सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

दत्त जामीन






उद्याचा व्यापार
दिला मी सोडून
टाकिले मोडून
दुकानाला ||
चोरी गेले सारे
ज्याचे त्यांनी नेले
मुद्दल दिधले
बुडीताला ||
आता सारी चिंता
वाहू दे दत्ताला
जामीन ठेविला  
तयालाच ||
घालील तो खेटे
उगा परोपरी
दृष्टी माझ्यावरी
ठेवील गा ||
विक्रांत तोट्यात
जरी या जगात
लाभला भाग्यात
व्यवहार ||

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

येवो वावटळ तुझे








मज जाणवतो देवा
तुझ्या मुलुखाचा वारा
ध्वज उरात भगवा
फडफडतो भरारा

काही जाणवते जुने
रंग रूप तया नाही
मन निर्वात होताच
स्पर्श जाणवत राही

गाव सापडेल कधी
मज जरी ठाव नसे
वाट आतली तिथली
मज खुणावत असे

सारे सोडले मागुती
प्रियजनांची मागणी
प्राण घेतले हातात
देह जावू दे वाहुनी

येवो वावटळ तुझे
घर बेचिराख व्हावे
हीच प्रार्थना मनात
माझे अस्तिव हरावे

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

कळो तुज आता तरी






तसा तर जन्म पुढे
काही वेळ वाहणार
कधीतरी देह मग
काळ असे गिळणार

आला गेला पळ असा
सांग कधी पाहणार
शून्य योजनांचा व्यास
मन कधी मोजणार

भोवताली सांगणारे
सुज्ञ आंधळे हजार  
पाय कुठे ठेवायचे
त्यांना कसे कळणार

सोड वेड्या  हट्ट खुळा
कोण कुणा पुरणार
फुटे घट पाण्यातला
मागे काय उरणार    

कळो तुज आता तरी
शुध्द जाणीव अपार
अन मग गळो तुझा
तूच नसलेला भार


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...