मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

नकार







आजकाल नको आहे त्यांना
सहजच होणारे
थोडेसे जास्तीचे काम
अन थोडीशी सोय
झालेली कुणाची  

आता आताशा  
सेवेचे मापदंड बदलले आहेत  
सहकार्याच्या व्याख्याही
बदलल्या आहेत

माणसं बदलली आहेत
का परिस्थिती बदलली आहे
का ठराविक माणसांची
लुडबुड वाढली आहे
कुणास ठावूक

पण एक जिनसी
एकोपा असलेली
जगण्याची रीत
अन एकमेकात
मिसळून जाणारी  
मनाची वीण
उसवत चालली आहे
एवढ मात्र खर !!

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे





सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

रुजू झाल्यावर






पंधरा दिसांनी कामावर आलो
अन कळलं
आपण कोणतरी आहोत ते
पण वळखायला लईच अवघड गेलं
बरं का भाऊ
सगळी पिसं उपटली गेली होती हो

 
सदानकदा रोजच्याला
तेच तेच ऐकून ऐकून
आपल्याला खरंच काही कळत नाही
हे इतकं डोक्यात भिनलं
कि इथं आल्यावर
सगळी आपली मजा करतात
असंच वाटू लागलं

 
मग गडयांनो
काही झालं तरी रिटायर व्हायचं नाही
हे आता पक्कं ठरवून टाकलं

 
नाही म्हणजे इथं हि
मरायला होतंच कि हो
पण त्याचं काय आहे
एकदा मेलं की काम होतं भाऊ


यायचं
सही करायचं
अन मरायचं
मग कुणी रस्सा करो वा तंदूर
काय बी त्रास नाय

 
पण कुणी जित बी ठेवतं
अन नुसतंच पिसं उपटतं
हे काही खर नसतं
आई शप्पथ सांगतो
रजा घेऊन घरी बसायचं
म्हंजे
नक्कीच कुठल्यातरी पापचं
फळ असतं


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

कवित्व






शब्द सुखाचे खुळे उमाळे
जगलो धुंद गात्री भिनले
स्वप्न पाहिले बहरून आले
कधी पेटले धडधड ज्वाले
शब्द अंतरी सखे जाहले
जाग मिटेस्तो साथ राहिले
शब्द कोवळे नाजूक ओले
जीव जडले  कधी भेटले
शब्द ताठर अवघडलेले
कधी सांडले नको असले।
तरीही त्यांनी काही दिधले
कणखरपण जीवन ल्याले  |
किती तयांचा ऋणी असे मी
तया वाचून काही नसे मी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
Kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...