मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

दत्तनाथ

दत्तनाथ
********

नाथांचा हा नाथ प्रभू दत्तनाथ 
ठेवी कृपा हात मजवरी ॥१

हरविता जनी सुखरूप आणी 
चुकताच वनी सांभाळतो ॥२

देह कष्टाविन देतसे भाकरी 
पुण्याची चाकरी सेवा काही ॥३

जाळल्या वाचून चालवी आगीत 
कोरडा ठेवीत जळामाजी ॥४

पेटवला भक्ती दीप अंतरात 
तेणे हा विक्रांत सुखी झाला ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

पावुलात


पावुलात
***********
त्या धुंद क्षणात जाग या मनात 
जाणिवेच्या आत होता कोण ॥१

बरसती रंग सभोवती गंध 
आनंदाचा मेघ दाटलेला ॥३

स्वप्न सजलेले देह पिंजलेले 
भान भिजलेले एकरूपी ॥४

हरवू पाहता मुळी हरवेना 
आत्मविलोपणा नाकारून ॥ ५

स्पर्शातले डोळे मिटू मिटू गेले 
काळीज भरले वेणु नादी ॥६

तुच मनी राधा तुच कृष्ण आता 
देह भान चित्ता झाकोळून ॥ ७

विक्रांत वाऱ्यात जळी चांदण्यात
राधा पावुलात रंग झाला ॥ ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

मिलन

मिलन
*****
राधा धारा वाहते प्राणात 
कृष्ण कुटस्थ वसे त्रिकूटात ॥

हालते डुलते अंग नि मोडते 
ढकलून सख्यांना धाव ती घेते ॥

तो निळूला तेजाचा पुतळा 
उभारून बाहू जणू की बिंदूला ॥

गोल्हाट औट ओलांडूनी घाट 
बेभान ती येते जणू की लाट ॥

तिये पदी पेटती लाख लाख तारे 
सुगंधाने भरुनिया वाहतात वारे ॥

अन पडे मिठी घनदाट तेजाची 
हरवते शुद्ध अवघ्या या जगाची ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

प्रतिबिंब

प्रतिबिंब
******
मुग्ध प्रतिबिंब होऊन श्रीदत्त 
आहे तरंगत 
मनात या  ॥१
परंतु जाताच  धरण्या हातात 
नाही सापडत 
काही केल्या ॥२
होतात कल्लोळ लहरींचा नाच 
प्रतिमा ती साच 
हरवते ॥३
अवघ्या जगात तसा तो माझ्यात
परी जाणीवेत 
स्पष्ट कळे ॥४
अभिन्न सतत आहे हृदयात 
मजला पाहत 
माझे डोळा ॥५
अन मी तयात माझिया वाचून 
अवघे घेऊन 
आहे नाही ॥६
शब्द हरवले पाहणे सरले 
विक्रांत नुरले 
लिहणेही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

वाट स्व.सौ सुनिता रा.गायकवाड वहिनीला समर्पित)

वाट .( स्व.सौ सुनिता रा.गायकवाड वहिनीला समर्पित)
*************

अशी वाट अर्ध्यावरती सोडून कोणी जाते का ?
असा रंगला डाव भला मोडून कोणी उठते का ?

आता आताच चंद्र हा माथ्यावरती आला होता !
आता आताच रातराणीचा गंध धुंद भरला होता !

तुला मला कळल्याविना अंधार हा दाटला का ?
गुंफलेला हात हातीचा नकळत असा सुटला का ?

रोजचाच तो निरोप अन् रोजचेच ते भेटणे होते !
रोजचाच तो निरोप मग अंतिम असा ठरला का ?

ज्याचा जयकार केला तो देवही धावला न का ?
मोडून पडले घरटे तया झेलता आले नसते का ?

खूप अजून चालायचे किती काय निभावायचे !
तुझ्याविना पण कळेना माझे मज सावरेल का ?

आता तुझे चित्र समोर अन् अपार या आठवणी !
उडणे न होत नभी तरीही पंंख हे जळतात का  ?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दारी

दारी
***

सदा तुझे येणे व्हावे माझ्या दारी सजलेले 
तुझे स्मित राहो सदा चौकटीत रेखलेले ॥

तोरणात ओघळून सौख्य हिंदोळत जावे 
रांगोळीत रेखाटले मांगल्यही तूच व्हावे ॥

तूच दारी उजळले दीप ते प्रदीप्त व्हावे 
अन तुला पाहताना गाली आसु ओघळावे ॥

तुझ्याविन जगण्याला आण काय मागू आता 
मागितल्यावाचून हे सौख्य आले माझ्या हाता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

निःशब्द गाणे

.निशब्द गाणे
*********
पाण्याचे गाणे 
सागरी भरते 
वाऱ्याचे तराणे
नभी हरवते ॥१ ॥

तसे तुझे माझे 
नसलेले नाते 
उच्चारा वाचूनी 
मजला कळते ॥२ ॥

नाव गावाविण 
रुजते वाढते 
दिक्काली असून 
शून्य म्हणावते ॥३ ॥

म्हणता म्हणता 
धणी न भरते 
विस्तारत जाते 
रूप तुझे घेते ॥४ ॥

कुणा न दिसते 
कुणा न कळते 
माझ्या जगण्याची 
सावली होते ॥५ ॥

सावली हक्काची 
कधी का असते 
नशीबे पांथस्था 
पुण्याने मिळते ॥ ६

विक्रांत छायेत 
सुखे पहुडला
तुझिया मिठीत 
जगण्या भेटला ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...