शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

सुन्न

सुन्न
*****

तो कोपरा या मनाचा अजूनही सुन्न आहे 
ते आकाश जीवनाचे सर्व ऋतूत खिन्न आहे ॥

लाख शोधली कारणे अर्थाविन शून्य आहे 
मीच कारे मलाच का अनुत्तरीत प्रश्न आहे ॥

ते दान दिले दैवाने स्वप्न फुलून आलेले 
ओघळून मातीवरी आज छिन्न भिन्न आहे ॥

नाही जरी तू ती सवे गमते अजून आहे 
शब्द स्पर्शाविन तुझ्या भ्रमित हे मन आहे ॥

जाणतो मी दारात तू थांबली अजून आहे 
जन्म मृत्यू पायरीला मजसाठी बसून आहे ॥

यावेसे वाटते परी शपथेत बांधून आहे 
तुझ्यासाठी जगतोय जगणे थांबून आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

कुठे जावू

कुठे जावू
********
अवघा जाहला व्यय जीवनाचा 
तुझिया प्राप्तीचा लेश नाही ॥१
केले जप तप जरी हिरीरीने 
तीर्थव्रत वने आदरली ॥२
पाहिला बाजार आतला बाहेर 
केला व्यवहार वाट्या आला ॥३
तूवा विसरलो नाही कदा दत्ता 
विरक्त व भोक्ता असतांना ॥४
सुखावलो देवा तुझा म्हणतांना 
पथी चालतांना भेटण्याच्या ॥५
परंतु चालणे नसते भेटणे 
अन आठवणे आलिंगने ॥६
घडेल कै देवा हीच आस जीवी 
आळी पुरवावी मानसीची ॥७
सोडून चरण कुठे जाऊ आणी
विक्रांता ठिकाणी  ज्ञात नाही ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

रान

रान
*****
अतृप्तीचे रान घनावले गर्द 
जातिवंत जर्द 
नाग त्यात ॥१
विकार गरळ मुखी दाटलेले 
क्रूर टपलेले 
डसण्याला ॥२
सरती ना दंश वेदना अपार 
भान थाऱ्यावर 
येत नाही ॥३
मरणा वाचून घडते मरण 
कळल्या वाचून 
जगणे हे ॥४
निळकंठ बाबा करी दया आता 
गुरुदेव दत्ता 
मजवरी ॥५
सोडव हे वेढे पायी पडलेले 
भय दाटलेले 
मरणाचे ॥६
विक्रांत पामर देही नाही बळ 
तुची तू केवळ 
त्राता माझा ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आकाशाचा ताव

आकाशाचा ताव 
************

काय सांगू बंधु तुज माझी माव 
आकाशाचा ताव सदा कोरा ॥१
येतात जातात ढगांची अक्षरे
विचार पाखरे क्षणोक्षणी ॥२
उठे धुळ माती धुरांचे वा लोट 
निर्मळ निघोट सर्वकाळ ॥३
नितळ चांदणे सूर्याची किरणे 
अपार स्पंदने ओत प्रोत ॥४
घेतल्या वाचून घेतच राहतो
मळतो मिळतो नच कदा ॥५
ज्ञान भक्ती योग जीव जन्म भोग 
ओघावीन ओघ उरलेला ॥६
कोणी म्हणे नित्य कोणी म्हणे दत्त
अनामा सतत शून्यी रत ॥७
ठेविले विक्रांत म्हणून हे नाव
थेंबुट्याचा ठाव काय गाव ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

गर्दी

गर्दी
*****

जयंतीला किंवा  उत्सवाला 
गर्दी करणारे वेगळे असतात 
गर्दी जमवणारे वेगळे असतात 
आणि गर्दी सांभाळणारे वेगळेच असतात

गर्दीत जमण्याचे वा गर्दी जमवण्याचे
प्रत्येकाचे कारण वेगळे असते 
बेरीज वजाबाकीही वेगळी असते 

कुणीतरी भावनेची हाळी दिली की 
देवाच्या धर्माच्या कर्माच्या 
शोषणाच्या संघर्षाच्या नावाने 
होतात  गोळा सारी मंडळी
अन आवाज करू लागतात 
बेजार  बेसहारा रस्त्यातून
लाल हिरवे निळे पिवळे 
झेंडे हातात घेऊन

अन मग फाटक्या घरापुढे 
आणि तुटक्या चाळीपुढे
लागतात हजारो रुपयांची बॅनर्स 
आणि झळकतात चेहरे 
भविष्यात येऊ घालणाऱ्या 
महत्त्वाकांशी नेतृत्वाचे
वर्गणी जमणाऱ्या हाताचे 
कायमच बुरुजावर 
राहू इच्छिणाऱ्या सरदारांचे

त्या रस्त्याला नसतं सोयर सुतक
त्या जयंतीचे त्या उत्सवाचे 
त्या रस्त्याला हवी असतात
फक्त चालणारी पाऊलं
आणि धावणारी चाकं 
ती पावलं अडखळतात 
ती चाकं थांबतात 
आणि गंतव्यावर जाणाऱ्या 
प्रत्येक वाटसरूचा हिरमोड होतो 
तो त्यांना व्यक्तही करता येत नाही 
डोळ्यातूनही बोलता येत नाही 
क्वचित कदाचित त्यांनाही त्यातच 
सामील व्हाव लागतं 
नाहीतर ती ठरतात गुन्हेगार .
आणि भोगतात शिक्षा चोरागत
आपल्या न केलेल्या कर्माची

कळपंच मोठी असतात
अन गर्दीच श्रेष्ठ ठरते 
तथाकथित विचारवंतही 
तिथे घेतात नमते .
वाहू द्या गर्दी वाजू द्या डीजे
आपले कान बंद करा 
आणि दार खिडक्या घट्ट लावा 
जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर .
पण त्यांना सांगायला जाऊ नका 
शिकवायला तर मुळीच जाऊ नका

नाहीतर घेतली जाईल तिथे 
तुमचीच शिकवणी
आणि मागावी लागेल क्षमा 
आपलेच दोन्ही कान धरुनी

आणि गर्दी झाल्यावर 
गर्दीच्या गदारोळात जर 
तुम्ही गेला चिरडून
कुणाच्यातरी पायाखाली येऊन 
किंवा उन्हात होरपळून 
वा विजेचा शॉक लागून
किंवा आणखीन कशानं
तर
मिळतील पाच लाख तुम्हाला 
जे येणार नाहीत कधीही तुमच्या कामाला

हे गर्दीचे तथ्य ज्यांना कळते
ते गर्दी व्हायचे नाकारतात
ते उगाचच मार खातात 
पण त्यांना हे स्वीकारावेच लागते
ते सतीचे वाण असते .

पण मला आपलं वाटते
गर्दीत चिरडून मरण्यापेक्षा 
कुठल्यातरी माळरानावर 
विशाल वृक्षा खाली 
सूर्यप्रकाशात किंवा चांदण्यात

 तन् मन व्यापलेले असावे आनंदाने
तेंव्हा मरावे सुखाने

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १६ एप्रिल, २०२३

प्रेम अमरत्व

प्रेमअमरत्व
******

वाटले होते मला 
की मी विसरलोय तुला 
तेव्हा तो शुक्रतारा 
मंदसा हसला मला 
अन यत्नाचा तो डोलारा 
मी बळेच उभारलेला 
क्षणात जमीन दोस्त झाला 
मग माझेच मन म्हणाले मला 
अरे मरण नसते केव्हाच प्रेमाला 
प्रेमाची पात्र दुरावतात 
प्रेमाचे क्षण हरवतात 
संवादही तुटतात 
पण ते अनुभव त्या त्या क्षणाचे 
सदैव चिरंजीव असतात 
हा शुक्रतारा ही संध्याकाळ 
अस्तित्वात असेपर्यंत 
कदाचित हे मन हरवल्यानंतरही 
कुठल्याशा तरंगात 
नवीन वसंतात कुठल्याशा वृक्षावर 
आरूढ होणाऱ्या माधवीगत 
नवीन वर्षाकाळात कुठल्याश्या
पहाडावर कोसळणाऱ्या जलधारागत 
विफलता अनसफलतेचे
सारे शेवट विसरत 
फक्त अस्तित्व होत 
पुन्हा पुन्हा राहील फिरत 
चिरंतन ऋजुतेचे शब्दातीत भावनेचे 
प्रफुल्ल मंगल रूप घेत 
मनामनावर अवतरत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

मातृ दरबारी


मातृ दरबारी
*********"
अंबे तू 
जगदंबे तू 
मातृ भगवती 
वर दे तू  

दीन तृषार्थ
शरणागता 
तव आश्वासक 
कर दे तू

बहु गांजलो 
हिंपुटी झालो
तुझ्या दारी 
बघ  मी आलो

उघड दार 
मजसाठी अन
घास मुखी या
एक दे तू 

किती मागू जग
तुजकडे माय
दिसते अपार
तुष्टी न होय

या साऱ्यातून
ने पार आता
कृपादान मज
हेच दे तू

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...