गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

जिवलग स्मृती



फडफड ज्योत
विझते क्षणात
दु:खाचा अंधार
दाटतो मनात

असाच असतो
मायेचा बाजार
शेवटी सुटतो
प्रत्येक आधार

जळते काळीज
स्मरणाचा पूर
जाता जिवलग
सोडुनिया दूर

सहज मोडतो
सुखाचा मांडव
वेदना वादळ
करीते तांडव

एकेक आठव
मनात छळते
नसणे तयांचे
जीवाला टोचते


जगण्यामधले
विरतात सूर
डोळिया मधून
ओघळतो पूर

हसणे सरते
काहूर उरते
तरीही जगणे 
नशीबी असते



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

दत्तात्रेया...





काय मी करावे
जेणे तुझे मन
कृपाळू होवून
ओघळेल ||
तुझ्या नामध्यानी
विकले स्वत:ला
प्रपंच पणाला
लाविला हा ||
काय मज हवे
ठावूक तुजला
काय सांगायाला
हवे पुन्हा ||
तुजवीण आन
नाही काही आस
घ्यावे हृदयास
दत्तात्रेया ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

माता मृत्यू





तीन वाजता जन्मलेला
तिचा मुलगा
नऊ वाजता अनाथ झाला
जणू कुणी कुणावर
होता सूड उगवला
सटवाईने लिहिण्याआधी
काळलेख नशीबा आला ..

कळले मग की   
तिज रक्त गोठण्याचा  
कुठला आजार होता
हे मातृत्व तिच्यासाठी
एक जुगार होता
अन तिने तो खेळला होता
सहा तासाचे मातृत्व
कदाचित
मृत्यूपेक्षा श्रेठ होते
का माता होणे
तिजसाठी सक्तीचेच होते
प्रश्न हे तिच्याचसवेच पण  
आता जळणार होते ...

मातामृत्यू गंभीर घटना
उद्या त्यावर कमिटी बसेल
प्रत्येक पेपर खणून काढेल
अन कदाचित
कुणावर तरी खापर फुटेल  ..

पण मी पाहिले तिचे डोळे
आनंदाने उजळलेले
अन मरणाने कोमेजलेले
अन ते बाळ शांतपणे
पाळण्यात निजलेले  
दु:खाच्या गाठोडीत माझ्या
अजून ओझे जमा झाले
आणि मनावर काही उमटले
जाणार जे ना कधीच पुसले  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

जाणाऱ्यास ...





प्रवासाच्या शेवटी शेवटी
कुणा लागू नये कधी ठेच
जमा केलेल्या सौख्याचा
असा होऊ नये कधी वेच 

उन वारा पाऊस खातांना
निवाऱ्यास रात्र काढतांना
थकते शरीर कण्हते मन
नि चालू पडते उजाडतांना

त्या दुःखाचा अंत होतो
मुक्काम येवून ठेपतांना
शीणभाग अवघा हरवतो
पडाव असा ओलांडताना

का नकळे ही माणसे अशी
उगाच वैर जागते ठेवतात   
देणे घेणे संपणार असते  
तरी जीव जाळत बसतात   

जाणाऱ्यास त्या जावू द्यावे
चूक भूल अन पदरी घ्यावे
आज चालला तो ज्या वाटे
उद्या आपली ध्यानी ठेवावे

तो गेल्यावर स्मृती कसली
आली गेली किती टिकली
जणू धुक्यांनी रेखाटलेली 
आरश्यावरील चित्र इवली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...