शुक्रवार, २१ मे, २०२१

सगुण आवडी

सगुण आवडी
**********

सगुण आवडी 
किती या जीवाला
विश्व व्यापकाला
मुर्त केले ॥

जरी चराचरी
व्यापून उरतो
हवासा वाटतो
पंचेद्रीया ॥

डोळ्याने पाहावे
पुष्पे सजवावे 
नैवेद्या अर्पावे 
प्रेमे भरे ॥

भावाला भुकेला 
येई आकाराला 
घेवून रूपाला 
भक्तप्रिय ॥ 

भजता भजता 
भाजक मरतो
भाज्यचि उरतो
भजनात ॥

सगुण निर्गुण 
अवघे गिळून 
रहातो उरून 
भक्ती रूपे ॥

विक्रांत ऐकून 
संताचे वचन 
श्रीदत्त चरण 
घट्ट धरी॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, २० मे, २०२१

शिव शक्ति

शिव शक्ति
🌸🌸🌸

हे "मी" नावाचे सॉफ्टवेअर 
इंस्टॉल केले गेले असेल 
रुजणाऱ्या गर्भात केव्हातरी
अन ऍक्टिव्हेट केले गेले असेल 
वयाच्या तिसर्‍या चवथ्या वर्षात 
त्यात असलेल्या अनेक 
छोट्या वायरस सकट .

त्याला वापरत आणि अपडेट करत 
ठेपतो एका क्षणापर्यंत वापरणारा
पण जेव्हा हार्डवेअर आऊटडेटेड होतं 
सारखे सारखे क्रश होऊन 
तो वापरणारा  हवालदिल होतो
आणि ठरवतो स्क्रॅप करून 
नवीन हार्डवेअर अन 
सवे सॉफ्टवेअर आणायचं 

तोवर माहित नसतं "मी" ला 
की तो यूजर नाही म्हणून 
फक्त एक सॉफ्टवेअर आहे 
युजर नाव असलेलं 
मग डाउनलोड केलेली 
सारी इन्फॉर्मेशन सारा डेटा 
"मी" च्याच साह्याने "मी" ला वगळून 
ठेवला जातो बॅकअप म्हणून 
(अर्थात ती कुणाचीच नसते 
खरतर हा वेगळाच विषय आहे.)
मग मी ला वाटते 
आता मरणारच नाही
अन मेलो तरी 
पुनर्जन्म होईलच म्हणून 

अन एक दिवस 
शेवटचाच म्हणून 
शट डाऊन केलेला प्रोग्रॅम 
जातो हार्डवेअर सकट 
रि सायकलच्या जंक मध्ये 
हार्डवेअर जाते तुटून वितळून 
पण त्यात असलेले ते 
"मी" चे सॉफ्टवेअर 
त्याचे ते बायनरी कोड मधील अस्तित्व 
ते काय असते?  कुठे जाते ?
त्याच्यातील 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सकट

कुणी म्हणते  
ते मुळात नसतेच 
तो फक्त भास असतो 
दृश्यमान होणारा 
जगत रुपी कॉम्प्युटरच्या
स्क्रीन वरती

दृश्य असून अदृश्य असणारा 
अदृष्य होऊनही दृश्यात दिसणारा 
हीच वेदांतातील 
माया. .
दिसणारी भासणारी पण नसणारी
किंवा शैवातील मधली 
शक्ति . .
ती आहे म्हणुन शिव आहे 
जी शिवामुळेच आहे
पण ती जाताच शिवही नाही.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

जगण्याचे गाणे


जगण्याचे गाणे 
***********

जगण्याचे गाणे 
झाले माझे दत्ता
येता तुझ्या पथा 
आनंदाच्या॥१॥

जरी मी जाणतो 
असे भगवन 
चालणे अजून 
बहु मला ॥२॥

पण चालण्यात 
याही सुख आहे 
तव स्मृती लाहे 
हृदयात ॥३॥

कधी मी थांबलो 
वाट विसरलो 
खेळात रंगलो 
हरखून ॥४॥

देईआठवण 
संत भेटवून 
नेतील धरून 
हाताला जे ॥५॥

तव स्मरणात 
ठेवी सदोदीत 
मागतो विक्रांत 
हेचि तुज  ॥६॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १९ मे, २०२१

स्व स्वरुप

 
स्व स्वरुप
********

स्थूलपणे शारिरीक गरजेतून 
सूक्ष्मपणे तत्त्व विचारातून 
मन राहणारच सत्ता रूपान
स्वतःला स्थापित करून 

मन कारेत जीव अडकून 
सुख दुःखी जातो झिजून 
आनंदाला पारखा होऊन 
स्वरूप आपले विसरून 

पण तुरुंग फोडल्यावाचून 
धावाधाव केल्यावाचून 
जाता येते सहज निसटून 
फक्त आतला स्व: शोधून 

तेही फार नाही कठीण  
फक्त मनानेच पहा मन  
अन मग तेथे पाहणारा 
होईल वेगळा मनापासून 

अन मग पुढे काय होईन?
होईल तेव्हा घ्या हो पाहून 
सांगा गाव कसे दिसेन 
स्वतः तिथे गेल्यावाचून 

अवघे आहे सोपे सोप्याहून 
नकाच टाळू अळणी म्हणून 
सद्गुरू कृपेने काही जाणून 
विक्रांत राहिला स्वस्थ पडून


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, १८ मे, २०२१

एकांत


एकांत
******

अहाहा एकांत 
कोणी नसे साथ 
नाद हृदयात 
सोहं गुंजे ॥

श्वासाच्या लहरी 
येतात जातात 
प्राण उंचावत  
आकाशात  ॥

हरवतो भान
शुन्याच्या गर्भात
अहं स्फुरणात 
तत्वमसि ॥

शुद्ध जाणिवेचा 
प्रकाश भवती 
स्वरूपात दिठी 
मावळते ॥

ज्ञानदेव माय
कधी कवतुके 
भरवी भातुके 
प्रिय बाळा ॥

नयनी श्रवणी 
आनंदाची धनी 
विक्रांत झेलुनी
तृप्त होतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, १७ मे, २०२१

परीक्षा

परीक्षा
******

मिटावी कवाडे 
म्हणतो मी आता 
थांबावी प्रतिक्षा
म्हणतो मी आता  ॥

थांबणे कसले 
दिखावा हा खोटा
दाविणे जगास
अध्यात्माचा ताठा ॥

म्हणते बायको
म्हणजे नक्कीच
चुकलीय दिशा 
माझी जाण्याचीच ॥

तिच्याविन मज 
कोण  ओळखते 
मर्मभेदी वार 
करू वा शकते ॥

माझी भक्तीगीते 
माझी ज्ञानेश्वरी 
आत्म संतोषाची
कथा असे सारी ॥

दोन जगातली 
सारी तफावत 
दाखवते मज 
सहज हासत ॥

थांबतो मी आता
पाहतो अहंता 
ढोंगीपण माझे 
तपासतो आता ॥

पाप-पुण्य खेळ 
असता मनाचे 
कशाला नाटक 
करावे पुण्याचे ॥

तसे ही अध्यात्म 
बेसहारा होते .
जोडलेले बळे 
ग्रंथ संता होते ॥

चला जरा पुन्हा
उनाडसा होतो 
किती उनाड मी 
पाहुनिया घेतो.॥

बळे का होईना 
दारूडा मी होतो
अट्टल आहे का 
फुकट्या पाहतो ॥

असो नसो भाव
विक्रांत म्हणतो 
दत्ता माझी मीच 
परीक्षा पाहतो.॥



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





सुखाच्या शोधात


 सुखाच्या शोधात
**************

सुखाच्या शोधात
धावता जगात
काटे  टोचतात 
दु:खाचेच ॥

सोडव मजला 
घेई रे पदाला 
घोर या जीवाला
पडलेला ॥

किती द्विधा चित्त 
किती आटाअटी 
वस्तू शोभेसाठी 
जमविल्या ॥

जायचे निघून 
अवघे सोडून 
तिथे अडकून 
राहावे का? ॥

खेळी जे गुंतले 
राहू दे तयाला 
नको रे मजला 
ठेवू तिथे ॥

विक्रांत फाटका 
राहू दे लत्करी 
बिरुदे फकिरी
मिरवीत ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...