शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

संचिताचा खेळ खुळा





संचिताचा खेळ खुळा
तुझ्या माझ्या नात्यातला
मांडीयला त्या कळेना
अंत काय द्यावा याला

द्यावी फरफट उगा
की अर्थ काही सजला
साकळले व्रण किंवा  
हात हळू फिरणारा

मागण्या वाचून आले
दान हाती जे या करी
स्वागताला सज्ज सदा
झेलून त्या घेतो उरी

सुख दु:ख भरलेले
जीवनाचे वाहे पाणी
भेट होता तुझी गेलो   
सांज रंगात रंगुनी

तेच क्षण मागतो रे
मी तया पुन्हा पुन्हा
वाहण्याचा धर्म दे रे
जीवनात जगतांना

लेख लिहलेले भाळी
सटवीचे असो काही
पाहतो मी तुला असे  
भाग्य हे ही कमी नाही

म्हणती प्रारब्ध कुणी
जाणे इथेच भोगूनी
म्हणतो मी भाग्य त्यास
घेतो आणि आलिंगूनी


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

दत्ताची गाणी





दत्ताची गाणी
***************

दत्ताची ही गाणी
येतात रुजूनी
मनी पाझरूनी
आपोआप ॥१॥

म्हणतो मी माझी
घेतो मिरवूनी
लिहविता धनी
वेगळाची॥२॥

दत्त कृपामुर्ती
एकेक करूनी
देतसे वेचूनी
शब्द मला॥३॥

प्रकाशी प्रकाश
मांडली आरास
उषेच्या घरास
सुर्यदेव॥४॥

जलाने जलास
पुजियले खास
अर्ध्य सागरास 
देवूनिया॥५॥

भाग्य ओंजळीचे
जुळल्या करांचे
रित्या विक्रांतचे
उदयले॥६॥

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

दत्त पदावर





दत्त पदावरी
मन माझे जाते
आणिक वळते
न माघारी ॥१॥

दत्ताच्या प्रेमात

असे हरवते
नच की रमते
अन्य कुठे   ॥२॥

दत्ता वाटेवरी

मला राहू दे रे.
सदा गावू दे रे
गीत तुझे ॥३॥

तुझे गोड रूप

डोळा पाहू दे रे .
खरा होवू दे रे
तुझा भक्त॥४॥

विक्रांत बसला

दत्ताच्या दारात
जगणे पाहत
दत्त लीले ॥५॥
*****************

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

ये घायकुती



ये घायकुती
*******
कृपा करी
दीनावरी
दुःख दैन्य
सारे हरी

जडलेली
आधिव्याधी
देहातून
दूर सारी

आलो देवा
तुझ्या दारी
जन्म जरा
पार करी

तुझामी
म्हणे जरी  
गुरू देवा
गिरनारी

भेटी नाही
तुझी परी
दु:ख हेच  
मज भारी

शिणलो मी
जन्मांतरी
येई आता
झडकरी

विक्रांत ये
घाकुती
आस तुझी
दत्ता उरी  

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

******

 


मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

फक्त एक कृपा कर




 फक्त एक कृपा कर
****************


प्रभू दत्ता माझ्यावर
फक्त एक कृपा कर
वाहणाऱ्या जगण्याचे  
सावध साधन कर

तसे तर मन मला
कधीच आहे ळले
लाख प्रहार करूनी
मी पण नाही ळले

कुठे तरी वेडे बी
व्यर्थ अंकुर धरते
गुण माया सोबतीत  
नि सूर भरू पाहते

सुखांची ही भाषा आता
मला सोसवत नाही
विस्कटलेल्या स्वप्नात
रंग भरवत नाही

दे दृढ निर्विकारता
एकांत भरू दे चित्ता
अस्तित्वा स्पर्शू नये रे
जगण्यातील व्यर्थता  

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

या जन्माच्या वाटेवरती




या जन्माच्या
वाटेवरती
दत्ता लई लई 
काटे रे ॥धृ॥
येता पायात
टोचतात रे 
पाहता मनात
खुपतात रे
जाणता ह्रदयी
रुपतात रे
अंती तुलाच
स्मरतात रे ॥१॥
दत्ता काट्याचे
भय नाही रे
दत्ता चालण्यात
गय नाही रे
दत्ता मनात
फक्त राही रे
तुझ्या प्रेमाचे
बळ देई रे ॥२॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बाळपणींच सर्वज्ञता





बाळपणींच सर्वज्ञता 
वरी तयातें ॥ ४५३ ॥ ज्ञा.६

देहाच्या आकारी
प्रकाश पाझरे
ज्ञानाचे उजिरे
जगतात ||

जसे का उजेड
सूर्याच्या आधी
येवून जगती
उभा ठाके ||

बालकपणीच
पुर्णत्वे भरून
दशा विसरून
आले ज्ञान  ||

हे तर चरित्र 
देवा हो आपुले
शब्दात ठेविले
आपणच ||

होवून आरसा
दाविला चेहरा
उपकार भला
जगी केला ||

घेवून शब्द हे
तुमचे उशाला
विक्रांत निजला
ध्यानशेजी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in



महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...