मंगळवार, १२ जुलै, २०१६

वाटे वैकुंठाच्या जाता






वाटे वैकुंठाच्या जाता
मध्ये पंढरी साजरी
सवे ज्ञानदेव माझा
दाटे सुखाची उकळी

नसे हव्यास मोक्षाचा
आस स्वर्गीय लोकाची
दिव्य भरली भोवती
यात्रा चैतन्य रुपाची

कोण म्हणतो अभंग
कुठे वाजतो मृदंग
टाळ नादात नाचात
सवे सोबती श्रीरंग

मुक्त रांगड्या प्रेमाचा
ओघ वाहतो धबाबा
मुक्ता सोपान निवृत्ती
गळा तुकोबा चोखोबा

व्यर्थ लौकिक सरले
जीव शिवास भेटले
दत्त कृपेने विक्रांत
ऐसे ऐश्वर्य देखिले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

         




         


सोमवार, ११ जुलै, २०१६

पावसा








कोटी कोटी मुखातून

उमटे प्रश्न पुन्हा रे

थकलो वाट पाहून

पावसा येशील का रे ?



तसा तर तू येशील

थोडाफार पडशील

पण तसे नको आता

हळूच पुन्हा जाशील



असा बरस आता तू

तृषा हरो जीवनाची

कणाकणातून हसो

स्वप्न उद्याच्या सुखाची



नद्या उदंड भरोत

तळी तुडुंब वाहोत

विहरी साकव आड

गाणे निळूले गावोत



कृपाघना नाव तुझे

हरसाल साच व्हावे

अंकुरती बीज सान

जीवनाचे दान द्यावे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, ९ जुलै, २०१६

मनाचे पाखरू



मनाचा पिंजरा
मनाचे पाखरू
अफाट अपारु
नच जाणे येरू

सुखाचा चारा  
संपता संपेना
वेचतांना भान
स्वत:चे येईना

उगा फडफड
मानलेले घाव
फुटतात टाहो
खुळी धावाधाव

शब्दांचे तुकडे
मांडतो पद्यात
येईना अजुनी
अर्थ तो तयात

विक्रांते पाहीले
क्षितीज धुंडले
अंतरी दिसले
काहीच नसले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  
         

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...