गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

उदास गाणे


माझे उदास हे गाणे
 दत्ता टाक रे पुसून 
किंवा भिजलेल्या मनी 
दैवी ठिणगी पाडून

 वृक्ष वाढला उठला 
झाले जगणे जगून 
वाट पाहतो विजेची 
दोन्ही हात पसरून 

वाट एकेक मिटली 
गेली कड्या त पडून 
दार भिंतीत चिणून 
गेलो स्वतःला कोंडून 

आता जगतो तमात 
डोळे स्पर्शाचे होऊन
अन सरावलो असा
 राही प्रकाशा वाचून 

किती ठोठावले दार
 झाले डोके आपटून 
जाणे घडणार नाही
 तुझ्या कृपेच्या वाजून 

लाज वाटते आता 
असे निरर्थक जगून 
करी शेवट अवघा 
जावा विक्रांत मिटून


विझू देत

विझू देत
+***+
माझ्या विझल्या आगीत 
का ग जिंदगी शोधते 
नको उकरूस धुनी
तिथे ठिणगी नांदते ॥

गेला जळूनिया सारा
जरी इथला पसारा 
उब जाणवे हवीशी 
आत जळता निखारा 

नको घालूस फुंकर 
आता विझू दे निवांत 
स्वप्न सरतात सारी 
निवू घालता काळात 

कुणी उचलून भस्म 
लावून देत भाळावरी 
नच भाग्य जरी तेही 
जाऊ देत वाऱ्यावरी

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

दत्त लळा

दत्त लळा
*******
उंबरा वरती 
बसला कावळा 
खातसे फळाला 
आवडीने ॥१

पोटा परी पोट
भरे याचे पूर्ण 
भजल्या वाचून 
दत्त लाभ ॥२

तैसा हा विक्रांत 
दत्ताच्या दारात 
आला रे चालत 
सुखालागी ॥३

सुखही मिळाली 
मिळे समाधान 
दत्त हे निधान 
सापडले ॥४

किती भाग्यवान 
असे हा कावळा 
लागे दत्त लळा 
अनायसे ॥५
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १० जानेवारी, २०२२

स्वामी माय


स्वामी माय
*******

स्वामी समर्था 
श्री अवधूता 
जीवन आता 
तुमचे हाता ॥

बहु खेळलो 
बहु थकलो 
पुन्हा तुमच्या 
चरणी आलो ॥

कुठे पडलो 
आणि रडलो 
आता भुकेने 
व्याकूळ झालो ॥

धावत येई
कडेस घेई
तव प्रीतीचे 
भोजन देई ॥

बाळ तुमचा
अज्ञ विक्रांत 
घास भक्तीचा
घाली मुखात ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गमजा

गमजा
*****

तुझे गीत गातो 
किर्ती वाखाणतो 
जगाला सांगतो 
दत्त माझा ॥

जया न पाहिले 
जया न जाणिले 
नाते हे जोडले 
बळे जरी ॥

ही तो असे तर्‍हा 
साऱ्या दुर्बलांची 
गाठ सबलांची 
मारायला ॥

दूर्बळांची जीणे 
असे फरफटणे 
लाज नाही उणे 
जरी काही ॥

सवे माझ्यापण 
तुज हीनपण 
दत्ता ते येऊन 
लागू नये ॥

विक्रांत मातीचा 
जाऊ दे मातीत 
उणे तव किर्तीत
येऊ नये ॥

म्हणून सांगतो 
जगा ओरडून 
असे भक्तीहिन 
कोरडा मी ॥

लायकी वाचून 
मारतो गमजा 
काय ते समजा 
तुम्ही लोक ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


रविवार, ९ जानेवारी, २०२२

यावे ज्ञानदेवा


यावे ज्ञानदेवा
**********

निवृत्ती सोबत 
यावे ज्ञानदेवा 
माझिया जीवा 
सुख द्यावे ॥

थोर गुरुतत्व 
प्रत्यक्ष दैवत 
धरून मनात 
लीन व्हावे॥

सोपाना सोबत 
यावे ज्ञानदेवा 
धन्य तो पहावा 
श्रेष्ठ बंधू ॥

शिष्य तो पहीला
तुमचा महान
पाहून नयन 
भरू यावे ॥

मुक्ताई सोबत 
यावे ज्ञानदेवा 
माय चांगदेवा 
जाहली जी ॥

निवविले जिने 
आपुले अंतर 
घालून फुंकर 
हळुवार ॥

उपजे धिंवसा
विक्रांत मनात 
रहा  ह्रदयात 
सारेजण ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

उपकार

{photo .from internet.}
उपकार 
******

जा उधळीत रूप तू
तुझाच बाजार आहे 
मी एकटा कुठे इथे 
हे दर्दी हजार आहे 

तू पाहू नकोस कधी 
दिसणे मुश्किल आहे 
दाटून आभाळ थोर
तुझा जयकार आहे 

नच मागतो तुला मी 
हि स्वप्न हजार आहे 
नि वार काळजावर 
जे माझे उधार आहे 

किती चोरले कटाक्ष 
चुकवीत या जगाला 
देऊ कसा त्या परत 
जगण्या आधार आहे 

तू येऊ नकोस कधी
दुनिया आबाद आहे 
तू भेटलीस काय हा
कमी उपकार आहे

जगतो येथे विक्रांत 
स्मृतीत राहतो आहे 
पाहतो सदा अंतरी
तुझाच वावर आहे  

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...