सोमवार, ११ जानेवारी, २०२१

जीवो जीवस्य

जीवो जीवस्य 
***
एक जीव दुज्या
खातसे जीवाला 
देह दे देहाला 
आकार तो ॥

मरणारा देह 
होतसे खाणारा 
तो ही  उरणारा 
नसे कधी ॥

अन्नाची साखळी
कुणाचा हा खेळ 
पहावया वेळ 
असे कुणा ॥

कुणी खातो एक 
पाळूनया पशु
होऊनिया पशू 
साखळीत ॥

देह मिळे देहा 
पशु कुठे असे 
चैतन्यास कैसे 
कळू जावे ॥

पाण्यातला मासा 
जैसा पाणीयाचा 
अंश तो पाण्याचा 
तैसे होय ॥

कुणास मग ते 
कुणी रे खादले  
कुणाला कळले 
काय कधी ॥

विक्रांत कळणे 
उडाले शून्यात 
नाद आकाशात 
उमटला॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १० जानेवारी, २०२१

योगी


योगी
******

मरणा मरण 
देऊनिया योगी 
रहातसे जगी 
संजीवन ॥

अपार करुणा 
बांधून गाठीला 
देण्यास जगाला 
आत्मबोध ॥

थांबवला मोक्ष 
संकल्प बळाने 
अत्यंत प्रेमाने 
भारावून ॥

कृपाळू ज्ञानाई 
निवृत्ती सोपान 
मुक्ताई महान 
तया परी ॥

घडविला मेघ 
मोडीयला मेघ 
तैसे त्यांचे जग 
अद्भुतसे॥

विक्रांत जाणून 
त्यांचे उपकार 
लीन पायावर 
सदा होय॥
**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

गोंदवलेकर महाराज आठव .



गोंदवलेकर महाराज आठव

******


 माझे महाराज बोलता बोलता 

पाणी डोळ्यातून ओघळून येता ॥

लागते तहान अंतरी तयाची 

जशी की आठव लेकीला आईची॥

 त्यांनीच पेरले नाम हे अंतरी 

सुखद सुंदर अमृत वल्लरी ॥

दिधला जीवना सुंदर सुबोध 

घडे परमार्थ अरे संसारात ॥

धरणे सोडणे रडणे फेकणे 

काही काहीच रे येथे न करणे ॥

तार ती जुळावी अनुसंधानात 

देह मग कुठे का तो पडेनात ॥

लेकीच्या कानात सहज सांगते 

बोलता-बोलता शहाणे करते ॥

विक्रांत ओवाळी जीव तयावर 

ऋण कोटी-कोटी त्यांचे माझ्यावर ॥

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


privacy


प्राईव्हसी 
********

आम्ही ढोल वाजवितो 
दत्त दणाणा बोलतो ॥
आम्ही उघडे नागडे
घरी आणि देवापुढे ॥
नाही मुळीच ती भिती 
काही खाजगी माहीती॥
जसा अंतरी बाहेरी
उजेड उजेडा घरी ॥
सारे सांगतो देवाला 
जरी ठावुक ते त्याला ॥
तसा विक्रांत जगाला 
नसे कुठेच वेगळा ॥

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

🙏🙏🙏🙏

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी 
*****
शब्दातील आर्जव 
शब्दातील मार्दव 
शब्दातीत भाव
 ज्ञानदेवी ॥

शब्दांचे  औदार्य 
शब्दांचे सौंदर्य 
अद्भुत हे कार्य 
ज्ञानदेवी ॥

कृष्ण कृपा कर 
पुन्हा एकवार 
प्रेम दे अपार 
ज्ञानदेवी॥

तरले तरले 
अपार इथले 
पैल थडी गेले 
पुण्यवान ॥

तेच भाग्यवंत 
झाले ज्ञानवंत 
स्तनाला झोबंत
दूध प्याले ॥

विक्रांत सेवतो
तयाचे उच्छिष्ट 
सुखाने संतुष्ट 
जीव होय॥
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
*********

बळे बळे दत्ता

बळे बळे दत्ता
***********

बळे बळे दत्ता 
तुझ्या दारी येतो  
सोडुनिया लाज 
तुला धरु जातो

नाही रे वैराग्य
नाही ज्ञान भक्ती
तप करण्याची 
इवलीही शक्ती 

नाही संत संग
नाही पारायण 
हिंडतो जगात 
स्वच्छंद मी होत

जर का पाहसी 
लायकी तू माझी 
देवा ती ही नाही 
भक्त खेटरांची 

मिळते गचांडी 
तुझिया दारात 
हाकलती देती
लाथा पेकाटात 

तुझे द्वारपाल 
योगी महाराज 
मज पाहुनिया 
होतात नाराज

परी मी  लोचट
श्वान दारातला 
तुकडे मागत
येतो उंबऱ्याला 

भुंकणे भोगणे
तुज विसरणे 
नित्य जरी घडे 
हेच व्यर्थ जीणे

विक्रांत पतित 
रे पतिताहून 
तयां न आसरा 
तुझ्या कृपेविन

उदारा उद्धरा
पदी द्या आसरा
जाणून घेवून
अजाण लेकरा 
******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

इंद्रायणी तीर


इंद्रायणी तीर
**********

मज बहु प्रिय 
इंद्रायणी तीर 
जीवीचे जिव्हार 
जिथे नांदे ॥

अलंकापुरीचे 
वयोवृद्ध बाळ 
चिन्मय ती खोळ 
पांघरून ॥

वेधियले मन 
तयाच्या शब्दांनी 
आनंदाचा धनी 
केले मज ॥

आहाहा अद्भुत 
होतसे विस्मित 
चित्त चाकाटत   
तया माजि॥

प्रज्ञेच्या राऊळी 
तेजाची पखाल 
होय निर्विकल्प 
अभिषेक ॥

ऐसा ध्यानीमनी 
राहतो नांदूनी
मज पांघरुनी 
सर्वकाळ ॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...