रविवार, १२ जुलै, २०२०

येता अवसरू

येता अवसरू
++
दुःख भरले मनात 
ठेव भरून ओठात
नको येऊन देवूस
उगा आषाढ डोळ्यात 

नाती क्षणांची अवघी
कोण कुणाचेच नाही 
क्षण सुखाचे भेटले 
मान ऋण त्यांचे काही 

जन्म-मरण इथले 
कुणा आहे रे सुटले 
ताटातुटीत उद्याचे
बंध आहे रे बांधले 

काळ पुरुषाचा जरी 
कधी हीशोब चुकतो 
जाते हरवून धागे 
कधी पतंग फाटतो 

होते चुकामुक कधी 
कोण येतो पुढे पाठी 
चाले प्रवास हा प्राप्त 
काही नसतेच हाती 

गेले दूर त्या जाऊ दे 
नको अडवून धरू 
पुढे पडणार गाठी 
पुन्हा येता अवसरू

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, ११ जुलै, २०२०

काही गवसले

काही गवसले
******""""*****
दिस आता उगाचच
खळीमध्ये डुंबायचे 
डोळ्याच्या मधुशाळेत 
स्वतःला हरवायचे 

कधीचेच कुठेतरी 
मित्र हो आहे सरले 
देहाच्या पलीकडले 
मज काही गवसले 

कसे सांगू मी तुम्हाला 
काय म्हणू त्या स्पर्शाला 
उमलून देह जणू 
सुर स्वर्गीय जाहला 

वाजतो अलगुज हा
भरूनिया देह  सारा  
कणोकणी वादळतो
चंदन गंधीत वारा 

मनामध्ये पाझरतो 
चंद्र सुखाचा गहिरा
हरवते मन त्यात 
होते विश्व पसारा

खळीचा खळाळ यारो 
आहे चार दिवसाचा 
दत्त पदी मिळतो रे
अमृतकुंभ सुखाचा 

आता विक्रांत वेगळा 
असाच देहात बसला 
पाहतो दारे खिडक्या 
वारा उगाच वाहीला 

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १० जुलै, २०२०

जागृती

जागृती
******
जागृतीत जगण्यात 
जाणीवेचा जन्म आहे 
अवस्था जी निरंतर 
अरे विद्यमान आहे  ॥

विकारांच्या वादळात 
दाटले अज्ञान आहे 
जागताच जाणीव ती  
प्रकाश प्रसन्न आहे ॥

अहं वृत्ती स्फुरणात 
जगताचा जन्म आहे 
मावळता भास जाते 
ऐसे हे मी पण आहे 

दावितो  दत्त मजला 
श्रेष्ठ हे चि ज्ञान आहे 
सोड म्हणे मजलाही 
धरणे अज्ञान आहे 

धरणे सोडणे हे तो
वाऱ्याचे खेळणे आहे 
सदा असे  रुसले जे
मी पण हे गाणे आहे 

सोडूनिया शब्द तुला 
विक्रांत जगणे आहे 
सोहमची ज्योत स्थिर
हेच खरे मौन आहे 

****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ९ जुलै, २०२०

मावुली

मावुली
******
अगा माऊलीये 
अजून स्तिमित
तुझ्या मी दारात 
उभा स्तब्ध॥

अफाट अद्भुत 
झेपे न मजला 
होतो हरवला 
डोकावता ॥

किती हा प्रकाश  
किती हा झळाळ
करुणा कृपाळ
नीलवर्ण ॥

अनंत अफाट 
सागर पाहून 
हरवते भान 
जैसे काही ॥

तुझिया अवीट  
कृपेचा प्रसाद 
देई ग हातात 
तूच माय ॥

देई पसाभर
पाहुनिया बळ
जाण्या भवपार
उतरून ॥

विक्रांत इवला  
किनारी रंगला  
कण वाळूतला 
हरखला॥

https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ८ जुलै, २०२०

स्वामी माझा

स्वामी माझा

एक आत्मज्ञान 
शिकवी जगाला 
धरून हाताला 
स्वामी माझा ॥

जणू कृपादान 
येतसे दाटून 
करण्या सिंचन 
चैतन्याचे ॥

एकच तो ध्यास 
सर्वदा तयास 
लावावे ध्यानास 
सारे जन ॥

घडावी सर्वांना 
आपली ओळख 
चैतन्य पारख
सर्वांभूती ॥

विक्रांत थकला 
निवांत जहाला
तयाच्या पदाला 
येऊनिया.॥
++
https://kavitesathikavita.blogspot.com

बळी

बळी 
**
धारधार शस्त्र 
चाले मानेवर 
देह धरेवर 
मग पडे ॥

फिरलेले डोळे 
श्वासाचे फुत्कार 
प्राणाचा आधार 
सुटू जाय ॥

होय तडफड 
जगण्या देहाची 
अडल्या श्वासाची 
फडफड ॥

चार दांडगट 
चार पायावर 
भार डोईवर 
देती घट्ट ॥

होय आक्रंदन 
मल विसर्जन 
थरथरे तन
शांत होय ॥

रक्ताचे थारोळे 
चिकट गरम 
जातसे गोठून 
मिनिटात ॥
ऊर्जेचे भांडार 
क्षणांचे सजीव 
होऊन निर्जीव 
पडे सुन्न ॥

मग खाटकाची 
घाई सोलण्याची 
उभ्या लाईनची 
गर्दी मोठी ॥

कुणास कमर 
कोणास तो सीना 
कलिजा नि खिमा 
घेतो कोण ॥

जाय दाही दिशी 
देह अवयव 
मारतात ताव 
कोण कुठे ॥

माणसा पोटात 
किती रे कबरी 
अतृप्त चित्कारी 
भरलेल्या ॥

कोण जन्मा आले 
कोण कुठे मेले 
कशास जगले 
कळेचिना ॥

विक्रांत हत्तेची 
होते भरपाई  
जाणुनिया होई
कासावीस॥

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, ७ जुलै, २०२०

गुरूदक्षिणा

गुरूदक्षिणा 
******
मागितले दान 
मज गुरुदेवे 
दोष सारे द्यावे 
सकळ ते ॥

भूत भविष्याला  
टाक रे झोळीत 
वर्तमानी स्थित
मग रहा ॥

भूतकाळातून 
भविष्यात जाई 
सदा चित्त पाही   
ऐसे असे ॥

जैसा की लंबक  
हालतो डोलतो 
वृत्तीचा तोच तो 
स्वभाव रे 

सदा ध्यानी ठेव 
तूच तुझे चैतन्य  
मागणे न अन्य 
मग पडे 

विक्रांत वाहीला 
श्री गुरू पदाला
मी पण सुटला 
कष्टविना .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...