मंगळवार, १४ मार्च, २०१७

राहा बोलत तू मी ऐकत







राहा बोलत
तू…, मी ऐकत
काळ थांबवा
याच क्षणात

बोल शब्दांनी
बोल डोळ्यांनी
बोल स्पर्शानी
अशी येवूनी

शब्द देहात
अर्थ गात्रात
स्पंद उरू दे
नखशिखात

मन पाखरू
मन वासरू
मन वात्सल्य
चिंब लेकरू

असे पूर्णता
वा अपूर्णता
बोल कोणते
देवू अमृता

नुरे देहात 
गेलो वाहत
तुझ्या मनात
शब्दां सवेत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, १३ मार्च, २०१७

खुळा बहाणा









खुळा बहाणा

खुळ्या जगण्याचा
खुळाच बहाणा
हरवल्या मना  
मार्ग नाही ||

रोज धडपड
तीच गडबड
जीवा लागे गोड
घोर ऐसा ||

दूर जावू जाता
अडविती वाटा
घुसलेला काटा
काळजात ||

जरी चित्त सारे
मुग्ध वादळात  
प्राणाचा शेवट
हवा वाटे ||

खोटे वाटे जग
ऐसी तगमग
अंतरात आग
पेटलेली ||

पेटवला चूड
जाळो देह मना
एवढी कामना
पूर्ण व्हावी ||

विक्रांत भिजून
उजाड वावर
फाटण्यास उर
सज्ज दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



रविवार, १२ मार्च, २०१७

तू अहिल्या !!




तू अहिल्या  !!

जग तसे छोटे आहे
दिशेमध्ये भरलेले
तू कोठे जाशील राणी
मन जरी वादळले

बंद कर दरवाजा   
कड्याकुड्या लाव जरा
जन्म गेला अंधारात
सवयीचा भाग सारा

बघ स्वप्न पाहू नको
मोहजळी पोहू नको
पोटासाठी गोतासाठी
सुरक्षाही सोडू नको

तसे काय कमी इथे
संसाराचे चाले गाडे
हरवता मन उगा
त्याला देई धडे थोडे

उडतील वर्ष बाकी
सरेल ही जिंदगानी
येवूनिया गेल्या किती
तयातील तू कहाणी

कुणी म्हणे तुला आहे
पंख काही मालकीचे
काहीतरी ऐकू नको
पदर ग ते शोभेचे

चंद्र मुळी तुझा नाही
तुझे नाही तारे वारे
येईल मालक घरी
तोच तुझा बाई सारे

आवड नावड तुझी
त्याला काय मोल आहे
म्हण नाथ स्वामी पती
व्यर्थ जरी बोल आहे

कुणीतरी भेटलेले  
प्राणप्रिय वाटलेले
भ्रम असतात असे
जागोजागी पडलेले

मरू देत वेडे मन
जळू देत व्यर्थ तन
अहिल्या होतेच अंती   
अशी वा तशी पाषाण

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ११ मार्च, २०१७

रंग भगवा अबोलीचा



रंग भगवा अबोलीचा

अजून कुठे दुनिये तू जाणलेस मला
मी कसे मग जाणावयास जावे तुला

फिकीर माझी कधी नव्हतीच तुला
फिकीर का मग तुझी असावी मला 

मी जातो माझ्या तू तुझ्या वाटेला  
सुखदु:ख राहो माझे माझ्या उशाला  

अंधार प्राशून इथे मी जगलो जेधवा
प्रकाश का तुज होता कधी मागीतला   

जरा बहकलो या मी सुखाच्या सुगंधी
हवे का सांग तव शोधावया फुलाला

तसा तर निभावला मी उपचार सारा तुझा
आता कशाला हवा तुज आणखी हवाला

जन्म धुनीतील मी असे राख फासलेला
रंग भगवा अबोलीचा या हातात बहरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in








झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...