बुधवार, २२ मार्च, २०१७

तिढा




तिढा
****

तुला उगा पाहण्याला  
मन उत्सुक असते
तुझ्या मुग्ध हासण्याला 
मन अंतरी कोरते  

तुझ्या क्षण असण्याला
रोज प्रार्थत असते
निमिषांच्या भेटीमध्ये
युगांचे तम मिटते

तू असून भोवताली  
योजन दूर असते  
तुडवीत नव्या वाटा
जगणे तुला शोधते

हे कसे सुटावे कोडे
तू आयुष्य व्यापलेले
वा भास हातामधले
असोत हाती भरले

मी उधळू भावनांना
का उगा होवून वेडा
तू सांग राधिके मज  
हा कसा सुटावा तिढा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




मंगळवार, २१ मार्च, २०१७

कृपा







 कृपा

वळवाच्या पावसागत ते तिचे येणे  
अपेक्षा नसतांना धो धो बरसणे
आणि मज देवून जाणे ||
शीतलता ||

हे उपकार म्हणावे जीवनाचे
की वरदान कुठल्या तपाचे
सुकलेल्या तरूवराचे ||
जीवन ती ||

ती एकांतात फुललेले गाणे
ती निरवतेत उमटले तराणे
माझे मलाच कळणे ||
आत्मरूप ||

आलीस पण सांग का थांबशील 
वा झुळूक होवून निघून जाशील    
सांग चांदणे नभातील ||
किती काळ ||

हे सुख ओघळले न मागता
हे फुल उमललेले न सांगता
हे गीत उमटले गाता गाता ||
अवचित ||

मी जाहलो आभाळ आता
मी वारा मुक्त चिंब सरिता   
जीवन कृपा ओघळता ||
मजवरी ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




सोमवार, २० मार्च, २०१७

श्रीपाद श्री दत्ता



श्रीपाद श्री दत्ता  
************ 
 
श्रीपाद श्री दत्ता  
थकलो मी आता  
जीवनाच्या वाटा
तुडवून  ||

मागील जन्माच्या
फेडण्या ऋणाला
दिलेस भोगाला
सुख दु:ख ||

भोगले बहुत
साहेना अजून
टाक रे फाडून 
प्राक्तन हे ||

देवांचा तू देव
काळाचा ही काळ
करीशी सांभाळ
ठाव मज  ||

दिलेस रजका
भोगाचे गाठोडे
नको रे तिकडे
नेवू मला ||

जाणीव असेतो
घेई रे व्यापुनी
सरता गिळूनी
स्वरूपाला ||

विक्रांत विरही
भावना विवरी
आवरी सावरी
तुझा करी  ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...