रविवार, ४ जुलै, २०२१

ह्रदय भरू दे

प्रेमाने
*******
प्रेमाने ह्रदय 
माझे भरु दे रे 
द्वेष तो नको रे 
कुणाचाही ॥

केले अपकार 
ज्यांनी मजवर 
कृपा तयावर 
करी देवा ॥

असो अहंकार 
तयाला पदाचा 
ज्ञानाचा यातिचा 
काही जरी ॥

झाले गेले सारे 
मातीला मिळाले 
अन जे राहिले 
तेही जावो ॥

सुबुद्धी तयाला 
अन दे मजला 
रिते आकाशाला 
करी आता॥

विक्रांत पिकू दे 
गळून पडू दे 
जगाच्या येऊ दे 
काही काजा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ३ जुलै, २०२१

आहार


आहार
******

किती उगाळावा .
प्रश्न तोच तोच .
खाणार्‍यास बोच .
नाही तरी ॥

काय किती खावे 
कशाला हि चर्चा 
करा पुजा अर्चा 
तया पेक्षा ॥

मांस आणि मासे 
असे चवदार 
मसाले हि तर्रार 
तयातील ॥

करणारा करे 
मस्त शाकाहार 
चवीला वावर 
बहू असे ॥

देवाचिये वाटे 
लागताच पाय  
करितसे सोय 
मग तोच ॥

हिंसेचे ते मूळ 
दिसता सुस्पष्ट
कोण करी कष्ट 
मासांचे ते॥

आणि शाकाहारी 
जर जीव जडे 
ते ही काय कुडे 
कमी आहे?॥

करता नामाची
आपण ही जिव्हा 
रस जाती गावा 
निर्गुणाच्या॥

असे देहा योग्य 
करावा आहार
आणिक विचार 
सोडावा तो॥

जर का आहारी 
असेल विचार 
जाणावे विकार 
आहे आत ॥

जाताच शरण 
दत्तअवधूता 
वाहतो तो चिंता 
अवघीच ॥

हवे तेच मिळे 
नको ते न मिळे 
अट्टाहास जळे 
रसनेचा ॥

पाहिले विक्रांते 
ऐसे घडतांना 
म्हणुनिया मना 
चिंता नाही॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

लता

लता
🌿🌱🌿🌱🌿

वेलीला हवा असतो 
फक्त आधार  
झाडाचा खांबाचा मंडपाचा 
वर वर चढायला 
बाकी ती कधीच मागत नाही 
त्या वृक्षापासून अन्न 
शोषून घेत कधी त्याचा जीवनरस 
स्वयंसिद्धा असते ती 
स्वतःची पाने मिरवणारी 
तेजस्विनी 
स्वत: च्या फुलात धुंद असणारी
मनस्विनी 
स्वतःच्या फळांनी लगडणारी 
स्वामिनी 

कधीकधी तिला 
नाही मिळत तो 
भक्कम नीटस आधार 
पण अपरिहार्य असते 
जीवन आणि जगणे 

मग ती जवळ करते 
कधी ताराचे कुंपण 
कधी काट्यांचे अंगण 
वादळात वाऱ्यात 
त्या काट्यांनी तारांनी
ओरबाडली जाते ती 
फाटली जाते ती 
जागोजागी तुटते ती 
खिळखिळी होते ती 

पण तिची जीवननिष्ठा 
इतकी प्रबळ असते की 
तिला फुटतात नवीन कोंब
नवीन पालवी नवे धुमारे
वेढून टाकतात ते
काट्यांचे जाळे कुंपणाच्या तारा 

मग त्या खूपणाऱ्या तारा 
अन टोचणारे काटे 
विसरून जातात 
त्यांचे स्वतःचे स्वरूप 
अन जणू वेलच होऊन जातात 
तिच्या रूपात हरवून 
तिच्या असण्यात मिसळून 
तिच्या कर्तुत्वाने बहरून 

ही किमया केवळ 
वेलच करू शकते 
स्वतःच्या मार्दव्याने 
लवचिकतेने धिटाईने 
सबुरीने अन जीवनावरील श्रद्धेने

तिचे हळूवरपण 
तिचे नाजूक पण 
तिचे समर्पण 
अन् स्वावलंबन 
हेच तिचे सामर्थ असते 

कारण ती लता असते


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


गुरुवार, १ जुलै, २०२१

अवधूत गती (कळू दे१६१)


अवधूत गती 
**********

साऱ्या जगण्याला 
अवधूत गती 
देऊनिया वृत्ती 
पैल नेरे ॥

शून्यात साठला 
जन्माचा सोहळा 
एकांती मजला 
पाहू दे रे ॥

निशब्द निर्वाती 
समष्टी चा वास 
अहम सवे ग्रास
होऊ दे रे ॥

धरणे जपणे 
फुटके जगणे 
उगा सांभाळणे 
सरू दे रे ॥

वाजतो डिंडिम 
कुठल्या देशाचा 
मग मी तेथीचा 
होऊ दे रे ॥

तीच ती जाणीव 
उभा कड्यावर 
भार तुझ्यावर 
टाकू दे रे ॥

विक्रांत कुठला 
कुठून हा आला 
त्याचे ते तयाला 
कळू दे रे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २९ जून, २०२१

देवा यतिवरा.. (काही बदलून)


देवा यतिवरा..

आलो इथवर 
जैसा तैसा देवा 
पुन्हा नच जावा 
दूर आता ||१ ||

नको पुनरपी 
घालूस विरही 
प्रभू मागतो ही 
भीक तुला ||२ ||

ठावूक मजला 
आहे सर्वांतरी 
आस डोळा परी
पाहण्याची ||३||

काय मी असेल
दिसलो तुजला
प्राप्त वा कृपेला
झालो काही ॥४

काय मिळविले 
तुझिया भक्तिला
काय ते मजला 
शक्य असे ||५|

तुझीच करुणा 
उदारा दातारा 
भव या सागरा 
उतराया ॥६

मागतो मागणे
देवा यतिवरा 
विक्रांत पामरा
पदी ठेवी  ||७ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २८ जून, २०२१

प्रारब्ध साठा

प्रारब्ध साठा
🌸🌸🌸🌸

रोग भोगातून 
चालविले दत्ता 
सरण्यास साठा 
प्रारब्धाचा ॥

सुटल्या विवेकी 
भोगाचिया गाठी 
रोगाची ती घाटी 
चालण्याने ॥

भोगतो मी भोगा
परी ना लालसा 
सहजी सहसा 
स्वीकारतो ॥

विक्रांत कृपेचा 
जाहला दिवटा 
फळे भोगवटा 
पाहतसे॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


रविवार, २७ जून, २०२१

हाक ओली

हाक ओली
🌹🌹🌹

दत्ता कर माझी 
हाक आता ओली 
प्राणाने भरली 
आर्त अशी ॥

तुझ्याविन काही 
दिसावे न डोळा 
करी रे आंधळा 
जगतास ॥

तूच गुरुमाय 
आराध्य दैवत 
तुझ्यात अद्वैत 
घडो मज ॥

जरी नालायक 
तुझ्या मी सुखाला 
ठेवी  रे पायाला 
दूर जरी ॥

हरवून भ्रम
सगुण-निर्गुण 
मिटू दे रे मन 
मागणारे ॥

तुझ्याविना दत्ता 
कुणा मागू काय 
तुच असे माय 
विक्रांतची॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...