शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

सृजन



सृजन
******
हा सृजनाचा
शाप तनाला
शाप मनाला
का जीवाच्या ॥

अमरत्वाचे
खूळ लागले
विश्व जाहले
रतीरत ॥

मेलो तरी मी
उरणाऱच ना
राहणाऱच ना
वंश माझा ॥

दिसल्या वाचून
आत लागली
कुणा न कळली
कळ अशी ॥

आणि तमाशा
बघत हसतो
जग जो रचतो
रचनाकार

जगता वाचुनी
तोही कुठला
म्हणूनही मांडला
का हा खेळ ?


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

दत्त शोध

दत्त शोध 
*******

माझ्या जीवाला 
वेड लावून 
गेला ठकवून
दत्तराज ॥

शोधून तयाला 
बहुत थकलो
उदास जाहलो 
अंतरी मी 

वाटते शोधाचा 
अंत या होऊनी 
जावे उजळुनी 
जीवन हे ॥

याहून असता 
अाणिक मागणे
जळोन जगणे 
जावो माझे ॥

दत्त माऊली
कृपा करूनी
घेई उचलूनी
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

ज्ञानदेव माउली

॥ ज्ञानदेव माउली ॥


इंद्रायणीच्या काठावरली
भिजलेल्या वाळू मधली
सोनपावले ती इवलाली
माझिया  हृदयी उमटली


आजन्म मी तसाच तिथला
होऊन राहतो तोच किनारा
गोठूनिया त्या काळामधला
खळगा होत अमृत भरला


शब्द कदाचित ना पोथीतले
कानी येती ते बोली मधले
झेलून घेतो निनाद उठले
करीत साजरे लक्ष सोहळे


येऊनी दूरवरी जरी मी पडलो  
कितीक जन्म अन तुज दुरावलो   
शब्दअमृत तव सदा पातलो  
कुशीत तयाच्या तुला भेटलो  
  
 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

मृगजळाचे आवतन

मृगजळाचे आवतन
*****************

मृगजळाचे आवतन खुळे आज मी स्वीकार केले
डोळ्यात भरून जुनाट स्वप्न श्वास उरात उधाणले

भले असोत खरे खोटे वा हे स्वप्नभुली हिंदोळे
क्षण मिठीत कुणाच्या परी जगणे हे खरे झाले

मरण  तसे तर आहेच कुठे उभे असे ठाकलेले
आज नाही तर उद्या संपतील श्वास हे साचलेले

मरावे फुटून उरी का असता स्वप्न सजलेले
कणोकणी अस्तित्वात असता रंग रे उधळलेले

मनातच ना जग असते मन मिटता जग मिटते
असणे नसणे जाणे येणे सुखोर्मीही त्यात असते

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

गिरनारी



॥ गिरनारी ॥


एकेक पायरी
चढो तुझा दास
ठेवूनी विश्वास
भेटशील ॥
हर एक क्षण
जावो स्मरणात
पडूनी  पथात
विनवितो ॥
माय बाप तूच
जीवनाचा ध्यास
तुझ्यासाठी श्वास
देही घेतो ॥
करी विनवणी
घाले लोटांगणी
मज निरंजनी
ने गे माय ॥
विक्रांत धरूनी
वाहतो देहास
पदावरी श्वास
सुटो माझा ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अंधार कसला

अंधार कसला ?

हा अंधार असे कसला
दश दिशात उगा भरलेला
तो स्वर्ग हरवला कुठे
जो माझ्यात मी जपलेला

हे बेफान वावटळ उरी
गगनात धुराळा भरला
शत रात्री नभी सजलेला
तो चंद्र कुठे कोसळला

कुणी म्हणती कातरवेळी
भान सारे हरवून जाते
कणाकणात दाटलेला
मग आकांत असे हा कसला

तो प्रकाश काचा फुटला
मज म्हणे थांबू मी कशाला
का लाटेत हरवून गेला
दीप जलात कुणी सोडला

घे नेत्रात सजवून रात्र 
जगण्यात जीव जर गुंतला
दे जलात सोडून जगणे
स्वप्नास जीव जर विटला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

मृत्यू वरन



मृत्यू वरन
*******::
अखेरचा श्वास माझा
सहजी ओंकार व्हावा
प्राण देहाने स्वतःच
हळू मोकळा करावा

सांडूनिया साचलेले
रिक्त सारे चित्त व्हावे
मी माझेपण बांधले
याद काही न उरावे

मिळताच डोळे आत
जग क्षणात तुटावे
जाणिवेच्या सरितेने
सागरात लीन व्हावे

असो गोड किंवा कडू
बीज मागे न रहावे
मरण्या आधीच इथे
मी त्या मृत्यूस वरावे

येणे जाणे व्यर्थ सारे
इंद्रायणीत बुडावे
मावुलीच्या कुशीत मी
माझ्यावाचून  रिगावे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathiकavita.blogspot.in

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...