गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

सावळ्याची सखी

सावळ्याची सखी
**************

सावळ्याची सखी 
असे तू सावळी 
घन ओघळली 
रेशमी सावली 

घनगर्द बटा 
आकाश वादळी 
चिंब निरागस 
जलभार डोळी 

शब्द किती तव
अडलेले ओठी 
आणिक गुपिते 
दडलेली पोटी 

कोणास सांगावे 
तुज न कळते 
आकाश दाटले 
शिखर शोधते 

नकोच शोधूस
तो मुग्ध सावळा 
बघता अंतरी
दिसेल तुजला 

शब्दातील अर्थ
शब्दात राहू दे
मौनातच बोल
तव मावळू दे
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

वीज

वीज
***:
लोभस लाजरी 
तेजस साजरी 
वीज जरतारी 
नभाचे नगरी 

चपळ मासोळी 
लखलखे जळी 
टपोऱल्या डोळी 
आव्हान कट्यारी 

मोकळा संभार 
मेघ भाळावर 
तेजाळ तर्रार 
नयनाचे तीर 

सवे अवखळ 
बाल्यही खट्याळ 
करी कलकल 
झराची चंचल 

झेलावी ही सर 
वाटे क्षणभर 
होय थरथर 
वृक्ष पानावर 

घनघोर वारा 
पळ खिळलेला 
अंतरी बाहेरी 
प्रकाश कोवळा

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

रंगणे


रंगणे
*****

मागणे ते काही 
तुज आता नाही 
ठेव तुझ्यापायी 
सदोदित ॥

भेट किंवा भेटू -
नकोस तु देवा 
सगुणाचा ठेवा
तुझी मर्जी ॥

तुज शोधतांना 
जग हे कळले 
जगणे वळले 
बरे काही ॥

कळू आले माझे
इवलेसे पण 
मन बुद्धी मन 
अहंकार ॥

दिसले जगत 
मायेच्या सकट 
राहूनिया आत 
तिच्यात ते ॥

वाहते हे जग 
पाहतो हे जग 
मनाचे ते वेग 
वेगळा मी ॥

दिले दत्तात्रेया 
देखणे दिसणे 
वेगळे नेसणे 
नेसणारा॥

विक्रांत वेढले
रूपा नाम ज्याने 
तयात रंगणे 
निराळे रे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

समर्था माहेर


समर्था माहेरा
**********
समर्था माहेरा बोलावं गे मला 
आलाय कंटाळा सासरचा ॥१॥
संसार ही सासु लावते कामाला 
चेैन या जीवाला पडेना ची ॥२॥
एक सुटताच दुजे  पुढे काम
 मुळी ना विश्राम अंतरात॥३॥
नणंद नाठाळ करी चळवळ 
न दे एक पळ मज लागी ॥४॥
दावतसे स्वप्न गोड बोलातून 
घेते राबवून इथे-तिथे ॥५॥
अडल्या कार्याचा म्हातारा सासरा 
म्हणतो आवरा सर्वकाळ ॥६॥
आळस जीवाची जावही जन्माची 
सवे मज लुच्ची हळू नेई॥७॥
उनाड तो दिर धावे जगभर 
भुके किरकिर मग करे ॥८॥
आणि माझे ध्यान त्याचा पत्ता नाही 
नावालाच पाही माळ गळा ॥९॥
विक्रांत बहुत  खेळी या धावला
येऊन घराला जाई आता ॥१०॥
तुझ्या कुशीत राहील गे माय 
अमृताची साय होऊनिया॥११॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

२६७

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

रागावल्या नंतर

रागावल्यानंतर
***********

काहीसे तुटक दुखावले आत
होते शब्द रुष्ट तुझिया ओठात ॥

ठेवीन तुजला सदा आनंदात 
जरी ठरविले होते मी मनात ॥

काय करू पण चुकलेच कुठे 
अनवधानाने जशी काच तुटे ॥

पण त्या चुकीत नसे प्रतारणा 
दुराव्यात काय मिटतात खुणा ॥

मग भेटलीस पुन्हा एकवार 
फुलला मोहर धुंद मनावर ॥

हरखल्या जीवी गुंजे तव नाव 
डोळ्यात उमटे तोच प्रेमभाव ॥

सोडना गं सखी खोटा राग आता
देई पुन्हा तव हात माझ्या हाता ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, २३ जानेवारी, २०२२

पडदा

पडदा
******
भक्तीच्या सुखात 
द्वैते सुखावतो
दत्ताला पाहतो 
दुजेपणी ॥

कोणअसे दत्त 
कोण असे भक्त 
जरी ना जाणत 
अंतर ते ॥

पापा सवे गेले
सारे माझे पुण्य
मनी नाही अन्य
तया वीन ॥

घडेल हे जीने 
लिहिल मी गाणे
हसणे रडणे 
दिसेल रे॥

पडद्याचे भान
परी पडद्याला 
लागले यायला 
दत्त कृपे ॥

विक्रांत नावाची
चालली लहर
पाणी पाण्यावर 
आरूढले॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

अनंत


अनंत
********

दूरचे आकाश 
दूरचा प्रकाश 
मज जगण्यास 
आकारते॥

तया आकाशाचे
कोण रे आकाश 
प्रकाशा प्रकाश 
कोण देते ॥

मातीतून कण
येती उगवून 
करती पोषण 
देहाचे या ॥

मातीत सृजन 
करत जीवन 
एक एका विन
कामी न ये ॥

अशी विलक्षण 
सृष्टीची ही रचून
असतो भरून 
कोण इथे ॥

विक्रांत निशब्द
पाहून अनंत 
जोडतसे हात 
आपोआप ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...