शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

कविता लिहिणे








पिले मांजराची
पिले कोंबडीची
कविता कुणाची 
घडो यावी  ||१

शब्द इटूकले
शब्द पिटुकले
यमकी रचले
काम व्हावे  ||२

असा खेळ खेळू   
मजा मजा करू  
चला वेळ काढू   
असातसा || ३

असे वेळ तर
सोडा नाहीतर
प्रेम शब्दावर
फक्त करा ||४

व्यक्ती नुसार
कविता होणार
भाव उमटणार
ज्याचा त्याचा ||५

तर मग चला
शब्द उधळा
कविता उजळा
पुन्हापुन्हा || ६

कविता लिहिणे
असते जगणे
दवात भिजणे
सकाळच्या ||७



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

दत्त होऊनिया स्वप्न








देव बांधुनिया गाठी
चाले निवांत बैरागी
जग हलते डुलते
नित्य निश्चल नियोगी

लक्ष्य अलक्षी लागले
ध्यान शून्यात गुंतले
पथ मावळले सारे
प्राण आकाशी विरले

काय मागचे पुढचे
बंध सुटले युगाचे
आत एकांत विरुढे
काम मिटले जगाचे

देव भरवतो घास
पेरी पावुलात वाट
खांदी घेवूनीया मेघ
वात चालला वाहत

काय आकार विकार
नाना रंगांचे विभ्रम
घडो घडे तैसे आता
फेऱ्या पडला विराम

दत्त होऊनिया स्वप्न
शून्यी हरवले मन
सर्व तत्वांचा पसारा
एका बिंदूत मिटून 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

सजविला देव







सजविला देव
बुडविला देव
केली उठाठेव
धनबळे ||
ओरड आरत्या
वाजविल्या झांजा
केला गाजावाजा
मंडपाचा ||
भाकड भावाचा
आळविलासूर 
दान भरपूर
गोळा केले ||
कुठल्या गणाचा
देवा तू रे पती
सोंग हे नाचती
बुणग्यांची ||
विक्रांत एकटा
कोंडला घरात
गुलाल दारात
खच पडे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

ढुंकून गेलो बरं...



(आज सहज खूप महिन्यांनी एका जुन्या  ग्रुपवर गेलो तेव्हा तिथे सुचलेली कविता.)



येवून गेलो बरं मी
तुमच्या कुणीही
ढुंकून न पाहिलेल्या
कवितात
ढुंकून गेलो बरं...

आता ढुंकल्याची गोष्ट
सांगण्या सारखी नाही
हे माहित आहे मला
पण न ढुंकल्याचे दु:ख
काय असते हे ही
माहित आहे मला
म्हणून लिहून गेलो ...

खरतर कविता लिहिणे म्हणजे
आपणच आपले पंख
फडफडवणे असते
उबलेले अंग
मोकळे करणे असते
अन त्यातही कुणाचे
ढुंकून पाहणे म्हणजे
असल्या नसल्या पिसाऱ्याचे
उलगडणे असते ..

थोडक्यात काय
ती एक
अनैच्छिक प्रतिक्रियात्मक
मस्त गोष्ट असते ...

वाचल्या...
खूप कविता होत्या
ओसाड पडलेल्या
(मला माझ्याही काही आठवून गेल्या )
म्हणून प्रत्येकाला ढुंकायला
जमले नाही मला
खरतर ते शक्य ही नव्हते
(अन ती काय कुठल्या
चविष्ट डीशची रेसेपी थोडीच आहे
पुन्हा पुन्हा चघळायला)
बरे ते असो
आता या कवितेकडे
तुम्ही ढुंकून पाहाल
याची मलाही काही खात्री नाही
अन या ग्रुपवर 
पेज व्हू मोजायची सोयही नाही
त्यामुळे मी थोडे हे
तर थोडे ते गृहीत धरतो
अन आपला निरोप घेतो
..
पण येवून गेलो बर मी !!
ढुंकून गेलो !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...