शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

कळो तुज आता तरी






तसा तर जन्म पुढे
काही वेळ वाहणार
कधीतरी देह मग
काळ असे गिळणार

आला गेला पळ असा
सांग कधी पाहणार
शून्य योजनांचा व्यास
मन कधी मोजणार

भोवताली सांगणारे
सुज्ञ आंधळे हजार  
पाय कुठे ठेवायचे
त्यांना कसे कळणार

सोड वेड्या  हट्ट खुळा
कोण कुणा पुरणार
फुटे घट पाण्यातला
मागे काय उरणार    

कळो तुज आता तरी
शुध्द जाणीव अपार
अन मग गळो तुझा
तूच नसलेला भार


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

उंट रेती अन तो







तीन पाहुणे उंटावरती
नवलाईने बघत रेती
आणि चालला एक पुढे
जयास दुसरी नाही गती  

दूरदूरवर झाड नाही
वरती खालती लाहीलाही
तरीही मजा येतेय किती
नवी दुनिया नवे मनही

आज कुणी तर उद्या कुणी
उंट वाहती त्याच प्रवाही
आणि सैल तुमान पठाणी
शीड सुकाणू होवून दोन्ही

अखेर जगणे असते काय
पसरट उंटाचेच पाय
धसती खचती वाळूमध्ये  
तरी सदैव पुढेच जाय

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

चकवे






पुन्हा धूसर धुकट
तुझ्या गावच्या वाटा
कधी दिसते शिखर
पुन्हा धुक्याच्याच लाटा 

का रे मांडसी समोर
असे हजारो चकवे
भर प्रकाशी अंधार
सारे विझवून दिवे

माझ्या जगात सांडले
तुझे किरण कोवळे
त्याला रुजवणे खुळ 
आता मनात दाटले

लाख हरवलो जरी
तूच धरिसी बोटाला
दिशा दाखवून पुन्हा
सांगे पुन्हा चालायला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...