सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

कृपावर्षा

कृपावर्षा
*******

वाट ती पहावी 
चोच उघडून 
चातक होऊन 
वर्षेसाठी ॥

पडेल पाऊस 
सरेल तहान 
आसही ठेवून 
मनामध्ये ॥

स्वातीच्या थेंबाने
घडे मोती दाना 
मिळे पण कोणा 
क्वचितच ॥

येवू देत ऋतू 
जाऊ देत ऋतू 
तमा नको मृत्यू 
येण्याचीही ॥

साफल्य जीवाचे 
मोती ते व्हायचे 
भान स्वरूपाचे 
साकारले ॥

परी ती प्रतीक्षा 
करावी आजन्म 
साठवून प्राण 
डोळीयात ॥

विक्रांत वर्षेच्या 
स्वागता आतुर 
दत्त प्रभूवर 
धावा वेगी ॥

******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

कोरडा आड

कोरडा आड
**********

फाटलेले मन 
विटलेले तन 
वाहतो मी दत्ता 
तुझिया वाचून ॥

साराच उधार
शब्दाचा बाजार 
कोरड्या आडात 
घुमतो हुंकार ॥

म्हणतात लोक 
भक्त रे मजला 
परी किती आत 
नाटक भरला ॥

उघड्याच साऱ्या 
माझ्या व्रण व्यथा 
मागे कृपा दवा 
तुजलागी दत्ता ॥

काम क्रोध लोभ 
मोह माया आग 
सोडवी रे दत्ता 
जीवन हा रोग ॥

विक्रांत लत्करी 
भिकार दुबळा 
फक्त आशेवर 
तुझिया तगला॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

खंत

खंत
****
इवल्या जीवाचा 
इवला प्रवास 
इवलासा भास 
असण्याचा ॥

इवलासा देह 
इवलेसे मन 
इवले कारण 
जगण्याला ॥

खंत इवल्याची 
नच या मनात 
आहे मी तयात 
सुखी जरी ॥

खंत असण्याची 
कळल्या वाचून
बोच रात्रंदिन 
बाळगतो ॥

कधी उजाडेल 
तुज कळण्याचा 
सवे असण्याचा 
मधुमास ॥

विक्रांत जगात 
आग अंतरात 
डोंब सागरात 
वडवानळ॥

*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// kavitesathikavita.blogspot.com 

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

भगवी कफनी

एकदा येऊनी
पहा रे देऊनी
भगवी कफनी 
मजलागी ॥

तन मन काय
देउनिया प्राण 
होईल भूषण 
तुज लागी ॥

जगी मिरवीन
अलख गाईन.
प्रकाश होईन 
धुनीतला ॥

कंथा पांघरीन
पुंगी वाजवीन
जगा दाखवीन 
मुद्रा तुझ्या ॥

धन लाथाडीन 
तन लाथाडीन 
मना झोपवीन 
तुझ्या पायी ॥

सेवा ही अर्पून 
जगा सुखवीन 
तुजला पाहीन 
जीवो जीवी॥

विक्रांत दत्ताचा 
करी रे प्रितीचा 
पथ स्वरुपीचा
दावी आता ॥
*****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https:// kavitesathikavita.blogspot.com 

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

मी मोठा

मी मोठा
******
मी मोठा
रे मी मोठा 
कारण माझा 
बाप मोठा 
तू छोटा रे 
सदैव छोटा 
कारण तुझा 
बाप छोटा 

पैसा माझा 
सत्ता माझी 
म्हणून  असे
मला गाडी 
माझी माडी 
अन समोर 
बडी धेंडी 
मान तुकवून
हसती थोडी 

तुला चाकरी 
माझ्या दारी 
बाप मोडतो 
दारी भाकरी 
मान मजला 
करी सलाम 
समोर माझ्या 
खाली मान 
रे मी मोठा 
अन तू छोटा 

नाहीतर मी 
चुका दाविन 
वाट लावीन 
काम काढीन 
भुके मारीन 
हा हा हा !
यात नच रे 
काही नवीन 
असे बळी 
तो कान पिळी 

माझा पैसा 
माझी सत्ता 
माझे सेवक 
माझे सैनिक 
धनको रे मी 
धनिक धनिक 
बाकी सारे 
माझे पाईक

राजा माझा 
प्रधान माझा 
न्यायनिवाडा 
तोही माझा 
देऊळ माझे 
देव माझा 
पुजारीही 
केवळ माझा 
तू छोटा रे 
सदैव छोटा 
बहू हुशार 
शिक्का खोटा 
मी मोठा रे 
मी मोठा 
कारण माझा 
बाप मोठा
*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

भिंत

Dear friends ,After reading  yesterdays fierce discussion 
on cast and reservation on my medical college group .I have written these few lines .
Hope some of you will agree with me .

भिंती 
***
कधी दृश्य होत्या 
कधी अदृश्य होत्या 
भिंती सततच होत्या 
भिंती रुततच होत्या 

लाख यत्न केले कोणी 
अन धडका मारल्या किती 
पण कधी पडल्याच नाहीत 
कधी हलल्याच नाहीत 
या भिंती

रंग बदलतो या भिंतींचा 
गिलावाही बदलतो 
नक्षी ही बदलतात कधी 
कधी बनतात त्यात 
नवीन दरवाजे 
पण सक्त कुलुपाचे 
परवानगीच्या फर्मानाचे 
त्याने अधिकच वाढतो 
रुबाब या भिंतींचा 
अधिकच घट्ट होतात त्या भिंती
असे वाटते 
कधी पडणारच नाहीत या भिंती 

काल तिकडून उभारल्या जात होत्या भिंती 
आज इकडून उभारल्या जात आहेत भिंती 
सहस्त्रावधी अवमानित 
आत्म्यांचा आक्रोश जागा करीत 
पण . . पाडल्या जात नाहीत या भिंती

सत्ता श्रेष्ठत्व उच्चत्व 
यांचाच खेळ हा शेवटी 
पैसा भुक मृत्यू भीती 
हीच इथली खरी शस्त्र असती 
गांधीलमाशी मधमाशी 
लाल मुंगी काळी मुंगी 
युद्ध येथे रोजच चालती

कधीतरी या भिंतीस
पाडले होते खिंडार 
नाथ मच्छिंद्र गोरक्ष यांनी 
कबीरादी ज्ञानेश्वरांनी 
नाहीच तुटली ही भिंत तरीही 
देव झाले तेच 
मांडले गेले या भिंतीवरती 
खरंच का तुटत नाहीत या भिंती ?

मान्य आहे सगळ्यांनाच 
किती अनैसर्गिक आहेत या भिंती 
किती लाजिरवाण्या आहेत या भिंती 
पण या भिंतींच्या अलीकडे 
आहे एक संस्कृती 
अन पलीकडे आहे दुसरी संस्कृती 
काहीही करून त्यांना 
ती टिकवायची आहे 
आणि काहीही करून 
यांना ती जाळायची आहे 
मग सांगा बरे कशा तुटतील या भिंती 

खरे तर 
या जगात संपूर्ण टाकाऊ 
असे काहीच नसते 
मातीतच मिसळलेले सोनेही असते 
वेचले तर जीवन समृद्ध होते 
फेकले तर दारिद्र्य भोगावे लागते 

कदाचित तुटतीलही या भिंती 
काळौघात विरुनही जातील 
पण आज तरी या भिंतींचे
अस्तित्व स्वीकारत जगत 
तिच्या दार खिडक्यातून 
आत बाहेर जात 
देणे घेणे करीत
जगण्यातील तिचे अस्तित्व
 "गौण करण्यात "
शहाणपण आहे 
नाही का?

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

देशमुख सिस्टर (श्रद्धांजली)

देशमुख सिस्टर(श्रद्धांजली)
*************
आत्ताच कळले 
देशमुख सिस्टर गेल्या .
देशमुख सिस्टर रिटायर होवून 
चार पाच वर्ष उलटली असतील
मी पाहिले होते तेव्हा 
त्यांचे कडक करारी भक्कम 
व्यक्तिमत्व पाहून 
असे काय होईल असे वाटले नव्हते .
देशमुख सिस्टर होत्या 
कर्तव्यकठोर शिस्तप्रिय 
पण त्यांच्या कृतीत असायचे
कामावरील प्रेम अन
त्यांच्या शब्दातून जाणवायचे 
त्यांचे निर्मळ मन 
बोलतांना व्यक्त व्हायचे 
जीवलग अन प्रियजनावर 
असलेले अपार प्रेम 
त्यांचे बोल असायचे खणखणीत 
कोणाचीही मुलाहिजा ना बाळगत 
यायचे वातावरण भेदीत 
त्या सहजच एकेरीत हाका मारीत 
आई सारखा दम देत 
त्यांना टाळणे 
भल्या भल्या कामचोरांना 
नसे जमत 
त्यांना नाही कसे म्हणावे
कोणालाच नसे कळत.

सावळासा रंग 
शुभ्र पांढरे केस 
कपाळावरील ठसठशीत कुंकू 
गळ्यातील मंगळसूत्र 
सरळ नाक 
करारी चेहरा 
लाल पट्ट्यातील देशमुख सिस्टर
 वावरायच्या अपघात विभागात
तेव्हा वाटायचे 
खरेच या देशमुखीच करीत आहेत .
त्यांचे हसणे बोलणे 
असायचे एकदम मोकळे 
माळावरील आकाशासारखे 
एकदम अकृत्रिम 
गावाचा स्पर्श असलेले .
असे वाटायचे 
त्यांनी सारे जग जाणले असावे 
त्यांना कोणी फसवू शकणार नाही 
कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही .
असे एक भारदस्त स्पष्ट
कडकडीत खणखणीत व्यक्तिमत्व 
आपल्यातून निघून गेले आहे .
जरी त्यांना खूप वर्षे भेटलो नसलो 
तरी त्यांचा आवाज कानात घुमत आहे
अन त्यांचे जाणे 
मनाला खिन्न करीत आहे  .

डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...