शनिवार, १७ जुलै, २०२१

उर्मी

उर्मी
******

कधी उरातून
येथे उफाळून 
उर्मी ती प्राचीन 
जाणण्याची ॥१

शोधतो उपाय
तयाचे उत्तर
मारतो चक्कर 
कुठे कुठे  ॥२

कुठे तो धनाचा 
चाले कारभार 
दक्षिणा व्यापार 
खुशी खुशी ॥३

कुठे नियमाच्या
जाचक आखीव
स्वप्नांच्या रेखीव
भुलथापा ॥४

सांगतसे कुणी
अमुक कोर्सनी
येतसे घडूनी 
सारे काही ॥५

ऐकतो आणिक 
पाहतो विक्रांत 
धावतो जगात 
पुन्हा त्याच्या ॥६

हि तो पुरवणी  
त्याच जिंदगिची
सुखे जगण्याची 
अधिक रे ॥७

जगणे म्हणजे 
असते कळणे 
नि वाहत जाणे
तरी सुद्धा ॥८

देई दत्तात्रेया
जगण्या साधन 
सार्थसे कारण
वाहण्याला ॥९

 
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


शुक्रवार, १६ जुलै, २०२१

प्रेम बळे



प्रेम बळे
*******

देवा तुझे नाम 
घेताच प्रेमाने 
अवघे जगणे 
गोड  होते ॥

संत कृपा होते
गुरु कृपा होते
वाट सापडते
हरवली ॥

दुःख आणि दैन्य 
अवघे ते जाते
भाग्य ची धावते
शोधावया ॥

मागीतल्यावीन
दातार होऊन 
देतो उधळून 
सुख पळे ॥

प्रेमाचे रे बळ 
जाणतो केवळ 
विक्रांता कृपाळ
पदी ठेवी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १४ जुलै, २०२१

भासवत

भासवत
******

असे तिथे असे
निराळा विक्रांत 
दृष्टीच्याही आत 
बसलेला ॥

जगण्याचा सोस 
असतो देहाला 
काळ ठरलेला 
परी त्याला ॥

जगणे मरणे
मिळून दिसते
नसणे कळते 
व्यापलेले ॥

देहाचा आकार 
कळतो प्रकार 
कशाचा आधार 
नसलेला॥

मिटू जाते खंत 
सारे शांत शांत 
शून्य आकाशात 
शून्य दाटे ॥

सांगया ही मात 
नाही रे सांगत 
होऊन निवांत 
विक्रांत हा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १३ जुलै, २०२१

गुंतणे


गुंतणे 
****
गुंतण्याला मोह माया
कधी कुणी म्हणू नये 
पौर्णिमेच्या चांदण्याला 
क्षणिकसे गणू नये 

एका क्षणी एक उर्मी 
मनी हळू उमलते 
दिले दान दैवाने जे 
उद्यावर नेऊ नये 

गुंतणे ते घडू दे रे
आकांक्षाच्या ताटव्यात 
बहरून ऋतू येता 
फुलण्या ना म्हणू नये

देता यावे घेता यावे 
नकारात मरू नये 
उपेक्षेच्या ओझ्याखाली 
जीव उगा दबू नये 

फळफुली बहरतो 
पानझाडी हरखतो 
झाल्याविना वृक्ष असा 
जीवनाला भेटू नये


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १२ जुलै, २०२१

मालक


 

मालक
""""
दत्त जीवनाचा 
झाला या मालक
आवक जावक
तया हाती 

तया मर्जी विना 
कोणीही येवुनी
उगा या जीवनी 
प्रवेशे ना

शत्रु मित्र किंवा 
असो प्रियजन 
सारे ठरवून 
त्याचे कृपा 

तयाचेच देणे 
मान-अपमान 
घेतसे भोगून 
सुखाने मी 

जेैसी सुत्राधिन
काष्टाचे खेळणे 
विक्रांत जगणे 
दत्ता हाती


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ११ जुलै, २०२१

काठावर पास


काठावर पास
*********

काल उभा होतो मी
 गेट जवळच 
जरा बाजुला
विचारणा करीत 
मित्राच्या आजारपणाची 
सुचना देत प्रेमाची 
अन
यादी सांगत काळजी घेण्याची

तोच एक थोरली पांढरी गाडी 
आली आतमधून 
दिसताच ती 
दिला रस्ता करून 
वळता गाडी जाता जवळुन 
कानी आले शब्द आतून 
समजत नाही का ?
गेट बसला अडवून ?
मग्रुर फुगला चेहरा  
त्यावर तुच्छतेचे अवसान 
अन गेला तो भुरर्कन निघून 
क्षणभर कळलेच नाही
थुंकी पडताच अंगावर 
जसे  जातो बावचळुन आपण 

खर एक हलका हॉर्न 
दिला असता त्यान 
तर काम झाले असते पण .
एक घमेंड अनामिक
होती आत विराजीत 
अन आपले यत्किचित 
अस्तित्व मिरवित 

काय मी दुखावलो ?
प्रश्न मला पडला ?
होय नक्कीच 
पण काही क्षण  . .
अंगावर थुंकताच यवन
शांत राहणारे एकनाथ 
थोडेच आहोत आपण 
त्या घंमेडीला देत दूषण 
निषेध उमटलाच शब्दातून

पण उठताच ती वृती 
रागाची असंतोषाची
घडताच तिचे दर्शन 
त्याच क्षणी जवळून
गेलीही ती विरघळून 

पाणी तळ्यातील 
एक लहर होवून 
पुन्हा तळ्यात 
जणू गेली हरवून .

आणि त्या मग्रुर चेहर्‍यात 
दिसला मज 
तो परिक्षक 
ते जीवन 
अन गेले सांगून 
काठावरच पास बरं का अजून !

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .










शनिवार, १० जुलै, २०२१

आषाढ आठव


आषाढ आठव
💧💧💧💧💧
दोनचार तुषारात 
आषाढाचे गाणे होते 
मुठभर खाऊ मध्ये 
अमृताचे गाणे होते 

येता अशी सामोरी तू 
जग विसरणे होते 
तुझे मज पाहण्यात 
उंच तरंगणे होते 

असुनिया जवळ तू
दूर ते अंतर होते 
दूरवर आता किती 
कि सारे स्वप्न गमते

भेटीगाठी नाही आता 
नाही पुन्हा येणे जाणे 
स्मरताच कधी तुज
मनी उजळते गाणे 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...