रविवार, १९ मार्च, २०१७

सांभाळ सये ग






सांभाळ सये ग

सागर किनारी
गडणी साजरी
वाळूत खिळली
नजर लाजरी

उधान वाऱ्याने
बटा उधळती
थट्टेने सांभाळ
तिलाच सांगती

डोळ्यात दाटली
सय ती कुणाची
ऐकल्या वाचुनी
मावळे मरिची

सुखाचा कल्लोळ
वाळूत रंगला
डोळ्यात टोचतो
कण तो इवला

कसली ओढ ही
विरह कसला
वाटेत कुठल्या
जीव तो सांडला

कळतो तरीही
मनाचा भोवरा
लाटांना झेलून
उधळे अंबरा

सांभाळ सये ग
नजर बावरी
नकोच पाहूस
सावळा श्रीहरी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

शनिवार, १८ मार्च, २०१७

माझी कविता







माझी कविता 

तू कविता होतीस माझी 
आताही तूच ते गीत आहे
छंद भरल्या शब्दात माझ्या 
प्राण उजळून गात आहे 

हे भेटणे तर एक बहाणा 
तू कधीचीच अंतरात आहे
किती युगे झाली तुटून
आठव सुंगधी वाहत आहे 

ओढ जीवाला होती तेव्हा 
तीच आज उसळत आहे 
येशील तू न येशील ओठात
मूर्ती तुझी मनमंदिरात आहे

अर्थहीन आयुष्याची जरी
पोकळी जीवनात आहे 
दिसतेस तू क्षितिजावरती
वाटते सुखाची बात आहे 

जगलो जरी तुझ्याच साठी
अजून लालसा मनात आहे
तुझी अबोल भिडस्त भाषा 
लाख शब्दांची बरसात आहे ।

श्रीमह्नमंगले शारदे वाग्देवते 
तव कृपा उज्वल पहाट आहे 
अंधारल्या जीवनाचा माझा 
हा किती सुंदर शेवट आहे 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

उत्तर कोरीया ....







उत्तर कोरीया ....
************

कशी लंका रावणाची
अजुनी इथे नांदते
उत्तरेला कोरीया का
नरक असा भोगते

मुठभर सत्ताधारी
अनिर्बंध माजलेले
अनाचार दुराचार
पापात राष्ट्र बुडाले

हक्क इथे माणसाला
जगण्याचा मुळी नाही
बंदुकीने मरतात
सुख थोडे मागताही  

कसे जग झोपलेले
का कुणास खंत नाही
म्हणे धरेस कुटुंब
काय आम्हा लाज नाही

प्रार्थनाच हाती माझ्या
त्याचे अस्त्र होवू दे रे
गांजलेले बंधू माझे
सुख त्यास पाहू दे रे

जाय तिथे जन्म घे रे
राम जनार्दना कृष्णा
निर्दाळी असुर पुन्हा
अभय देई त्या जना

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...