रविवार, २६ डिसेंबर, २०२१

ज्ञानदेव कृपा

ज्ञानदेव कृपा
**********

ज्ञानदेवे केला 
दीनांचा उद्धार 
पतिता आधार 
होऊनिया ॥१

जातीभेदा चूड 
लावली पहिली 
गुढी उभारली 
मानव्याची ॥२

विटाळ चांडाळ 
धर्माला किटाळ
मनास भोंगळ 
मोडियले ॥३

देवाचिया दारी 
समान ते सारी 
विश्व वारकरी 
सिद्ध केले ॥४

नेली ज्ञानगंगा 
गीर्वाणी कुटिरी 
भगीरथा भारी 
कृती केली ॥५

विश्व पुरुषाच्या 
हृदयात दिवा 
जाणिवेचा नवा 
पेटविला ॥६

अमृत ते कण 
वेचतो विक्रांत 
होत ऋणाईत
जन्माचा हा ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

माणूस माझे नाव


माणूस माझे नाव
******

माणूस माझे नाव रे
धरती माझे गाव रे 
जाणतात सारे परी
कुठाय बंधूभाव रे ॥१

कुणी म्हणतो तावाने
अरे माझा धर्म मोठा 
सोडुनिया तुझ्या वाटा
सामील हो माझ्या गोटा ॥२

पैसा घेई हवा तर 
मार खाई नाहीतर
असे कर वा तसे ते
मरशील नाहीतर  ॥३

कोणी जगतो भिकारी 
भीक मागे दारोदारी
कोणी धनिक नशीबी
देैवाची का लीला सारी ॥४

माणुस  नाव तुझे ही
माणूस नाव माझे ही  
परंतु तू तो मी नाही
श्रेष्ठ सदा श्रेष्ठ राही ॥५

तुझी जात खालची
माझी जवळी राजाची
मैत्री ही मैत्री पुरती
बात न रोटी बेटीची ॥६

जरी माणूस समान
मन बुध्दि असे एक 
रंग वंश जात धर्म 
करती भेद अनेक ॥८

या भेदाच्या पलिकडे 
एक दोघे फक्त जाती
बाकी सारी आंधळी ती
त्या डबक्यात राहती ॥९

माणूस माणुस आम्ही
वर वरचि म्हणती
डर डरावाच्या भेदी
घरे आपुली  भरती ॥१०

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

काही गूढ प्रश्न

काही गूढ प्रश्न 
=========
उमटण्याआधीच रे
प्रश्नही  पुसून गेले 
उत्तराचे भाग्य थोर 
मग हरवून गेले ॥

तसे पाहीले तर तो 
पेपर सोपा  नव्हता 
कधी नच वाट्या आला 
विषयाचा स्पर्श होता ॥

खरे खोटे त्यात काही 
कळण्या मार्ग नव्हता
म्हटले तर खेळला 
नकळत  डाव  होता॥

डोळ्यावर काचा काळ्या 
खोल किती असे ठाव 
पाहण्यास पाहणाऱ्या 
नव्हता मुळीच वाव ॥

तरी उडी घेतली नि 
काच काळी तडकली 
काच असे काच अंती 
उगाच कापून गेली ॥

कापलेच काही जरी 
घाव खोल नसे तरी 
डोळीयांची चिंता का रे 
सदोदित असे उरी ॥

ते ही गूढ हे  ही गूढ 
गूढ असे सारे  काही 
प्रश्न हवा होता तरी  
सुटल्या तो वाचूनही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

https://kavitesathikavita.blogspot.com 

☘☘☘☘☘☘

रिपू




रिपू 
........

एक एक रिपू 
काढ रे  शोधून 
टाक रे मोडून  
दत्तात्रेया  

माजलेले तन 
अभद्र ते हीन 
तया उपटून 
फेक दूर  

रुद्र तू होवून 
त्रिशूळ घेऊन 
टाक संहारून 
पूर्णतया 

मग मी रे मनी 
निरार्त होवून 
तुझ्यात  रंगून 
जाईल रे  

सवे तुझ्या येण्या 
सज्ज हा  विक्रांत
शस्त्र दे हातात 
कृपा दान

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

साधना

साधना
******

अग माझे जीव्हे 
दत्त नाम घेई 
गुरु नाम घेई 
सर्वकाळ ॥

अरे माझे डोळा 
दत्त रूप पाही 
त्रिकुटात राही 
रंगलेला ॥

अगा माझी बुद्धी 
दत्त माया जाण 
ठेवी स्व चे भान 
शब्दातीत ॥

अरे माझ्या मना 
राहु नको उणा 
कधी दत्ता विना 
वृतीव्याप्त ॥

करा हे हातांनो
दत्ताचे पूजन 
आणिक चरण 
प्रदक्षिणा ॥

हृदया रे घडो 
सदा धडधड 
जणू दत्त दत्त 
रात्रंदिन ॥

नको अहंकारा
येऊ खरोखर 
दत्त पायावर 
राहा लीन ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

नर नारी


नर नारी 
******

काय शाप माणसाला इथे मनाचाच आहे
जळते अखंड आग सूर्य तसाच आहे ॥१

कसे वेग वासनांचे उठतात आदीम जे 
तोडला वृक्ष कितीदा उभा तसाच आहे ॥२

सरणार ना कधीच का या हट्ट जीवनाचा 
हव्यास सृजनाचा जीवना तसाच आहे॥३

म्हटले जरी विसरू तो साराच भुतकाळ
स्मृतीवरी सोनियाचा तो डाग तसाच आहे .॥४

कुणास कशास आता हा द्य‍ावा नवीन साचा 
घडला जसा की नंदी दारात तसाच आहे ॥५

तो दाह जाणतो मी नारी तुझ्या मनाचा 
दे लाख जन्म पुरूषा गर्भ तसाच आहे ॥६

घेवून कामना कोटी वाहती किती सरीता
झेलून प्रवाह पोटी सागर तसाच आहे ॥७॥

हरवला ध्यानी जरी धरून दत्त ह्रदया
पाहतो स्वत:स सदा विक्रांत तसाच आहे ॥८॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘














चूक

चूक
*****

त्या तुझ्या दुनियेत जरा जाऊन आलो 
हरवलो होतो कुठे ते पाहुनी मी आलो ॥

लाख स्वप्ने होती निखळून पडलेली 
ठसे त्या वरचे हळू पुसून मी आलो ॥

मुग्ध तुझे हासू कणोकणी होते कुठे
ठेवले चोरून तयास वेचून मी आलो ॥

भेटायचा तुझ्या जरी नव्हताच भरोसा 
नशिबाची सोंगटी तरी टाकून मी आलो 

हसणार नाही तू आता रडणार नाही 
बंद दारास त्या कडी लावून मी आलो 

किती आग विझली ती बघावयास गेलो 
पण तीच धग जाणवून जळून मी आलो 

सुखामध्ये कोण किती दु:खी कोण आहे 
तीच चूक शोधायची पुन्हा करून मी आलो

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...