रविवार, २७ जानेवारी, २०१९

मन दत्ताचे



मन दत्ताचे
*********

मन वाऱ्यांचे 
मन ताऱ्यांचे
मन विखुरल्या 
कण पार्‍याचे 

मन आकाशी 
मन प्रकाशी
मन येऊनिया 
तव दाराशी

मन भिजले रे 
मन थिजले रे
तव रूपात 
बघ सजले रे

मन पाण्याचे 
मन गाण्यांचे
मन कोंडल्या 
तव प्रेमाचे

मन नाचते 
मन खेळते
मन सदैव 
तुज स्मरते

मन विक्रांतचे 
मन जगताचे
मन संकल्पी 
होय दत्ताचे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



शनिवार, २६ जानेवारी, २०१९

अवधू




अवधू
*****

अवधू माझा
सखा जीवाचा
असे प्रीतीचा
महाराज ॥१

कुठे बसला
कुठे वसला
नसे दृष्टीला
ठाव त्याचा ॥२

कैसा भेटीन
कै मी पाहिन
डोळा भरून
जिवलगा॥३

मार्ग दिसेना
तम  हटेना
चैन पडेना
जीवा माझा ॥४

येई दयाळा
भक्त प्रेमळा
घेई ह्रदया
या विक्रांता ॥५

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


स्वातंत्र



स्वातंत्र
*****

स्वातंत्र्य म्हणजे काय असते
फक्त एक कल्पना असते
आपण गुलाम आहोत
हे कळल्यावर उठणाऱ्या
वादळाची धूळ असते

राजकीय गुलामी कळणे
तर सोपे असते
तिच्या विरुद्ध लढणेही
सोपे असते

आपण वागवीत असतो
ती मानसिक गुलामी
ती तोडणे खूप कठीण असते

आपण गुलाम असतो
रूढीचे संस्कृतीचे जातीचे धर्माचे
या सा-याचे जीवनातील
अपरिहार्य सांघीक व सामाजिक
 स्थान ओळखून
त्यांची गुलामी नाकारून
त्यांच्यावरती उठून
आपण जेव्हा विराजमान होतो
मानवतेच्या भूमिकेवर
तेच खरे स्वातंत्र्य असते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

तुझ्या विन





तुझ्याविन

अजूनही मनास या
तुझीच आस आहे
अजूनही डोळ्यात या
तुझेच भास आहे

सैराट जन्म जरी हा
जाहला कुठे किती
येतेच हि नाव माझी
सखये तुझा तटी 

उरातला हौदोस हा
कळेना या जीवाला
येई वावटळ ऐसी
चैन पडेना जीवाला

हरवते जीवन हे
सखी तुझ्याविन
निस्तब्ध श्वास होती
हे आकाश ही जमीन  

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

स्वप्नातल्या देवा



स्वप्नातल्या देवा
सत्यात येऊन
मजला घेऊन
जाशील का ?

पाहिले रुप जे
स्मृती प्रदेशात
प्रत्यक्ष डोळ्यात
दिसेल का ?

तव पादुकांचा
स्पर्श तो सुखाचा
भाग जागृतीचा
होईल का ?

जे भोगले तेथे मी
सुख सोहळ्यात
व्यर्थ जीवनात
उमटेल का ?

त्या गुढ डोंगरी
पुराण मंदिरी
कोरल्या राऊळी
भेटशील  का ?

अशी जाग आता
नको रे दयाळा
विक्रांत जिव्हाळा
होशील का ?


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, २३ जानेवारी, २०१९

दत्ताच्या शिवारी



दत्ताचा शिवारी
असे कुळवाडी
राखतो मी वृत्ती
तया कृपे 

कुंपण सावरी
गुरांना सांभाळी 
गोफन गरारी
घेई हाती ॥

सहा महाचोर
घुसता पिकात
नामाच्या धोड्यांत
घालू पाही ॥

त्रिकाळ राबतो
त्रिपुटी पाहतो
ॠतूंना जाणतो
आल्या गेल्या ॥

काम हे तयाचे
किती दिवसांचे
मज ना कश्याचे
मोजमाप ॥

तयाचे म्हणता
तयास स्मरता
सुख होय चित्ता
पुरे तेच ॥

कसतो विक्रांत
बसुनी देहात
दत्ताच्या शेतात 
आनंदाने
, © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

दत्त बुरुड




दत्त बुरुड
***********
जरठ कडक
वाढला हा वेत
वाकता वाकत
नाही जरी

कृपे भिजवावे
मग त्या तोडावे
हाती असू द्यावे
दयाघना

मग मी तगेन
जीवनी वागेन
तुझिया कृपेन
दत्तात्रेया 

देई त्या आकारी
राही व्यवहारी
करीन चाकरी
अहर्निश ॥

विक्रांत भिजला
अंतरी वाकला
बुरडे घेतला
दत्तरूपी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http//kavitesathikavita.blogspot.in

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...