बुधवार, ४ मे, २०१६

जीवना कुशीत



कृपा 

सुखाचे गोजिरे 
स्वप्न हरखले  
एक उमलले 
फुल घरा |

दातारे दिधले 
आनंद निधान
नव्याने तोरण 
बांधियले |

सुखाची आवृत्ती 
परी असे नवी  
जैसी वर्षा यावी 
भरुनिया |

आनंद थरार 
सर्वांगे आभार
कृपा दीनावर 
लोट वाहे |

जीवन मिठीत 
जीवना कुशीत
घेवूनी वाहत 
आहे जन्म |

तुवा दिधले जे 
प्रेमे सांभाळीन
तुझे ते जपीन 
जीवापाड |

विक्रांत जाहला 
पुनरपी पूर्ण
फिटूनिया ऋण 
विधात्याचे |




डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in



रविवार, १ मे, २०१६

जगविले दत्ता




जगविले दत्ता मज तुचि आजवर  
पोटास दिली रोजला भाकर    

फिरविले उगा चार रानोमाळ  
जणू आठवाया तुजला प्रेमळ  

ती ही तुझीच अपार करुणा  
आता कळो ये माझिया मना  

अजुनीही जगेल मी इथे तसा   
परंतु प्रभू तुम्ही ह्रदयी वसा  

असेल तोवर सुखे मी वाहीन   
भार पाठीवर न त्रास सांगेन  

मरणी पडणे घडो येई तेव्हा
दिसे मृत्युघर पसारा अवघा  

माझिया मनी शांत आणी स्थिर  
जळो स्मृती दीप तव प्रभूवर   

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...