थनेच काय ?
होय मला माहित आहे थेअरी 
प्रारब्ध संचित आणि क्रियामानाची 
कर्माची कर्मफळाची
माहित आहे थेअरी 
वाट्याला असलेल्या श्वासांची 
भाग्यात असलेल्या अन्नाची
माहित आहे थेअरी 
मृत्यूच्या क्षणाची आणि स्थळाची सुद्धा
तरीही वाटतं माई 
तुझ्या तीरावर असं होणं 
हे तुझ्या कीर्तीला लागलेलं दूषण आहे 
तुझ्या प्रतिमेला आलेलं उण आहे
निदान तुला शरण आलेल्या 
तुझ्या लेकरांच्या बाबतीत तरी 
असं होऊ नये
हेच तुला पुन्हा पुन्हा मागणं .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...