बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

गाडीवान

गाडीवान
*******

रिकामी रिकामी धावते ही गाडी .
जरी बैल जोडी बलवान ॥

रिकाम्या गाडीला नाही गाडीवान 
नाहीच सामान आत काही ॥

अवघा उतार जीवन अपार 
नाही पैलपार काही कुठे ॥

कुणी ही जोडली कुठे ती चालली 
आठव राहिली नाही कुणा ॥

बैल थकतील रस्ता चुकतील 
किंवा उलथेल गाडी कुठे ॥

विक्रांत नावाची दिसतेय पाटी 
बाकीची माहिती गुलदस्त्यात ॥

दत्ता होई आता तुच गाडीवान 
मुक्कामाचे ठाण दावी मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

बहर


बहर
*****

टाळूनही तुला मज 
का टाळता येत नाही 
लावूनही दरवाजे 
वादळ टळत नाही

पांघरूण देहास तू
किती खोल रुजलेला
वळताच कुस थोडी 
दिसतोस थांबलेला

मी जगतेच भ्रमात 
त्या तुझ्याच  पाहण्यात 
फुलतो मोहोर नवा
बहरून हर क्षणात 

ती झिंग लोचनाची 
या लोचनास यावी 
तव कृष्णकांंती वरी 
मी झुळूक एक व्हावी 

या वेड्या उपमा जरी 
मज त्याच त्याच येती 
प्रत्येक बहरात पण 
आवेग नवीन असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

सोबत

सोबत
******

भक्ती शिणल्या मनात
 झांजा उगाच वाजती 
घोष देवाचा तोंडात 
हाका वाऱ्यात विरती .

जन्म दुःखाचा डोंगर .
जया विश्वासी चढला 
दिसे रिकामा तो माथा 
दुजा पुढे ठेवलेला 

पुन्हा उतार चढाव 
जन्म काळाचा बनाव 
अंती मुठीत आकाश 
तरी चाले धावाधाव 

झाले बहुत खेळून 
आता घ्यावे आवरून 
याच घडी याच क्षणी 
माझे बस्तान बांधून 

किती दमवितो दत्ता 
देई जरा रे उसंत
पथी खिळला विक्रांत
येई करी रे सोबत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

व्हावे


व्हावे
*****

एक आषाढ मेघ होऊन 
ओवाळावा जीव कुणावर 
मागितल्याविन कधी कुणी 
जन्म लुटावा कधी कुणावर 

काय कशास कुणा सांगावे 
डोळ्यातील पण पाणी व्हावे 
अंधार दाटता दीपक लावून 
सूर्य उगवता दूर सरावे 

कुण्या जगण्यास प्रश्न पडता 
दिशा होऊनी उत्तर द्यावे 
अन निरोपी रस्त्याचे ही 
हळुवारसे चुंबन घ्यावे 

घेण्या वाचून देण्यामधले 
सुख नभाला कुणी पुसावे 
जलाशयाच्या पृष्ठावरती 
नसून कधी असणे व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


भक्ती अंकुर


भक्ती अंकुर 
**********
स्वप्न रुजले
स्वप्न सजले 
आकाशाविन 
आधारावीन 

बीज फुटून 
अंकुर झाले 
अर्थ जीवना
घेवून आले

या जन्माचे
माहित नाही
त्या जन्माचा 
पत्ताच नाही

तरीही ठाम 
होऊन बेभान
कातळाला 
उभे भिडले

किती सुंदर
असते फुटणे
आपण असे 
हरवून जाणे 

पर्वा असून 
भान ठेवून
उगा स्वतःला 
वाहून घेणे

इवले बाहू 
कुणी पसरून 
अनंताला त्या 
कवेत घेतले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

दत्त रिक्त

दत्त रिक्त
********
दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला 
दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला 

दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला 
दत्त संस्कार जंजाळ दूर सोडुनिया आला 

दत्त रिक्त अस्तित्वात फक्त एकटा उरला 
मी तो आहे रे इथेच शब्द सोडून वदला 

आहे पणात थांबला ओघ काळाचा नसला 
दत्त जाणीव सतत दिवा पेटवून गेला 

नाव ओढून विक्रांत नांदे व्यर्थ जगताला 
मित्र जीवलग प्रभू आणू पाहतो शुद्धीला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘o☘l☘d☘1☘20

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

दुवा

दुवा
****

तुझ्या डोळ्यातील दुःख 
माझ्या कविता होतात 
तुला हास मी सांगतो 
कळा हृदयी येतात 

तुझ्या ठाऊक न कथा 
तुझ्या ठाऊक न व्यथा
मना व्यथित करिती 
खिन्न विषण्ण त्या छटा 

नको सांगूस तू काही 
मी ही विचारत नाही 
दुःख वाटावे  वाटता
साद घालुनिया पाही 

रंग उधळले तुझे
स्वप्न होऊ देत खरे
अन जाऊ दे पांगले
मेघ अकाली दाटले

शब्द काजळा दडले
तुझ्यासाठी मी लिहिले
तुज ठाव जरी नाही
लाख दुव्यांनी भरले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...