बुधवार, १४ एप्रिल, २०२१

वारूळ महाल




वारूळ महाल
***********
कुठेतरी केव्हातरी 
दिसे वाट चुकलेली 
नागमोडी वळणात 
नजर ती झुकलेली 

हरवली फडफड 
हृदयाची धडधड 
वाहुनिया पाणी गेले 
नदीकाठी तोच वड

मिटलेल्या चुका तरी 
हात असे काचलेले
डोळ्यां मागे अंधारात 
एक चित्र लपलेले 

वादळाचं वेलीची ती 
धडपड जगण्याची 
स्वानंदात वृक्ष धुंद 
वांछ्या तया संपण्याची 

कुणा काय सांगू किती 
जडावले शब्द तेही 
पाखरांनी रिते केले 
कचराच घरटे ही 

अरे देवा नशिबाच्या 
असे काय खेळणे हे
वारुळाच्या महालास
बुडवणे बरे नव्हे .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

डॉ.बाबासाहेब

डॉ.बाबासाहेब 
🌾🌾🌾


काल रात्री बारा वाजता 
अचानक 
आकाशात उडू लागले फटाके 
दुमदुमू लागले आवाज 
आश्चर्य वाटले 
दिवाळी !
अशी अचानक 
खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले 
तर काही वस्त्यांमध्येच 
ही धामधूम चालू होती.
आणि लक्षात आले 
अरे आंबेडकर जयंती सुरू झाली 
हि भिमाच्या अनुयायांची दिवाळी आहे.

बाबासाहेबांविषयी इतकी श्रद्धा 
इतके प्रेम आदर 
या समाजामध्ये निर्माण झाला आहे 
की ते बाबासाहेबांना 
निश्चितच 
प्रेषित मानू लागले आहेत 
देव मानु लागले आहेत

प्रेषित येतो 
आणि बाहेर काढतो लोकांना 
त्यांच्या दुःखातून दैन्यातून 
देतो ज्ञानाचा मुक्तिचा प्रकाश
प्रदान करतो माणुसकीचे हक्क 
वागवतो माणूस म्हणून . .
माणसाला यापेक्षा 
निराळे तरी काय हवे असते.

कारण मानवी मनाला 
हवे असते एक दैवी स्थान 
पूजनीय स्थान 
जे त्यांच्या आत्मसन्मानाला 
अभिमानाला 
उंचावर नेऊन ठेवेल 
हवे असते
एक श्रद्धास्थान .
आणि जर 
एक नष्ट झाले तर 
तिथे दुसरे उभारावेच लागते 

कारण मानवी मन 
नाही राहू शकत त्याशिवाय 
माणसाला हवा असतो 
प्रेषित 
महापुरुष 
पूजा करायला 
इथून तिथून सर्व जगाच्या पाठीवर

 हिंदू धर्म ,संस्कृति 
यांना नकार दिल्यावर 
झालेली पोकळी भरून काढणे 
आवश्यकच होते .
त्यामुळे बाबासाहेबांना देवत्व मिळणे 
क्रमप्राप्त आहे .
कदाचित त्यांना स्वत:ला 
ते अभिप्रेत नसेलही.

अर्थात बाबासाहेब 
महामानव होते यात शंका नाही
कित्येक शतकानंतर 
अशी विभुति जन्मास येते .

पण
मला भिती वाटते 
ती वेगळ्याच गोष्टींची
कारण ज्या क्षणी 
एक मोडून दुसरे
नवे श्रद्धास्थान निर्माण केले जाते
त्याक्षणी माणसाचे मन  
एकांगी होते 
अधिक कट्टर होते 
आणि जुने श्रद्धा स्थान 
पुसून काढण्याचा 
आटोकाट प्रयत्न 
त्या मनाकडून केला जातो

सामाजिक राजकीय गरजेमुळे 
कदाचित ते बर्‍याचवेळा
अप्रकटपणे प्रकट होते
पण आपल्याच ग्रुपमध्ये 
ते अधिक  तीव्रतेने 
अधिक जाहीरपणे मांडले जाते
प्रकट केले जाते

कदाचित एका म्यानात 
दोन तलवारी राहात नाहीत 
तशाच एका मनात 
दोन श्रद्धाही राहत नसाव्यात
दोन संस्कृती रहात नसाव्यात
किंबहुना त्या तशा राहू नयेत 
अशीच काही समाज प्रमुखांची 
नेता मंडळींची इच्छा असते.

खरतर बाबासाहेब 
एका समाजाचे वर्गाचे असे नाहीत 
तर ते या भारत भूमीचे सुपुत्र आहेत
इतके दूरदर्शी
इतके विद्यावान बुद्धीमान
सूक्ष्मातिसूक्ष्मात जाऊन 
विचार करणारे विचारवंत 
माणुसकीने ओथंबून गेलेले 
महामानव.

पण त्यांना विभुतिपुजनासाठी
स्वत:च्या स्वार्थासाठी
केवळ मुर्ती म्हणुन वापरले
तेव्हा .
त्यांना कट्टरतेच्या झेंड्याखाली  
आणून स्थापित केले जाते 
तेव्हा
ती न  भरलेली दरी
मला जाणवत राहते 
पुन्हा पुन्हा .

बाबासाहेबांवर गौतम बुद्धावर  
अन मानवतेवर 
अत्यंत प्रेम करणार्‍या  
माझ्यासारख्या
वर्णाश्रम नाकारणार्‍या 
पण हिंदुच्या आत्मज्ञानाधारित
शिकवणुकीवर  
जन्म जगणार्‍या 
व्यक्तिला खरेच खुप वाईट वाटते.

बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम .!!


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

प्रित दे.

प्रित दे .
*****::

माझ्या सार्‍या जगण्यास 
तूच असतोच साक्षी 
या मनाच्या आकाशात 
तव स्मरणांची पक्षी 

सदा असावे म्हणतो 
तुझी सावली ओढून 
उरातील घाव माझ्या 
तुझ्या हाती सोपवून 

तूं न भेटता तर हे 
जाते जहाज बुडून
शब्दांना अस्तित्वाला 
मीच जातो विसरून 

दयाघना सांभाळले 
तुवा भेटल्या वाचून 
परी हट्ट सरले ना 
एकवार जा भेटून 

बाकी सारे तर आहे 
बरे चालले अजून 
बस प्रित दे विक्रांता 
तुझ्यात जाण्या रंगून


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, ११ एप्रिल, २०२१

गणेश पुजा


गणेश पुजा
********

पित फुलांचा संभार 
करे कनकाची हार 
देव गणेशाची पूजा 
हर्ष मनात अपार ॥

किती लोभस ही मूर्ती 
जडे तयावर प्रीती 
रंग शेंदरी उज्वल 
मृदू कृपाळूवा दृष्टी ॥

रत्नजडित मुकुट 
वर सुवर्ण कनात 
किती रेखीव घडण
मंत्र जपे अक्षरात ॥

हाती सुमन परशु 
माळ मोदक मिरवी 
सिद्धीदायक वरद 
सार्‍या विघ्नास भिववी ॥

तुज स्मरत निजावे 
तुज स्मरत उठावे 
दिन रातीची सुमने 
तव पदासी वहावे ॥

तुझे प्रेम दे दातारा 
सदा हृदयी रहा रे 
मागे विक्रांत इतुके
तुझी सेवा घडू दे रे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, १० एप्रिल, २०२१

हिरवाई

हिरवाई
*******

पाचूचे अंगण पाहिले दृष्यात
बुडालो आकंठ जीवन रसात 

हिरवा साज या वृक्षांनी घातला 
हिरवा शालू नि भूमीने नेसला

गडद हलके पोपटी पिकले 
अनंत छटांनी रंग उधळले 

हिरव्या झुडपी हिरवी सळसळ
हिरव्या डोहात हिरवी खळखळ 

निळ्या नभास या हिरवी आहट 
निळ्या ओढ्यावर हिरवे सावट 

शब्द स्तब्ध झाले मन मौन झाले 
पाहून हिरवाई चिंब चिंब ओले 

तन हिरवे झाले मन हिरवे झाले 
निळ्या शिरातले रक्त हिरवे झाले 

हिरव्या डोळ्यात स्वप्न सुखावले
हिरवे होवून गाली ओघळले

भान हिरवे झाले गाणं हिरवे झाले 
देही भारावले प्राण हिरवे झाले  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

वस्त्र

  वस्त्र
🌸🌸

ल्याईलो सुखाचे 
वस्त्र भरजरी 
श्रीदत्त माहेरी 
मिरविले ॥

घेतले कौतुक 
करुनिया किती 
उमटते गीती 
स्वानंदाच्या ॥

पुरविले हट्ट 
दत्तात्रेय देवे 
नुरले मागावे 
ऐसे काही ॥

सुखाचा महाल 
जणू भिंतीविन 
सुखाने भरून 
ओसंडला ॥

सुखाचे निधान 
दत्त भगवान 
सुख वरदान 
स्वयं होती ॥

विक्रांत सुखाला 
ऐसा लाचावला 
दत्त कोंदाटला 
कणोकणी ॥



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

मुकूट

मुकूट
*****

माझ्या माथ्यावरी 
नको तो मुकुट 
काट्यांचा फुकट 
दत्तात्रेया ॥

चोरांच्या बाजारी 
पुसताच भाव 
जाते नाव गाव 
वस्त्रानिशी ॥

बोजड शब्दांची 
नीरस दूनिया 
मज स्वामीराया 
देऊ नको ॥

देणे जर काही 
देई काही सेवा 
जनहित भावा 
ठेवलेली ॥

मग हा विक्रांत 
राहील सुखात 
तुजला पूजित 
जनार्दनी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...