शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

नदी माय


नदी माय

पाण्यात या शिरू नका
पुराशी त्या खेळू नका
चिडली ही नदी माय
तीची साक्ष काढू नका

जीवनाची धात्री जरी
सारे नाही तिच्या हाती
वरुणाचे देणे कधी
जड होते तिच्या माथी

युगेयुगे धावती ती
तिला ठाव तीच गती
तेच पाणी दिसे तरी
नित्य नवी होते रिती

पाणियाचा धर्म पाणी
गाणे जीवनाची गाणी
खोलवर डोहामध्ये
परि कालियाची फणी

आदबीने वागायाचे
काठावर राहायाचे
सहज ती होता पुन्हा
अंगावरी लोळायाचे

देणारीही तीच आहे
घेणारीही होते कधी
म्हणून का होते कधी
लेकराची कमी प्रीती

तटाहून दारांमध्ये
दारातून घरामध्ये
आली तरी म्हणतो मी
माय माझे भाग्य मोठे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

**

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

एक दत्त खरा






एक दत्त खरा

--
एक दत्त खरा
बाकी तो पसारा
भोवताली सारा
मज दिसे 
.
सारी खोटी खोटी
जगताची रिती
अवधूता प्रीती
जडू दिली 

गेला भ्रम  जरी
वाहतो संसारी
आनंद उजेरी
अंतरात 

अवघी तयाची 
असे कृपा दया 
कळू आली माया 
थोडी बहू 
.
विक्रांत विरळा
येथुनी सुटला
दत्ताला भेटला
अंतरंगी

.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

भिकारी मी भिकारी




भिकारी  मी भिकारी
********************

भिकारी  मी भिकारी
या नरहरीचा भिकारी ..धृ..

आलो तया दारी
या गाणगापुरी   
भरी माझी झोळी
दत्ता, देई भक्ती खरी

मज गांजले विकारी
मज झोडीले संसारी
दत्ता येई लवकरी
सोडव रे झडकरी

ये दिन माथ्यावरी
हा जन्म वाट्यावरी
तुझ्याविना दत्ता कोण
घास मुखी या भरी

दे विक्रांता चाकरी
या याचका भाकरी
अथवा जावो प्राण हे
दत्ता तुझ्या दारी
 ***
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...