शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

कवित्व






शब्द सुखाचे खुळे उमाळे
जगलो धुंद गात्री भिनले
स्वप्न पाहिले बहरून आले
कधी पेटले धडधड ज्वाले
शब्द अंतरी सखे जाहले
जाग मिटेस्तो साथ राहिले
शब्द कोवळे नाजूक ओले
जीव जडले  कधी भेटले
शब्द ताठर अवघडलेले
कधी सांडले नको असले।
तरीही त्यांनी काही दिधले
कणखरपण जीवन ल्याले  |
किती तयांचा ऋणी असे मी
तया वाचून काही नसे मी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
Kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

राखी





म्हटलं तर दोराच
दोन गोंडे लावलेला
बेगडा मध्येच मणी
छानपैकी सजविला

समर्थ असा पण की
जीव जीवास देणारा
रक्तातल्या हुंकाराला
क्षणात साद देणारा

नव्या वर्षी नवी गाठ
नवा धागा हाती येतो
प्रेमाचा नि आठवांचा
ठेवा वृद्धिंगत होतो

मुग्ध बालपणी सवे
हळूहळू फुलतांना
जीवनाच्या घडणीत
साथ सोबत घेतांना

निरपेक्ष वर्षेगत
माया ती पांघरताना
जीवना मी धन्य झालो
नाते असे जपतांना

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

Kavites
athikavita.blogspot.in

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

उजळले मन






उजळले मन
ज्ञानदेवी माय
जाहला उपाय
काही एक ||

केली आटाआटी
शब्दा घेत झटी
म्हणूनिया युक्ती 
कळो आली

मशके धरिली
अवकाशी आस
तयाचा तू ध्यास
पूर्ण केला

पाकळ्यांचे शब्द
मुग्ध आळूमाळू
परम कृपाळू
दृष्य झाले  

अमृताच्या सरी
ओघळल्या दारी
भिजुनिया उरी
चिंब झालो

अर्थातला अर्थ
रुजो आता मनी
सुफळ होवुनी
शब्द यात्रा

विक्रांत प्रभाकर तिकोणे

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...