मंगळवार, २७ जुलै, २०२१

व्यापार

 
व्यापार
******

उद्याचा व्यापार 
दिला मी सोडून 
टाकले मोडून 
दुकानाला ॥

चोरी गेले सारे 
ज्याचे त्यांनी नेले 
मुद्दल दिधले 
बुडीताला ॥

आता सारी चिंता 
वाहू दे दत्ताला 
जामीन ठेवला 
तयालाच ॥

घालील तो खेटे 
उगा परोपरी 
दृष्टी माझ्यावरी 
ठेवील गा ॥

विक्रांत तोट्यात 
जरी का जगात 
लाभला भाग्यात 
व्यवहार ॥

ऐसा हा उद्यम 
मांडे फायद्याचा 
कृपाळू भिक्षेचा 
याचक मी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  d.

सोमवार, २६ जुलै, २०२१

दत्त प्रेमाची गोष्ट

 
दत्त प्रेमाची गोष्ट 
*************

तुझिया प्रीतीची 
ऐकून कवणे 
भक्तांची वचने 
प्रियकर ॥

प्रेमाने डोळ्यात
आसवे भरती 
उरी उमटती 
प्रेम उर्मी ॥

भावना देऊळ 
अंतरी कोवळ 
अंगी वज्रबळ
संचारते ॥

जीवास आधार 
श्रद्धेला जोजार 
प्रेमास अपार 
पूर येतो ॥

ऐसे तुझे दूत
हक्काचे हकारी 
असे माझ्यावरी 
ऋण त्यांचे ॥

तयांच्या कथेचे 
करतो श्रवण 
ओथंबते मन 
भाव भरी ॥

विक्रांत प्रेमाची 
गोष्ट एक होवो 
दत्तराय देवो
क्षेम प्रेम ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता .

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  .
*****



आषाढी एकादशीला
संपूर्ण हा झाला 
अभ्यास चालला 
लिहूनिया॥१

योगायोग बरा
जुळून हा आला 
तेणे या मनाला 
तोष झाला ॥२

काय किती कळले
आत उतरले  
जरी न उमजले 
मज लागी ॥३

परी झाली सोबत 
ज्ञानदेवा संगत 
शब्दांशी खेळत 
अनायसे ॥४

येणे सुखावलो 
भुके व्याकुळलो 
दारी मी पातलो 
मावूलीच्या ॥५

पांडुरंगा दत्ता 
विक्रांत हा चित्ता
स्वरुपात आता
वास करो  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



)



रविवार, २५ जुलै, २०२१

चालावी ती वाट


चालावी ती वाट
************

भक्तीविना देव 
न पवे सर्वथा 
सांगूनिया संता 
ठेवियले  ॥१

म्हणूनिया तीच 
चालावी रे वाट
जेणे  भगवंत 
प्राप्त होई ॥२

सरोनिया जावो
भूक नि तहान  
तयाचे स्मरण 
ऐसे व्हावे ॥३

असू देत घर 
मुल आणि दारा 
परी सरो सारा 
व्यवहार ॥४

राहावे घरात 
जैसी धर्मशाळा 
नच रे जीवाला 
गुंतवावे ॥५

मना दृढ धरी
हाच उपदेश
सद्गुरू आदेश 
जीवापाड  ॥६

विक्रांत सदैव
राहो संतदारी
बोध निरंतरी 
ह्रदयात  ॥७


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २४ जुलै, २०२१

वेढून गाणं



वेढून गाणं
*********

जीवाला वेढून 
आहे तुझं गाणं 
अक्षरांचं दान 
अपार हे ॥

लिहविता तूच 
जाणतात सारे 
तुझीच अक्षरे 
ओळखती ॥

ओळखती संत 
आणि भक्त जन 
म्हणून प्रेमानं 
डोलतात

तुझ्या शब्दावर 
तुझ्याच नामाचा 
अभिषेक साचा 
करतात

येणे सुखी होय 
विक्रांतचे मन 
करते वहन 
प्रेम भ‍ाव 

अहो भक्तजन 
दत्त प्रियकर 
व्हावे कृपाकर
दीनावर 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

कधी येशील?


कधी येशील?
**********

माझ्या रित्या ह्रदयात
कधी येशील तू दत्ता
रूप तुझे रुपातीत
भरशील या चित्ता ॥१

शोध शोधले तुजला
रूप दिसले नाही रे 
लाखो गुरूदेव जगी
कुणी आपले नाही रे ॥२

जगणे माझे बदल 
मागत हे मी नाही रे 
दे मोठेपण जगती
सांगत ही मी नाही रे ॥३

एक कण दे कृपेचा
विष वा दे अमृताचा 
अन मला कळू दे रे 
अर्थ या रे जगण्याचा ॥४

सुख भरले भोवती
पण मी सुखात नाही 
जळे आग अंतरात 
मिटता मिटत नाही ॥५

हे ही बरे केले म्हणा 
पाश सारे सुटले रे 
गृहसौख्य प्रेमबिम 
नावालाच उरले रे ॥६

सुटला एक किनारा 
दुजा मिळत नाही रे 
प्राण कंठात येवून 
श्वास सरत जाई रे ॥७

वाहिल्या वाचून तुला
जन्म निर्माल्य झाले रे
जाय ओघळून खाली
पदी पडले नाही रे ॥८

गेला जन्म फुका तर 
दत्ता खंत असणार 
किती जन्म कसा पुढे 
आम्हा कसा कळणार ॥९

प्राण ठेवून डोळ्यात
जेव्हा मरेन मी इथे
आशा बांधून तयात 
पुन्हा येईन मी इथे॥१०

नाव नसेल विक्रांत
देह नसेल विक्रांत 
आस तझीच कृपाळा 
पण राहील तयात ॥११
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

 


















गुरुवार, २२ जुलै, २०२१

दत्त दातार

 

दत्त दातार
********

दत्त हा दातार 
माझिया व्यथेचा 
घास प्राक्तनाचा
भरविता ॥

दत्त हा लोहार 
माझिया मनाचा 
घाव तो घणाचा
घालणारा॥

दत्त हो कुंभार 
अहं तुडविता 
मज रडविता 
जागोजागी ॥

दत्त हा  सुतार 
मज तासणारा 
अन कापणारा 
डोंगेपणी ॥

भोगतो मी बापा 
वेदना देहात 
कण्हतो मनात 
नामी तुझ्या ॥

असो आधीव्याधी 
जावो मृत्यूपंथी
तुझी कृपा अंती 
पण लाभो ॥

विक्रांत सादर
आलिया जीवना 
जाणतो करूणा 
पायदळी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...