रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

दान


दान
****
कृपाळू होऊन
दिले तू जे दान
सुखाने भरून
पावलो मी ॥
दिलीस ती शांती
मनो गाभाऱ्यात
प्रेम प्रकाशात
नांदतो मी ॥
झालास सोयरा
भार वाहणारा
कृतज्ञ दयाळा
जाहलो मी ॥
आता कुठे जावे
वाया वणवण
दत्ताचे चरण
पाहिले मी ॥
उमजून माया
मैत्रीत रुजलो
अवघा राहिलो
भरून मी ॥
विक्रांत सुजान
करुनी सोडला
पायी बसविला
सुटून  मी ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दत्ता भार माझा



दत्ता भार माझा
********* ***
दत्ता भार माझा
किती रे वाहसी
सदा सावरीसी
पडताना ॥
काय माझे पुण्य
केवढे से तप
परी सुखरूप
ठेवीसी तू ॥
भक्त सागरात
कुण्या कोपऱ्यात
तुजला स्मरत
राहतो मी ॥
परि त्या स्मरणी
जाहला तू ऋणी
देतो किती देणी
भरूनिया ॥
मायबाप माझा
सखा तू सोबती
जडली रे नाती
तुझ्या ठायी ॥
कळे ना मजला
तुझी कृपा दत्ता
लोळतो मी पदा
सदा तुझा ॥
ठेव दृढ पायी
तुझा तू विक्रांत
नच उधळत
जावो कुठे ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

येशील ना?



येशील ना
*******:

लोहाचे सुवर्ण
करिसी तूं देवा
देई ज्ञान ठेवा
मुढासही ॥
मृतासी दातारा
देई संजीवन
अभाग्य मोडून
कुणाचे ते ॥
विकारी मरतो
तया वाचवीशी
दया दान देसी
कृपा करे ॥
यवन संकटी
पडे प्रिय भक्त
तया अलगद
सोडविशी ॥
अनाथा सनाथ
भक्तांची तारक
दुर्जना मारक
सदोदित ॥
ऐसी तुझी कीर्ती
म्हणूनिया आर्ती
उरि या विक्रांती
उठे मोठी ॥
येशील ना दत्ता
कधी माझ्यासाठी
संपण्याच्या आधी
श्वास माझे ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मिनाक्षी झांजे मावशी




मिनाक्षी झांजे मावशी
**************
प्रसन्न चित्त
निर्मळ स्मित
कामात  सत त
मग्न अशी ॥

मीनाक्षी मावशी
सर्वांची लाडकी
सर्वांशी भावकी
असे तिची

नाही बडिवार
नाही अहंकार
नम्र व्यवहार
सदा असे

फुलांचा गंधात
छान गजऱ्यात
करे सभोवत
प्रसन्नसे

कष्टाचे दिवस
सदा स्मरणात
वदे धन्यवाद
दया घना

अशा या व्यक्ती
जीव लावतात
मनी राहतात
विक्रांतच्या


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

रिता घट





विक्रांत रिता हा
घट काठावर
असे अहंकार
भरलेला

उचल दयाळा
लावी रे धारेला
आदळी तयाला
इथे तिथे

भरावा बुडून
अथवा फुटून
जावा हरवून
चैतन्यात

भरल्या वाचून
घट जन्म व्यर्थ
त्याला नच अर्थ
काही इथे

भरणे बुडणे
फुटणे वाहणे
अवघे घडणे
तुझ्या हाती 




© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

चंदने सिस्टर



सरिता चंदने सिस्टर
*************
कसे वागावे
कसे बोलावे
कसे जगावे
हे सारे शिकावे
ते चंदने सिस्टराकडून

आपण कोण आहोत
काय करीत आहोत
का करीत आहोत
यांचे सदैव भान
कसे ठेवावे हे शिकावे
ते चंदने सिस्टरांकडून

कुणी मानो या ना मानो
कोणा आवडो वा न आवडो
एक आदर्श सिस्टर
एक आदर्श सिस्टर इन्चार्ज
कशी असते कशी असावी
ते शिकावे चंदने सिस्टराकडून

एखादी व्यक्ती एकाच वेळी
दरारा ठेवून अत्यंत प्रेमाने
कशी बोलू शकते
शांत राहू शकते
याचे मला नवल वाटते ,खरेच
ते शिकावे चंदनी सिस्टराकडून

चंदने सिस्टर स्टाफ का झाल्या
याचे मला अगोदर नवलच वाटायचे
परंतु त्या पाठीमागची कथा
त्यांनी जाणून बुजून घेतलेला
हा सेवा करण्याचा वसा
जेव्हा मला कळला
जेव्हा त्यांनी मला सांगितला
तेव्हा त्यांच्याबद्दलचा
मला वाटणारा आदर
अधिकच वाढला

पण त्या जर
हि वाट चुकल्या असत्या
तर आम्ही नक्कीच मुकलो असतो
एका छान व्यक्तिमत्त्वाला
उत्कष्ट स्टाफ ला
पण तर मग त्या असत्या
एखाद्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या पदाला
आकाशाला भिडलेल्या
हे नक्कीच

सिस्टर बरोबर कॅज्युलिटी पासून
काम करित असतांना जाणवले
त्यांना असलेले या विषयाचे सखोल ज्ञान
रुग्णांबद्दल प्रचंड सहानुभूती
आणि आपण महानगर पालिके सारख्या
संस्थेत काम करीत आहोत हि जाणीव
त्यांच्या मर्यादेचे भान
यांना सतत असते

आपण करीत असलेल्या
कृतीमागील शास्त्र
त्यात अंतर्भूत असलेले तत्त्वज्ञान
यांच्या मनात अगदी स्पष्ट असते
तिथे अजिबात शंका नसते

मला त्यांची काही
थोडीफार वैयक्तिक  माहिती आहे
त्यानुसार त्या एक आदर्श मुलगी
आदर्श पत्नी
आदर्श माता
आदर्श सून आहेत
कळत वा नकळत
हे आदर्शवत होण्याचे वेड
हा वसा त्यांना
त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला आहे
त्यांना जसे हे वेड लागले
तसेच अापना सर्वांना लागो
अन् हे रसरशीत जीवन
पूर्णपणे जगण्याची ती प्रेरणा
आपल्यालाही मिळो
हीच प्रार्थना


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

तपशीलात दत्त


तपशीलात दत्त
************
तपशीलात दत्त माझा
कधीच शिरत नाही
तू काय खातो पितोस
असे कधी विचारत नाही 
.
सोवळ्याच्या घरी सोहळ्यात
बसे मखमली कपड्यात
ओवळ्याच्या घरी ओवळ्यात
बसे विटक्या फडक्यात
.
राहतो कुठेही आनंदाने
प्रेमे ऐकतो माझे गाणे
तूप साखर कांदा भाकर
घेतो भोज कौतुकाने
.
हे सारे वरचे पसारे
असतो जाणून पुरतेपणी
त्या काहीच नको असते
श्रद्धा आणि भक्ती वाचूनी
.
असा देव ओळखला
ह्रदयाशी  दृढ धरला
जन्म हरखून विक्रांत
मग दत्ता खेळी रंगला
**

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...