रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

संसार

संसार 
*****
एकदा संसाराचा गाडा 
ओढायचा ठरल्यावर 
नाकात टोचणाऱ्या 
वेसणीचे दुःख करून 
कसे चालणार 

आपल्या मानेवरती जू 
आपल्याला जडच वाटणार 
रग तर त्या ही खांद्या लागली 
हे आपणास कसे कळणार 

रस्त्याच्या कुठल्या बाजूला 
हिरवळ अन 
कुठल्या काटे असणार 
हे जो दावणीला बांधतो 
त्यालाच ठाऊक असणार 

शेवटी मुक्कामावर 
पोहोचलो की
आपल्यापुरते काम सरणार 
मध्येच कोणी थांबले तर 
अडले तर
तर गाडा नक्कीच अडणार

कारण
जोवर अस्तित्व असणार
तोवर 
नाही रस्ता संपणार  
वा चालणे थांबणार 

तर मग कुरकुर कशाला
अन  क्षणोक्षणी उमटणारे
दिर्घ सुस्कारे कशाला?


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

जाणीवेचा छंद

जाणीव
******

जाणीवेचा छंद 
लागला जिवाला 
संसार जाहला 
तटस्थचि ॥

शब्द बुडबुडे 
उगी उगी झाले 
निशब्दी रंगले 
क्षण सारे ॥

माझे पण मला 
बहु आवडले 
सुख पाणावले 
पुन्हा पुन्हा ॥

जाणिवेचा दिन 
आज उगवला 
भरून राहिला 
जीवभान ॥

काय शोधायचे 
कळू आले मला 
नाही शोधायला 
जरी काही.॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

ती

ती
***

एक दिवस अचानक 
हायवेच्या बस थांब्यावर 
दिसली मला ती उभी रस्त्यावर 
घेऊन बॅग खांद्यावर 
थोडी अस्वस्थता होती चेहऱ्यावर 
अन बैचेन तिची नजर 
जात होती घड्याळावर 
काही क्षण मनात झाली खळबळ
थांबावे की जावे पुढे 
भेटावे का ? बोलावे का?

माहीत होते
हाय म्हणेल ती.
बरी व्यवहारी वागेल ती 
काही चौकशी करेल ती 
तेवढी तरी मैत्री होती अजून

पण पाय नाहीच पडला ब्रेकवर 
अन हात तसेच राहिले 
एक्सलेटरवर 
त्याच गतीत 
गेलो थोडा दूरवर 
डाव्या बाजुचा मिरर 
उगाचच पाहत
पण एवढाचा आरसा
क्षणाचा  कवडसा
किती अन काय दाखवणार

तशीच दिसते ती अजून 
ड्रेसचा सेन्स नसला तरीही
केस तसेच करडे काळे 
चष्मा मागील भुरके डोळे 
गालावर फिकुटली लाली 
रंग गोरटी बटा भाळी

निसटुन गेले होते धागे
बसल्या वाचून काही गाठी 
जखमा गेलेल्या भरून 
व्रणही गेलेले मिटून
पाणी गेले होते वाहून 
वावरात वळल्या वाचून 

पण तरीही दुसऱ्या दिवशी 
त्या थांब्यावर 
का कशी गती गाडीची 
उगाच मंदावली 
खुळी नजर  भिरभिरली

एक निर्रथक वलय 
उमटले पाण्यावर 
अन हरवले पाण्यावर 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

आठवण

आठवण
*******

प्रत्येक जीव असतो 
मेघ एक आठवांचा 
मी पणाला अर्थ घट्ट 
कण एक अस्तित्वाचा

हरवती आठवणी 
कधी येतात जागून
तर काही बसतात 
ठाण ह्रदयी मांडून 

पुसतो म्हणून कधी 
आठव नच पुसते 
नको तीच नेहमी का 
मना छळत असते 

खरंच का असतात 
आपल्या या आठवणी 
भावनांच्या प्रवाहात 
नेतात अन खेचूनी 

शब्द रूप संवेदना 
जाणीवेत तरंगती 
मीपणाची हालचाल 
उगाच जागी ठेवती 

आठवांच्या गदारोळी 
विसरते आठवण 
मी कोण आलो कुठून 
जाते खोल दडपून


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

सोहं सरोवरी


सोहं सरोवरी
**********

काडसिद्ध पथे गेलो 
सिद्धरामेश्वर घरा 
दत्त निसर्ग भेटला 
उभा जाळ शब्दातला 

वृक्ष भाऊराव तेथे 
चहूबाजू विस्तारला 
मूळ निम्बर्गी ते खोल
रस सोहम ओतला 

गेली निंबाळी कन्हेरी 
प्रेमगंगा ही पावन 
कलकलतो तरंग 
उसळून आहे पण 

नाथ रेवनाचे बीज 
दत्त म्हणे  घे हसून 
मार्ग सारेच नेतात 
त्याचं लक्षी रे ओढून 

काका निकम प्रेमळ 
झाले निमित्त कृपेला 
प्रेमे नेवूनिया हंस
सोहं सरोवरी केला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .


बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

रूजले बीज

रूजले बीज
*****

रुजले बीज 
भिजले बीज 
आज आले फळाला ॥

केली त्वरा 
देऊन वरा 
मीन बांधला गळाला ॥

बळे आलो 
शिष्य झालो 
मेवा मिळाला भुकेला ॥

पुण्य फळले 
वृक्ष जाहले 
अर्थ कळाला मूढाला ॥

भक्ती नसून 
सेवे वाचून 
मेघ ओळला थोरला ॥

कोण दातार 
कोण घेणार 
स्वार्थ नसल्या कृपेला ॥

खूण विक्रांत 
आली ध्यानात 
मोड फुटला भाग्याला॥

जरी ना मेलो 
परी मिटलो
तपच आले दाराला 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

तुच जाणतोस

तुच जाणतोस 
***********

तूच जाणतोच 
माझा खटाटोप 
मांडलेला व्याप 
प्रेम बळे ॥

तूच जाणतोस 
केलेली प्रार्थना 
गर्जना याचना 
ऐश्या तैश्या ॥

तूच दिली जाण
कळे मूर्खपण 
रडणं भेकणं 
थांबविले ॥

हरक्षणी तूच 
आहे सभोवती 
खुळी द्वैत दृष्टी 
मावळली ॥

आता मी पाण्यात 
भरलेला माठ 
आला गेला भ्रांत 
भीती नाही ॥

मावळल्या चिंता 
भ्रमाचा आकार 
जन्माचा प्रकार 
कळू आला ॥

अवघा उजेड 
जाणवतो अरे
चंद्र सूर्य तारे 
जाणीवेत ॥

विक्रांत फुटका 
देहात भरला 
परंतु सुटला 
दत्त कृपे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...