शुक्रवार, १२ जुलै, २०१९

पंढरी



अवधूत पंढरी

पाय चालती चालती
अास  उरात धरुन
धन मान यश भान
गाठी तोडून सोडून 

कोण आलेले कुठून
कुठे जायचे निघून
शंका भीतीचे मळभ
गेले गजरी  विरून

कुणा भेटणार काय
काही जाणल्या शिवाय
देती झोकून स्वत:ला
मनी बाप रखुमाय

ओढ कुणाची कशाला
मुळी कळेना मनाला
डोळी वाहती का धारा 
शब्द ओठी ये विठ्ठला

बाप अवधुत माझा
बसे पंढरी सजून
बाळ विक्रांत नाचतो 
हाती पताका घेवून

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, ११ जुलै, २०१९

पडावा हा देह


पडावा हा देह
तुझिया चरणी
ओघळून मनी
श्वासाचे या   

अन्य अवधूता
काही न मागणी
जन्माची कहाणी
तुच होय ॥

सुखाच्या हिंदोळी
दुःखाचे गचके
जागोजागी धक्के
द्द्ंडाचे ॥

सत्तेची घमेंड
पैशाचा वा माज
उन्मतांची गाज
येथे चाले ॥

नको देवराया
तमाचे हे जग
शोषितांचा ओघ
जिथे वाहे ॥

पापाची आंधळी
चाले कोशंबीर
कलि मनावर
राज्य करी ॥

विक्रांत शिणला
दोषात मळाला
केवळ उरला
तुज मुळे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



बुधवार, १० जुलै, २०१९

मुक्त करी


आता या देहाचे
रो देवा काज
स्वरूपाचा साज
जन्म होवो  

दावी काही कळा
सुखाचा सोहळा
पाहुनी मोकळा
करी मला ॥

विरलेले धागे
विटलेला रंग
गाठी या सवंग
सोडव रे  

कितीदा घातली
कितीदा फेडली
जगी मिरवली
वस्त्रे पुरे ॥

जरी का उरले
प्रारब्धयाला
पुने पायाला
री दारी ॥

विक्रांत देहाला
शिणला मनाला
विनवी दत्ताला
मुक्त करी ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


००००

मंगळवार, ९ जुलै, २०१९

कृतार्थ सांगता



कृतार्थ सांगता
***********

देह हा जगाचा
पंच महाभूतांचा
वाहत्या विश्वाचा
कण फक्त ॥
व्याधींनी ठेचला
दुःखांनी वाकला
अतृप्ती ओतला
जणू रूप ॥
विकारी जळला
विकारी मळाला
विकारी चालला
मृत्यूकडे ॥
ऐसिया देहाचे
करावे ते काय
श्रीदत्त उपाय
करी माय ॥
नको रजकाची
वांछा भोगण्याची
धुणी ती जन्माची
धूवायाची ॥
विक्रांत प्रार्थितो
तुज अवधूता
कृतार्थ सांगता
करा यांची ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
०००००

सोमवार, ८ जुलै, २०१९

मनाचा बाजार


मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता

हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥

एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥

का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥

मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥

विक्रांत मनाला
वाहितो तुजला 
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


रविवार, ७ जुलै, २०१९

वारी




वारी
***

सर्वव्यापी सनातन
ज्ञानदेव पुरातन
पंढरीसी येणं जाणं
एकपणी रसपान

जाणीवेच्या मातीमध्ये
उगवणे जागेपण
अवकाश व्यापूनिया
विरलेले देहभान

पादुकांची स्पर्श भेट
जोडणारे जनमन
एका भाव एक ध्यास
लाखो चालती चरण

चालण्याच्या सोहळयात
जन्म जगण्या वेढून
वाटेचे निमित्त फक्त
आत स्थिरावला क्षण

चाल बापा त्या पथाने
स्वरूपात मुरलेला
वाहणारे पाय वाहो
शब्द थांबो चाललेला


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

आसक्ती


आसक्ती
********

कशाला आसक्ती
हाडांची मांसाची
सजल्या त्वचेची
जगन्नाथा

जनुकात बंद 
प्रजनन छंद
घेण्या देहबंध
नव्या रुपी ॥

कामातूर मन
तोच भोगवटा
मरणाच्या वाटा
घोंगावती ॥

मनोमनी चाले
सुखाचा हा शोध 
अतृप्तीचा नाद
विश्व भरे ॥

विक्रांत मागतो
कृपेची सावली
सरू दे काहीली
दत्तात्रेया ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...