बुधवार, १२ जून, २०१९

भारी माझा दत्त गं




भारी  माझा दत्त गं
************


कळी काळाला भारी 
भारी  माझा दत्त गं धृ ॥
रुसलेल्या ओटीत 
भरतो आनंद गं
वाढवितो गोकुळ
कृष्ण अंगणात गं ॥
सांभाळतो कळीला
ऊन पावसात गं
थांबावितो अवकाळा
हाती शुल घेत गं 
डा पीडा भूतबाधा  
बुडे कृष्णाईत गं
कुण्या पुण्याईने ये
माझ्या पदरात गं ॥
आला अवचित हा
सखा जीवलग गं
हरखतो विक्रांत
पाहून कौतुक गं

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

दत्त द्या रे




दत्त द्या रे
कुणी
दत्त द्या रे
मज
दत्त द्यारे
प्रभू
दत्त   द्या रे ॥


पदी प्राण मी
अर्पीन तया
जो दाविन
प्रभू पदाला 

जन्मोजन्मी
चाकर होईन
सदैव राहीन
त्या दाराला 

ते भाग्याचे
क्षण मनोहर
हृदयी धरीन
त्या रुपाला 

पंचप्राण ही
ओवाळून मी
हरवून जाईन
अस्तित्वाला 

हे शब्दांचे
नसे गुंफणे
भाव रे मी
त्यात ओतला

भेटीची ही
आर्त माझी    
कधी फळेल   
ठाव न मजला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

०००००


मंगळवार, ११ जून, २०१९

ती गेली




ती गेली
*****

चार तापाची साथ ही सुटली
क्षणात सुटली
सौख्य सारी

आताच भेटली गमते मजला 
आताच फुलला
होता ऋतु

तव गजर्‍याचा गंध अजून तो 
बघ दरवळतो
कणोकणी

तीच सळसळ तव पदरांची 
गृह चैतन्याची
साक्ष असे 

आणि किणकिण देही भरली 
चुड्या मधली
रुंजी घालते 

येईल हाक अहो म्हणूनी
अवचित कानी
सदा वाटते 

कुठे न गेलीस कधी न सांगता 
मग हे आता
घडे कसे

सोबत सदैव हवी तुला ना 
मग सांगना
काय झाले 

गेलीस ते ही तू खरे ना वाटते 
स्मरतो जरी ते
भ्रम वाटे 

तुझ्या वाचून इथले जगणे 
उगाच वाहने
देह जणू

हातात हात तुझा राहावा 
सवेची यावा
जन्म पुन्हा 

ऋणानुबंध हे कधी न मिटावे  
सदैव पहावे
मी  तुजला

एकच सखये हे होते मागणे 
तुजला घडणे
जाणे असे 

तुझ्याविना मज कसले राहणे
जुनेच दुखणे
तू ते जाणे


थांब जरासी त्या दारावरती
पावुल काढती
घेतो मी ही



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





सोमवार, १० जून, २०१९

राम होई





राम होई
******
अमूर्ताचा गाभा
प्रेमाचिया ओघा
भक्तांचिया लोभा
राम होई 

शब्दातीत सत्य
मनाच्या अतित
दिसण्या किंचित
राम होई 

निर्गुणाचे शून्य
आकार लेवून
सगुणी सजून
राम होई 

इंद्रियावगम्य
प्रज्ञा प्रावरण
प्रेमाला भुलून
राम होई 

विश्वाचे कारण
विश्वाला व्यापून
उरे शब्द दोन
राम होई 

लौकिका सोडून
जाणीवी जगून
विक्रांतचे स्वप्न
राम होई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
।०००००


रविवार, ९ जून, २०१९

तुझा हात





तुझा हात 
********
तुझा हात होता 
युगांची विश्रांती 
थकलेल्या मना 
संजीवनी बुटी 

प्रेममय हाती 
ऊर्जेचे भांडार 
चैतन्याची आभा 
स्नेहाचे आगार 

तुझा हात होता 
सुखाची सावली 
दमल्या जीवाची 
सरली काहिली  

आकाश ओंजळ 
मेघांनी भरली 
आशा अंकुरली 
जीवनी सजली 

तुझा हात होता 
पाठीत धपाटा 
चुकता पाऊल 
वाट दाखवता 

सदा संकटात 
उचलून घेता 
वादळवाऱ्यात 
छत सांभाळता 

तुज कैसे म्हणू
आभार बोलांनी 
आणि उतराई 
पाठीत वाकूनी॥

करू देहाची या 
पायाची वाहाण 
करू काळजाचे 
किंवा लिंबलोण 

कळेना मजला 
म्हणून मी मौन 
होवूनी पदी तव 
राहतो पडून॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...