सोमवार, २७ एप्रिल, २०२०

दान



परत फेडीची
आस नको दाना
स्वर्ग आरोहना 
जाणे किंवा

नको अनुष्ठान 
नको अभिषेक 
नको अतिरेक 
कर्मकांडा 

पोटाचा तो यज्ञ 
एक मज ठाव
अन्नाचा अभाव 
न हो तिथे 

पुण्य पाप सारे 
मनाचेच शिक्के 
पाप कोणी विके 
पुण्यासाठी 

घेऊन हे हात 
टाक माझे दत्ता 
वाहो तुझी सत्ता
 तयातून 

घडो सारे जीणे 
माझे दत्तासाठी 
पापपुण्य गाठी 
पडू नये दो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २६ एप्रिल, २०२०

गुंजन

गुंजन
****

सुरा वाचून 
स्वरा वाचून 
मनात चाले 
सदैव गुंजन 
ददम दत्त दम
तदम दत्त तम 

अर्था वाचून 
मंत्रा वाचून 
बोल उमटती 
उगाच येऊन 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

दुचाकीच्या 
स्वरा मधून
पदरवाच्या 
बोला मधून
बोलाविल्या मी
कधी वाचून 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

मंत्र नसे हा 
दिधला कोणी 
वा काढला 
कुण्या ग्रंथातूनी
सहज स्फुरते 
अद्भुत वाणी 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

शब्दातच त्या 
लय लागुनी 
जाते भान 
कधी हरवूनी 
केवळ उरतो 
तोच ध्वनी 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम

खुळ्या मनाचा 
खुळेपणा हा 
बडबड गीता 
मोठेपणा वा
झिंग तयाची
बहु वाहवा 
ददम दत्त दम 
तदम दत्त तम 

सुटला विक्रांत 
फुटला विक्रांत
वेड मिरवतो
या जगतात
शब्द तेच ते
बसतो गात
ददम दत्त दम 
तदम दत्त तम 

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

दत्तात्रेया

ठेव दत्तात्रेया  
मज निरंजनि
काजळीवाचूनी
कल्पनेच्या

पाव दत्तात्रेया
मज कृष्णेकाठी
गिरनार गाठी 
कधीतरी 

बस दत्तात्रेया 
मज  ध्यानी मनी 
सुटूनी त्रिगुणी 
अट्टाहास 

 ऐक दत्तात्रया 
कधी माझी गीत 
होऊनिया मित 
जीवलग 

देई दत्तात्रेया
मज भक्ती भाव 
संतसंग दाव 
सर्वकाळ  

मग दत्तात्रेया 
विक्रांत भाग्याचा 
होईल सुखाचा 
हिमालय 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesarthikavita.blogspot.com


गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

गुन्हा

गुन्हा
****

साधू होता 
म्हातारा होता 
जीव त्यालाही 
प्यारा होता .
जखमा होत्या 
वेदना होती 
डोळ्यात आर्तता 
भरली होती

कुणाचेच त्याने 
काहीही कधीही
बिघडवले नव्हते 
तसेतर
मरायला काहीच 
कारण नव्हते 

घाणेरडे राजकारण 
सडलेले मन 
भगव्या वरील 
द्वेषाचे प्रकटीकरण 
सारे कुयोग कसे 
जुळून आले होते 
मस्तक 
कर्तव्यनिष्ठतेचे 
झुकून खाली होते 
भयाने वा 
आणिक कशाने 
हात निष्प्रभ
बांधले होते 

निरपराध त्यांना
पळता येत नव्हते  
तरी पळावे लागले 
असंख्य घाव वेदनांचे 
देही झेलावे लागले 
आणि पत्करावे लागले 
मरण असे दारूण
पशु समान 
माणसाच्या हातून 
कारणा वाचून 
गुन्ह्या वाचून  . . 

पण कदाचित 
एक गुन्हा 
त्यांनी केला होता 
फक्त भगवा पेहराव 
घातला होता.
********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

माय दारावर

माय दारावर

********

 

दाटुनिया विश्व भरे सोहं गाणं

चिद्रुपाची खाण ओसंडली ॥

आकारी नटला देव निराकार

चित्त तदाकार होण्याआधी ॥

खेळण्या सादर असे साथीदार

पडता अंधार जाणे घरा ॥

सोहं हेचि साध्य आणिक साधन

शेवटचे ठाणं गाठावया ॥

विक्रांत मनात स्वामी करे घर

माय दारावर उभी असे ॥

****

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे

htps://kavitesathikavita.blogspot.com

 

 

 

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

देवाहाती शस्त्र


देवा हाती शस्त्र असती कशाला 
साधू  रक्षणाला दुष्ट मारण्याला 
वधितो देवही सांगतो वधाया
शेत राखण्यास तण उपटाया
पण कष्ट तेही का द्यावे तयाला 
न्याय सत्ता जर मिरवे स्वत:ला 
न्याय हाच धर्म हीच संविधान  
तर मग घडो तयाचे पालन  
दुष्ट दुर्जनांचे घडावे हनन  
न्यायदेवते हे तुझिया हातून  
साधू  न मरावे पथी तडफडून  
गोवंश न जावा निर्वंश होऊन  
मारावे राक्षस मारावे भक्षक  
धर्म नीती न्याय होउ दे रक्षक.

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
htpps://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २० एप्रिल, २०२०

खुणगाठ



खुणगाठ
*****

माझ्या मनाला
मिळे खुणगाठ
सरू आली वाट
माझी आता ॥

जन्ममरणांचा
सुटू आला गुंता
दत्ताचिया पंथा
चालू जाता ॥

सुटू सुटू आले
हे ऋणानुबंध
असंख्य संबंध
पडलेले ॥

झाले देणे घेणे
जमा शून्या खाती
कर्माची वाहती
गती मंद ॥

जाहलो लाकूड
शुष्क वाळलेले
धुनीशी ठेविले
तयारीत ॥

अवघा पसारा
वाहणारा वारा
तयात धुरळा
विक्रांत हा ॥
***
©®डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...