सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

स्थिती मनाची




स्थिती मनाची ।
खात्री जीवाची ।
अवस्था चित्ताची ।
घटायला हवी ।।

मग हे चरण ।
मी न सोडिन ।
राहो जावो प्राण ।
काही केल्या।।

कृपेचा किरण।
हृदयी धरीन।
जीव ओवाळीन ।
पायी तुझ्या।।

एवढेच स्वामी।
ठसो माझे मनी।
विक्रांता आणि ।
काय हवे।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

गुरुवर



खुळी खुशामत मन हे करता
नकळत नेता स्वप्नरंगी  ||१||

उगा अचानक ध्यान हरवतो
मार्ग मी चुकतो माझ्यातच   ||२||

परी गुरुदेव तोच अवधूत
घेवून परत जातो मज ||३||

खरेतर छोटी असते परीक्षा
परी नच शिक्षा नापासाला ||४||

हळूच हसतो मज थोपटतो
सरळ दावतो पुन्हा रस्ता  ||५||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

फेसबुकवर




फेसबुकवर  

चित्र बोलके 
कुण्या भित्तीवर
घेवून शंभर 
वा वाहवा ||

शब्द नेमके 
कुण्या भित्तीवर
होवून सुंदर 
गान अहा ||

मीही लिहितो
मनात वाकून  
उगाच नेटून 
मग जरा ||

जशी रात्रीची 
वाट मोकळी
अडली नडली 
नाही कुणा ||

तसाच हिंडतो 
चित्र डकवतो
वेळ घालवतो 
वांझ उगा  ||

घर हे निजते 
जग मालवते
तम साकळते 
मनी पुन्हा ||

संगणकाच्या 
पडदयावाचुनी  
कुजके हसुनी 
जाते कुणी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने




शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

मान्य मला




मान्य मला
********

चालले जगणे हसून भोगणे
प्रारब्ध झेलणे मान्य मला ||

दु:खात रडणे सुखांना शोधणे
काळीज फाटणे मान्य मला ||

मनी उजळने क्षणी मावळणे
कधी हरवणे मान्य मला ||

माझे हे असणे अथवा नसणे  
जीवनी वाहणे मान्य मला ||

करी रे स्वीकार अथवा नाकार
होणे निराधार मान्य मला ||

आले ते झेलणे कौतुके पाहणे 
विक्रांत म्हणे मान्य मला ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavaita.blogspot.in


गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

जैसी ते शुकाचेनि आंगभारें, नळिका भोविन्नली एरी मोहरें


  
साऱ्या पोपटा माहीत होते 
नळी कुठे ठेवली आहे ते 
तरीही धावले मोही पडले
लटकून अन उलटे झाले 

पिंजऱ्यात मग त्या लवंडून
पाठ शब्द घोकून घोकून 
पेरू मजेने खात राहिले
जगा ज्ञान देवू लागले

जागे व्हा रे नीट पहा रे  
आत्मरूप ते जाणून घ्या रे 
पाहता पाहता भरले पिंजरे 
भक्त माना डोलू लागले 

काही शिकलो मग मी ही 
जाड शब्द कधी न जाणले
आणि भोवती खूप जमवले
खुश मस्करे स्वार्थ भरले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 


बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

ओघळून स्वप्न सखी




ओघळून स्वप्न सखी
आज माझ्या दारी आले
एक नवे धुंद गीत
पुन्हा मनात जागले  ||

कळल्या वाचून काही
मी माझ्यात हरवले    
अनंत उल्का लेवून
मनी आकाश सजले ||

या ओढीस काय म्हणू
मी नाव कुठले ठेवू  
या सुखाच्या वणव्यात
जळून कितीदा जावू ||

सुख दु:खाच्या पल्याड
मी क्षणात या थिजले
मधुकण अमृताचे   
मी झेलूनिया घेतले  ||

मी जन्म होवूनि सखी
या जीवनास भेटले
जे होते रिते रिते ते
हृदय आज भरले ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

मन्मथ चंद्र




खोट्या किती शपथा पाहिल्यास तू चंद्रा
साक्षी किती जनांना राहिलास तू चंद्रा ||
देहात पेटलेले प्रेम ते ही असते
स्मरून रोहिणीला राहिलास तू चंद्रा ||
ती स्त्री मालकीची रे असे काय कुणाच्या 
देवून साथ शाप तो घेतलास तू चंद्रा ||
भोगून प्रेमास धुंद रीती भितीविना
घटास अर्थ मातीच्या दिलास तू चंद्रा ||
रात्रीस रूप काही नसेच तुझ्याविना  
विदेही मन्मथाच्या उरलास तू चंद्रा ||
हो स्पर्श जीवनाला पुरुषार्थ पूर्णकाम
ती मातृका तयांची झालास तू चंद्रा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...