रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

ती माणसं

ती माणसं
*******
होय माणसं सगळी
आपलीच  आहेत ती 
उरात झेंडा द्वेषाचा 
का वाहत आहेत ती ॥

होय माणसं सगळी
चांगलीच आहेत ती 
लेवून संस्कृती भिन्न
का वेगळी आहेत ती ॥

पांघरणे गाफिलता
अतिमूर्खता आहे ती
मित्रात काफिर पाहू 
का लागली आहेत ती ॥

वाचलेस नच का रे
इतिहासी व्रण किती
धर्माध संगिन नग्न
का वाहती आहेत ती ॥

झाले ते ही बरेच कि
डोळे आहे उघडती 
अजुनही किती आया 
भगिनी ते पळवती ॥

महावृक्षावरी माझ्या
घाव सांग झेलू किती 
शोषती ते संपन्नता 
वार अनंत करती ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

दत्त आषाढ

दाटला आषाढ 
पुन्हा अंतरात 
उघडला दत्त 
कृपा मेघ॥

सरले आर्जव 
चातकाची आस 
मृगजळ ध्यास
तृषार्थाचा ॥

सावरली लाज 
येऊनिया आज 
करूणेचा साज 
लेवविला ॥

आता  मी निवांत
जाणीवेच्या आत
बसतो पाहत
दत्ता तुज ॥

विक्रांत कृपेचा 
कण हा पातला  
क्षण प्रकाशला 
दत्त रुपी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

सुखावलो दत्ता

सुखावलो दत्ता
**********
सुखावलो दत्ता 
तुझ्या पदी येता 
काही नको आता 
इच्छा देऊ ॥

सुखाचा सागर 
मीनला आभाळी 
प्रेमाची उकळी 
सप्त लोकी ॥

जाहलो उमाळा 
कृष्णेचा खळाळा
आनंद हो डोळा 
दृष्टी सवे ॥

दृश्य अदृश्याचा
सरला खकाना
सुटल्या वाहणा
संकल्पाच्या ॥

आता न मी माझा 
जसा न तू तुझा 
प्रेमाचिया काजा 
पान्हा फुटे ॥

विक्रांत विराट 
नुरे जळमट
प्रकाश कोंदाट
घेरुनिया ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

प्रेम मुर्खता


प्रेम मुर्खता 
******
प्रेम कळावे कळावे 
ऐसे लाखदा वाटले 
माथा आपटला धोंडी 
डोके फुटोनिया गेले 

प्रेम भेटावे भेटावे 
जगभर मी शोधले 
हिंडहिंडोनिया यारो 
गोळे पायात या आले 

प्रेम असते कसले 
कोण खातो रे कशाशी 
गोष्टी ऐकल्या पक्वांन्नी 
जग पाहिले उपाशी 

प्रेम असते फुलांचे 
प्रेम चंद्र तारकांचे 
प्रेम काश्मीर उटीचे
धुंदी भिनल्या गात्रांचे 

असे म्हणतात कुणी 
असे लिहतात कुणी 
मज वाटते आहेत
सारे आत्मसंमोहनी 

जन्म घालणे प्रजेला 
पुढे चालणे वंशाला 
ऐश्या साध्या घटनेचा 
क्लिष्ट गुंता कुणी केला 

चव असते वेगळी 
हर एक स्वभावाची 
तया कशाला ती द्यावी 
उपाधी ती रे प्रेमाची

प्रेम मूर्खांचा बाजार 
फक्त ढोंगी व्यवहार 
नाही ताप वा औषध 
बिना कामाचा आजार 

प्रेम आठवत कुणी 
राधा कृष्णाला भजती 
प्रेमी पाघळत कुणी 
लैला मजनूला गाती 

साऱ्या गोष्टी या पांचट 
सुक्या तोंडी चघळती 
रंभा मेनकेच्या स्वप्नी 
जे का विश्वामित्र होती 

सोडा सोडा बाता या हो 
लक्ष धंद्याकडे द्या हो 
जग अर्धे हे रे वेडे 
नीट डोळ्यांनी पहा हो..

****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

गिरनार वाट


गिरनार वाट
********

गिरनार वाटेला
पडावी पाऊले 
ह्रदय  भरले
घेवुनिया ॥

मनाचे जन्माचे
तुटावे संशय 
वेदना विलय 
नामी होत ॥
 
मिळावे आशिष 
साधूंचे भक्तांचे 
दृश्य-अदृश्याचे 
माथ्यावर

भरावी ओंजळ 
आपली इवली 
पुण्य साठवली 
अगणित 

प्रत्येक पुनवी
चंद्रमणी होत 
जावे हरवत
दत्त रुपी 

विक्रांत भाग्याचा 
नमीली पायरी
रिघला शिखरी
तया कृपे

दत्त सांभाळता 
झाला स्विकारता
पथी चालविता
पतिताला ॥
***************
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

इवले बिंदुले

इवले बिंदुले
नभी उमटले 
तम मावळले 
अज्ञानाचे ॥१

प्रकाश प्रकाश 
डोळियांच्या आत 
बघण्याची वात 
पाजळली॥२

मी पण एकटे 
उरे दशांगुळे 
निर्वाती संभाळे
आपणाला ॥३

गेली यायायात 
विरे व्याकुळता 
सलणारी व्यथा 
शुन्यी लीन ॥४

नसण्याची गाथा 
झाली सर्वव्यापी 
विक्रांत नुरली 
सांगावया ॥५

सिद्ध सदा दत्त 
उपाधी रहित
जाणिवे सहित 
कळो आला ॥६
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

विहीर

विहीर
***

तुझी सुखाची विहीर 
काळया चिऱ्यात बांधली 
पाणी भरून शेंदून 
भिंत ओली चिंब झाली॥

रोज मारून चकरा 
नाही  रांजण भरत
तुझे दुःखाचे रहाट 
फिरे कण्हत गंजत ॥

किती पडल्या रडल्या 
किती बुद्ध्याच सांडल्या 
जन्म उपसणे सारा 
अंती झिजल्या बादल्या .॥
 
तुझी कथा विहरीची 
खोल कातळ पाण्याची 
जाणे घडो वा न घडो
घडा बांधल्या दोरीची ॥

काय सांगू सई बाई 
पाणी भरता तू घरी
तुझ्या स्नेहाच्या ओलीने
सुख तराराते दारी ॥

तुझ्या काचल्या हाताने
जीवा जीवपण येते
तुझ्या सर्वस्व शिंपणी
जग हिरवे हे होते.॥

कुणा कळावी हि माया 
तुझ्या अंतरी दाटली
कष्ट काबाडली काया 
प्रेमे घरात झिजली ॥

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...